कपाशीवरील रोग

 कपाशीवरील रोग

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download    Agrojay    Mobile Application:    http://bit.ly/Agrojay )

१) अणुजीवी करपा :

रोगकारक जिवाणू - झॅन्थोमोनास ऑक्‍सेनोपोडीस पॅथोव्होर मालव्हेसीरम 
अ) पानावरील कोनाकार ठिपके

लक्षणे

1) सुरवातीस पानाच्या खालच्या बाजूने तेलकट कोनात्मक तांबड्या काळपट रंगाचे ठिपके दिसतात. 
2) रोगाची सुरवात साधारणतः ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होते. 
3) जवळपास सर्वच जातींवर या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो.
ब) पानाच्या शिरेवरील करपा - पानाच्या मुख्य व उपशिरांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. यामुळे पानाच्या शिरा काळपट किंवा तांबड्या रंगाच्या दिसतात. 
क) देठावरील करपा - फांद्यांवर काळपट रंगाचे ठिपके दिसतात. फांद्या काळपट पडतात. 
ड) बोंड सड (रॉट) - बोंडावर तेलकट, काळपट ठिपके पडतात.

एकात्मिक रोग व्यवस्थापन

1) रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी. 
2) प्रति किलो बियाण्यास 1 ग्रॅम कार्बोक्‍सिन अधिक 3 ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. 
3) पेरणीसाठी तंतुविरहित केलेले बियाणे वापरावे. 
4) शेतात आंतरपीक किंवा मिश्र पिके घ्यावीत. 
5) रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन स्ट्रेप्टोमायसीन (100 पीपीएम) 1 ग्रॅम अधिक कॉपर ऑक्‍झिक्‍लोराइड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
6) गरजेनुसार 10 दिवसांच्या अंतराने पुन्हा फवारणी घ्यावी.

२)दहिया रोग :

रोगकारक बुरशी - रॅम्युलॅरिया एरिओलाय (रॅम्युलॅरिया गॉसीपाय)

लक्षणे

1) रोगाचा प्रादुर्भाव साधारणतः सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिसतो. 
2) सुरवातीस पानाच्या खालच्या बाजूने आकारविरहित पांढऱ्या रंगाचे ठिपके दिसतात. दही शिंपडल्यासारखी लक्षणे दिसतात. 
3) पाने, देठे, पात्या, फुले, बोंडांवर रोगाची लक्षणे दिसतात. 
4) रोपटे किंवा झाडवाढीच्या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाची वाढ खुंटते. पात्या, फुले व बोंडे गळतात.

एकात्मिक रोग व्यवस्थापन

1) शेतातील रोगग्रस्त अवशेषांचा नायनाट करावा. 
2) पिकाची फेरपालट करावी. 
3) पाण्यात मिसळणारे गंधक 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी सकाळी किंवा दुपारनंतर करावी किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.


3) पानावरील बुरशीजन्य ठिपके

अ) अल्टरनेरियाचे ठिपके
रोगकारक बुरशी - अल्टरनेरिया मॅक्रोस्पोरा

लक्षणे

1) पानावर प्रथम लहान तपकिरी किंवा काळपट रंगाचे गोल ठिपके दिसतात. कालांतराने ठिपके मोठे होऊन आकारविरहित होतात. 
2) ठिपक्‍यांचा मध्य भाग भुरकट रंगाचा होऊन त्यात भेगा पडतात, पाने वाळून गळून पडतात.

4) सरकोस्पोराचे ठिपके

रोगकारक बुरशी - सरकोस्पोरा गॉसीपीना. 
लक्षणे 
1) पानावर गोल फिक्कट तपकिरी रंगाचे लहान ठिपके दिसतात. 
2) सुरवातीस खालच्या पानांवर आणि त्यानंतर वरच्या पानांवर ठिपके पडतात. पुढे भुरकट रंगाचे होतात. ठिपके एकमेकांत मिसळून आकारविरहित होतात. अशी पाने गळून पडतात.

5) मायरोथेशियमचे ठिपके :

रोगकारक बुरशी - मायरोथेशियम रोरीडम

लक्षणे

1) सुरवातीस नवीन पानावर, गोल किंवा आकारविरहित ठिपके दिसतात. त्याला वलय असते. 
2) मधला भाग भुरकट रंगाचा दिसतो. नंतर मधला भाग गळून पडतो. 
3) बऱ्याचदा असे ठिपके पानाच्या देठांवर किंवा खोडावरसुद्धा आढळतात.

एकात्मिक रोग व्यवस्थापन

1) शेतातील रोगग्रस्त अवशेषांचा नायनाट करावा. उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी.
2) बियाण्यास 1 ग्रॅम कार्बोक्‍झीन अधिक 3 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. 
3) रोगग्रस्त पिकावर 25 ग्रॅम मॅन्कोझेब किंवा 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

6) मूळकूज/ खोडकूज :

रोगकारक बुरशी - रायझोक्‍टेनिया सोलनाय, रायझोक्‍टोनिया बटाटीकोला.


लक्षणे

1) झाड एकाएकी पिवळे पडून वाळते, सहजासहजी उपटले जाते. 
2) झाडाची मुळे कुजून त्याची साल निघते. 
3) मुळाचा खालचा भाग प्रथम पिवळसर व नंतर काळपट पडतो. 
4) झाडाची मुळे हाताला ओलसर व चिकट लागतात.

