नाचणीचे आहारातील महत्त्व आणि मूल्यवर्धित उत्पादने

 नाचणीचे आहारातील महत्त्व आणि मूल्यवर्धित उत्पादने

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download   Agrojay   Mobile Application:   http://bit.ly/Agrojay)

नाचणी धान्यामध्ये असणार्या सत्त्वयुक्त अन्नघटकांचा विचार करता मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याच्या पद्धतीचा सखोल माहितीचा समावेश या लेखात केला आहे.
 
आहाराच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. नाचणीमध्ये असणार्या पौष्टिक घटकांचा विचार करता या धान्यास तत्सम तृणधान्य न संबोधता सत्वयुक्त धान्य संबोधले जाते. सध्या प्रचलित असणारी महत्त्वाची तृणधान्ये म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, भात, मका सर्वसामान्य माणसाच्या आहारात वापरली जातात. नाचणी धान्यामध्ये चांगल्या प्रतीचे पोषक तंतुमय भाग असल्याने बद्धकोष्ठता होत नाही. त्याचप्रमाणे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होऊन पचनक्रियेवेळी ग्लुकोज शर्करा हळूहळू रक्तप्रवाहात मिसळली जाते. नियमित नाचणी सेवन करणार्या लोकांमध्ये हृदयरोग, आतड्यावरील व्रण आणि मधुमेहाचे प्रमाण कमी असल्याचे आढळून येते.
 
सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि आहारातील अनियमिततेमुळे माणसांना निरनिराळ्या आजाराने ग्रासले आहे. त्यामध्ये मधुमेहाचा वरचा नंबर लागतो. मधुमेह हा आजार आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टीने नाचणीयुक्त आहाराला फार महत्त्वाचे स्थान आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार सन 2005 मध्ये भारताचे 57 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रासलेलेल आहेत. महुमेहामुळे हृदयविकाराचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. त्याचप्रमाणे डोळ्यांतील मोतीबिंदू मधुमेही रुग्णांमध्ये अधिक दिसून येतो. नाचणी धान्यामध्ये असणार्या सत्त्वयुक्त अन्नघटकांचा विचार करता नाचणीचे पीठ तयार करून त्यापासून चपाती, रोटी, आंबील, शेवया, पापड अशा असंख्य स्वरूपाची मूल्यवर्धित उत्पादने भाजून, उकडून, वाफवून किंवा अंबवून केली असता अत्यंत सत्त्वयुक्त होतात. नाचणीचे विविध पदार्थ बनविण्याचे कौशल्य मिळवून सातत्याने त्याचे सेवन केल्यास प्रकृती उत्तम राहते. त्याचबरोबर विक्रीयोग्य पदार्थ बनवून त्याची विक्री केल्यास आर्थिक मदतही होते.
 
या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरच लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्ये असतात. नाचणीत असणार्या कॅल्शियमच्या विपुल साठ्यामुळे खेळाडू, कष्टाचे काम करणारे, वाढत्या वयाची मुले यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देतात. नाचणीचे हे पीक दुर्गम, आदिवासी भागातील हलक्या व वरकस जमिनीत घेतात. नागली हे दुर्गम भागातील लोकांचे प्रमुख अन्नधान्य आहे. ते सर्व प्रकारच्या जमिनींत येणारे हे पीक आहे. नाचणीचे बी मुठीने जमिनीवर फेकून लागवण करतात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये नागलीचा वापर पुष्कळ प्रमाणात केला जातो आणि विशेष म्हणजे कष्टकरी वर्गात तो अधिक होतो. त्यामुळे त्यांचे स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी मदतच होते.
 
आपण अन्नघटकांचा विचार करताना राखेचा किंवा कार्बनचा विचार करत नाही. वास्तविक हाच घटक पित्तशामक असतो. आपल्याकडे पिकणारी परदेशी ओटस या दोन्हीमध्ये हे प्रमाण 3 टक्के असते. म्हणूनच पित्तशमनासाठी आपण आंबिल घेतो. मेंदूला चेतना देणारे काही घटक आहेत. उदा. विशिष्ट फॉस्फेटस ही केळी आणि नाचणी यात भरपूर असतात. म्हणूनच केळाचे दह्यामध्ये केलेले शिकरण आणि नाचणीची भाकरी ही लहान मुलांच्या (वाढीच्या वयात) वाढीसाठी अनुपम ब्रेन टॉनिक आहे.
 
नाचणीचे आरोग्यदायी फायदे :
 
1) नाचणीमध्ये प्रथिनांचे प्रमाण 7 ते 10 टक्के असते. नाचणी हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त आहे. यात तंतुमय पदार्थाचे (फायबर) प्रमाण मुबलक असल्याने बद्धकोष्ठता होत नाही, तसेच धाग्यांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहींसाठी नाचणी फायदेशीर आहे.

2) स्निग्ध पदार्थ व कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असल्याने हृदयरोग्यांसाठी उपयुक्त आहे. शीतल असल्याने शरीरातील उष्णता कमी होते. यामध्ये नैसर्गिक लोह असते. त्यामुळे लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ऍनिमिया’ आजार टाळण्यासाठी नाचणीचे पदार्थ आहारात आवश्यक आहेत.

3) नाचणी पचण्यास हलकी असल्याने आजारातून उठलेल्यांना नाचणीची पेज, आंबिल, भाकरी आरोग्यदायी ठरते. नाचणी ही काटकपणा आणते. यामुळे खेळाडूंच्या आहारात नाचणी असलीच पाहिजे.

4) नाचणीचे साजूक तुपातले लाडू, नाचणी शिरा, नाचणीची पेज हे खेळाडूंसाठी चांगले पौष्टिक पदार्थ आहेत. पित्ताचे विकार, अजीर्ण, अल्सर, ग्लुटेन अॅलर्जी, पचनसंस्थेची शस्त्रक्रिया झालेल्यांना नाचणी पथ्यकारक आहे. नाचणीला मोड आणल्यानंतर वाळवून नंतर त्याचे पीठ केल्यास त्याचे पोषणमूल्य वाढते.

5) नाचणीला मोड आणल्यानंतर त्यातील लोहाचा बाधक ठरणारा घटक (टॅनिन) कमी होतो व लोहाचे शोषण शरीरामध्ये जास्त होऊ शकते. नाचणीत इतर धान्यांच्या तुलनेत मुबलक कॅल्शिअम असल्याने हाडे व स्नायू बळकट होतात. त्यामुळे याचे प्रक्रियायुक्त पदार्थ लहान मुले, अशक्त व आजारी व्यक्ती, गर्भवती माता यांसाठी उपयुक्त असतात.

6) नाचणीत विविध प्रकारची शरीरोपयोगी अमिनो आम्ले उपलब्ध असतात. ट्रिप्टोफॅन हे अमिनो आम्ल नाचणीमध्ये अधिक प्रमाणात असल्याने भूक कमी करण्यासाठी व वजन कमी करण्यासाठी नाचणी उपयुक्त आहे.

7) वॅलीन हे आम्ल चयापचयासाठी उपयुक्त आहे. शरीराची झीज भरून काढते, मानसिक थकवा कमी करते. मिथीऑनीन हे आम्ल केसाचे व त्वचेचे आरोग्य चांगले ठेवते. लेसिथीन या अमिनो आम्लामुळे पित्त कमी होण्यास मदत होते.
 
नाचणीतील प्रमुख पोषकद्रव्यांचे प्रमाण :

1. ऊर्जा (कॅलरी) : 336
2. कर्बोदके (ग्रॅम-72)
3. प्रथिने (ग्रॅम)- 7.7
4. स्निग्ध पदार्थ (ग्रॅम) : 1.3
5. तंतुमय पदार्थ (फायबर) (ग्रॅम)- 3.6
6. कॅल्शिअम (मि.ग्रॅ.)- 344
7. फॉस्फरस (मि.ग्रॅ.)- 283
8. लोह (मि.ग्रॅ.)- 3.9 



Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download   Agrojay   Mobile Application:   http://bit.ly/Agrojay)


Comments

Popular posts from this blog

How to Prevent Soil Erosion on Farmlands

Agrojay Fruit and Vegetable Processing an Agricultural Industry

वांगी लागवड