मृग बहार व्यवस्थापणातून मिळवा पेरुपासून अधिक उत्पन्न
मृग बहार व्यवस्थापणातून मिळवा पेरुपासून अधिक उत्पन्न
Agrojay Innovations Pvt. Ltd.
पेरू हे समशीतोष्ण हवामानातील प्रमुख फळपीक आहे. भारतात २६८.२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरूच्या फाल्बह्गा असून दरवर्षी ३६६७.९ हजार टन उत्पादन मिळते. भारताची उत्पादकता १३.७ टन प्रति हेक्टर ऐवढी आहे. जगात पेरू उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर आहे. पेरू हे व्यापारीकदृष्ट्या महत्त्वाचे फळपीक आहे. पेरू उत्पादन करणाऱ्या राज्यात क्षेत्र आणि उत्पादांच्या दृष्टीने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार ही राज्ये आघाडीवर आहेत. देशाच्या एकूण उत्पादनापैकी ९.५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात पेरूच्या बागा प्रामुख्याने अहमदनगर, नाशिक, पुणे, औरंगाबाद, वर्धा, सातारा या जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात ४० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरूच्या फळबागा असून महाराष्ट्राचे एकूण उत्पादन ३२४ हजार टन असून उत्पादकता ८.१ टन प्रति हेक्टर इतकी आहे.
पेरूमध्ये खनिजे व जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. पेरू तंतुमय पदार्थ व क जीवनसत्वाचा प्रमुख स्त्रोत असून ती अनुक्रमे ६.९ टक्के व २२९ मि. ग्रॅम प्रति ग्रॅम एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळतात. पेरुपासून उष्मांक, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, काल्सियम, लोह, इ. मिळते.
बहार नियोजन :
समशीतोष्ण हवामानात पोषक हवामानामुळे फळझाडांच्या वाढ सतत चालू राहते. त्यामुळे त्यांना वर्षभर फुले-फळे येतात. अतिथंड हवामानात/थंडीमध्ये झाडे सुप्तावस्थेत जातात व तापमानात वाढ झाल्यानंतर झाडांना पालवी फुटते व फुले-फळे लागतात. अशा वातावरणात बहार धरण्याची आवश्यकता नसते, परंतु समशीतोष्ण हवामानात एकाच वेळी फळधारणा करण्यासाठी बहार धरणे गरजेचे असते. बहार धरताना जमिनीच्या प्रकारानुसार झाडांचा पाणीपुरवठा थांबवून, मशागतीने काही प्रमाणात मुळ उघडी करून त्यांचे कार्य थांबविण्यात येते. ठराविक काळासाठी झाडांची सुप्तावस्था पानगळ करून टिकवली जाते. या काळात झाडाची शाखीय वाढ कमी होते व त्यामधील कर्बयुक्त पदार्थांचा संचय वाढतो.
कर्बयुक्त पदार्थांमध्ये वाढ झाल्यामुळे फुले-फळे येण्यासाठी आवश्यक असलेले कार्बन : नायट्रोजन गुणोत्तर ३:२ होऊन नवीन फुटींबरोबर फुले येतात व एकाच वेळी मोठ्या प्रमाणात फळधारणा होते.
पेरूला नैसर्गिकरीत्या ३ वेळा बहार येतो. आंबे बहरात झाडांना जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात फुले तर जुन-ऑगस्ट महिन्यात फळे येतात. मृग बहारात झाडांना जून-जुलै महिन्यात फुले तर नोव्हेंबर-जानेवारी महिन्यात फळे येतात आणि हस्त बहारात झाडांना सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात फुले तर मार्च-मे महिन्यात फळे येतात. तिन्ही काळात बहार येत असला तरी प्रत्येक वेळी तो अल्प प्रमाणात येतो. तसेच एकाच वेळी झाडावर वेगवेगळ्या बहाराची फळे असल्याने त्यांचे पोषण होत नाही.
हवामान, पाणीपुरवठा, कीड-रोगांचा प्रादुर्भाव या गोष्टींचा विचार करता पेरूमध्ये मृग बहार धरणे योग्य ठरते. मुग बहारासाठी एप्रिल-मे महिन्यात पाणी बंद करावे लागते. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असल्यामुळे बागेला ताण देणे सोयीचे होते तसेच मृग बहाराची फळे डिसेंबर-जानेवारीमध्ये तयार होत असल्यामुळे फळांची प्रत उत्तम असते. बहार धरताना झाडांना ताण देण्यासाठी ४०-५० टक्के पानगळ होईल, अशारितीने जमिनीचा दर्जा लक्षात घेऊन ३० ते ६० दिवस पाण्याचा ताण द्यावा. झाडांना ताण देण्याच्या कालावधीत जमिनीची हलकी नांगरणी करावी. पानगळ होण्यासाठी ५ टक्के युरियाची किंवा १.५ ते २ पी.पी.एम. ईथेलची फवारणी करावी.
ताण तोडताना शिफारशीनुसार शेणखत आणि रासायनिक खतांच्या मात्रा देऊन त्यास हलके पाणी द्यावे नंतर हळूहळू वाढवत जावे. काही दिवसांतच झाडांना नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते. या काळात वाळलेल्या फांद्या छाटून सरळ, जोरकस वाढणाऱ्या फांद्या ठेवाव्यात.
खत व्यवस्थापन :
झाडांच्या चांगल्या वाढीसाठी व दर्जेदार उत्पदनासाठी रासायनिक व सेंद्रिय खतांचा नियमीत पुरवठा करणे आवश्यक आहे. खतांची गरज झाडांच्या वयानुसार वाढत जाते. जमिनीची हलकी मशागत करून झाडास ४ ते ५ घमेले शेणखत व नंतर ४५० ग्रॅम नत्र, १५० ग्रॅम स्फुरद व ३०० ग्रॅम पालाश झाडाला घालून हलक्या प्रमाणत पहिले पाणी द्यावे. बहार धरताना परत याच प्रमाणात शेणखत व रासायनिक खत देऊन झाडांना पाणी द्यावे.
पाणी व्यवस्थापन :
पेरूच्या झाडाची जोमदार वाढ होण्यासाठी झाडांना नियमित पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. पाणी देताना पाण्याचे प्रमाण हे हंगाम, झाडाचे वय व वाढीची अवस्था यावर गोष्टीं विचारात घेऊन ठरवावे. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनपद्धतीचा वापर करावा. इतर पद्धतींपेक्षा हि पद्धत सर्व दृष्टीने सोयीस्कर व फायदेशीर आहे, यामुळे ४३ टक्के पाण्याची बचत होऊन ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत उत्पन्न वाढते. उन्हाळ्यात ६ ते ७ दिवसांनी, हिवाळ्यात १० ते १२ दिवसांनी पाणी तर पावसाळ्यात जमिनीची ओल पाहून पाणी द्यावे. यात जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता पाहून बदल करावा.
बहार धरताना ताण देतेवेळी ताण जरुरीपेक्षा जास्त लांबवू नये, त्यामुळे झाडाच्या मुळांवर विपरीत परिणाम होऊन झाडे कमकुवत होण्याचा धोका असतो. भारी व अयोग्य निचरा असणाऱ्या जमिनीत नांगरणी करावी त्यामुळे मुळांची छाटणी होऊन पाणीपुरवठा कमी होतो व झाडाची वाढ कमी होते. ताण सुरु करण्याअगोदर पूर्वीच्या बहाराची सर्व फळे झाडावरून काढावीत. बागेचे पाणी हळूहळू कमी करत जाऊन नंतर पूर्ण बंद करावे. जमिनीची हलकी मशागत करून सर्व तण काढून टाकावे. झाडावरील सुकलेल्या व वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्यात.
कीड व रोग व्यवस्थापन :
पेरूवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व्यवस्थित निचरा होणाऱ्या जमिनीत झाडांची लागवड करावी. लागवड करण्यापूर्वी २ टक्के कार्बेन्डेझिनच्या द्रावणात रोपे ओले करावीत. किडी व रोगाचे लक्षणे आढळल्यास लगेच उपाय योजना कराव्यात. प्रादुर्भाव झालेले झाडाचे भाग काढून टाकून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून किडी व रोग बागेत पसरणार नाहीत. फळमाशी, पिठ्या ढेकूण, सुत्रकृमी इ. किडी तर मर, देवी, करपा इ. रोग पेरूवर आढळतात. त्यांचे नियंत्रण शिफारशीनुसार दिलेल्या फवारण्या नियमित करून करावी.
फळ काढणी :
सर्वसाधारणपणे बहार धरल्यापासून ५ ते ६ महिन्यात पेरूची फळे काढणी योग्य होतात. मृग बहाराची फळे नोव्हेंबर महिन्यापासून तयार होण्यास सुरुवात होते. पेरूची काढणी बाजारपेठेनुसार केली जाते. स्थानिक बाजार्पेठेकारिता पूर्ण वाढ झालेली पोपटी रंगाची फळे काढली जातात तर दूरच्या बाजार्पेठेकारिता हिरवी पूर्ण वाढ झालेली फळे काढली जातात. जास्त भाव मिळण्यासाठी सर्व काढलेली फळे एकत्रित करून त्यांचे वजन, आकारमान, रंग इ. वरून प्रतवारी करावी. वाहतुकीमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी व वाहतूक सुलभ करण्यासाठी फळांचे पॅकिंग करावे. यासाठी विविध प्रकारच्या पेट्या, करंड्या, खोके, गोण्या, कोरोगेटेड फायबर बोर्ड बॉक्स, इ. वापर करण्यात येतो.
Comments
Post a Comment