एकात्मिक रोग व्यवस्थापन

1) चांगला पाऊस पडल्यावरच पेरणी करावी. 
2) रोगाचे प्रमाण जास्त असल्यास 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा 25 ग्रॅम कॉपर ऑक्‍झिक्‍लोराइड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

7) आकस्मिक मर (पॅराविल्ट) :

लक्षणे

1) सुरवातीस झाडातील तजेला नाहीसा होणे, झाड एकाएकी मलूल होते, पिवळे पडणे. 
2) पात्या, फुले, तसेच अपरिपक्व बोंडे सुकतात, गळतात. शेवटी झाड सुकते.

एकात्मिक व्यवस्थापन

1) जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होण्यास योग्य वेळी डवरणीच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत ठेवावी. 
2) पिकास पाण्याचा ताण जास्त कालावधीकरिता बसू देऊ नये. तसेच शेतात झाडाजवळ दीर्घ काळ पाणी तुंबून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. 
3) रोगग्रस्त झाडाच्या भोवतालची जमीन खुरपीने त्वरित भुसभुशीत करावी आणि प्रति झाड 2 ते 3 ग्रॅम युरिया झाडाजवळ जमिनीत मिसळून द्यावा. 
4) झाडाच्या मुळ्यांजवळ कॉपर ऑक्‍झिक्‍लोराइड 30 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची झाडांच्या बुंध्याजवळ आळवणी करावी.

एकात्मिक रोग व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या बाबी

1) शेत आणि शेत परिसरात स्वच्छता ठेवावी. 
2) पिकाची योग्य फेरपालट करावी. 
3) रोगमुक्त, प्रतिकारक जातींची लागवड करावी. 
4) दोन ओळींत व झाडांत शिफारशीत अंतर ठेवून पेरणी करावी. 
5) माती परीक्षणानुसारच रासायनिक खताची मात्रा द्यावी. 
6) योग्य वेळी आंतरमशागत करावी. 
7) शेतातील रोगग्रस्त झाडे, रोगग्रस्त अवशेष नष्ट करावेत.

8) कॉटन लीफ कर्ल व्हायरस (विषाणू) :

रोगाचा प्रसार अथवा वाहक कीटक- पांढरी माशी

लक्षणे

1) पानांच्या शिरा तुलनात्मकरीत्या गर्द हिरव्या होतात. 
2) पानांच्या मागच्या बाजूस जाड भाग निर्माण होतो, झाडाची वाढ खुंटते. 
3) पात्या, फुले कमी येतात, पाने द्रोणासारखी होतात.

एकात्मिक रोग नियंत्रण व्यवस्थापन

1) रोगग्रस्त झाडे त्वरित उपटून जाळून नष्ट करावी. 
2) सिंथेटिक पायरेथ्रॉईड्‌स गटातील (उदा.- सायपरमेथ्रीन) कीटकनाशकांचा वापर टाळावा. 
3) पांढऱ्या माशीला बळी पडणाऱ्या पिकांचा कपाशीमध्ये आंतर किंवा मिश्र पीक म्हणून लागवड करू नये. 
4) नत्रयुक्त खतांचा अवास्तव वापर टाळावा. 
5) भेंडी पिकावर हा रोग येत असल्याने या पिकाची लागवड कपाशीच्या क्षेत्राजवळ करणे टाळावे. 
6) पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी.

9) कवडी :

रोगकारक बुरशी - कोलेटोट्रायकम गॉसीपाय

लक्षणे

1) पानांवर, पानांच्या टोकांजवळ, तसेच पानांच्या कडेला दाट तपकिरी रंगाचे 5-10 मि.मी. व्यासाचे चट्टे पडतात. 
2) बोंडावर लालसर तपकिरी, काळपट, खोलगट चट्टे पडतात. अशी बोंडे उमलत नाहीत. 
3) बोंडातील कापूस चिकटून तो कवडीसारखा दिसतो.

एकात्मिक रोग व्यवस्थापन

1) पिकाची फेरपालट करावी. तंतुविरहित केलेले बियाणे वापरावे. 
2) कार्बोक्‍झीन 1 ग्रॅम अधिक थायरम 3 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. 
3) रोगट बोंडे जमा करून त्यांचा नायनाट करावा. 
4) कॉपर ऑक्‍झिक्‍लोराइड 25 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून रोगग्रस्त पिकावर फवारणी करावी.

10) मर :

रोगकारक बुरशी - फ्युजेरियम ऑक्‍झिस्पोरम फॉ. स्पे. व्हेसीनफेक्‍टम 

लक्षणे 

1) रोगग्रस्त पाने प्रथम मलूल होऊन पिवळी होऊन गळून पडतात. 
2) झाडाच्या काही फांद्या अथवा पूर्ण झाड वाळते. 
3) रोगग्रस्त झाडाचे सोटमूळ उभे चिरल्यास आतील भागात काळसर तपकिरी रंगाची रेषा आढळते.

एकात्मिक रोग व्यवस्थापन

1) रोगप्रतिबंधक जातींची लागवड करावी. 
2) तंतुविरहित व बीजप्रक्रिया केलेले बियाणे पेरणीकरिता वापरावे. 
3) कार्बोक्‍झीन 1 ग्रॅम अधिक थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करून घ्यावी. सावलीत बियाणे वाळवावे. त्यानंतर ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. 
4) रोगग्रस्त झाडे उपटून त्यांचा नायनाट करावा.



Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download    Agrojay    Mobile Application:    http://bit.ly/Agrojay )



Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology