सीताफळ प्रक्रियेसाठीच्या संधी

 सीताफळ प्रक्रियेसाठीच्या संधी

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download   Agrojay   Mobile Application:   http://bit.ly/Agrojay)

हंगामात भरपूर सीताफळांचे उत्पादन होते त्या वेळी त्यांचे दर कोसळतात व उत्पादकांचे नुकसान होते. अशावेळी आपण फळांच्या गरापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून ठेवल्यास बाजारातील फळांचे दर स्थिर राखण्यास मदत होऊन आर्थिक फायदाही होतो. त्याचबरोबर फळांचा आस्वाद आपणास वर्षभर घेता येईल.
 
सीताफळ हे उष्ण, तसेच समशितोष्ण व कोरड्या हवामानाच्या प्रदेशात चांगले वाढणारे झाड आहे. हे फळ झाड जमिनीच्या बाबतीत फार चोखंदळ नाही. या फळ झाडास कोणताही प्राणी खाण्यास धजवत नाही, तसेच हानिकारक किडी व रोग या झाडावर दिसून येत नाहीत. म्हणून या झाडाची विशेष अशी काळजी न घेतादेखील चांगले उत्पादन मिळते. म्हणून या झाडाच्या लागवडीकडे शेतकरी वळू लागले आहेत. हे झाड आकाराने छोटे असते व उभट वाढणारे असल्याने प्रतिहेक्टरी झाडांची संख्या जास्त बसते. त्यामुळे प्रतिहेक्टरी उत्पादन चांगले मिळते. या झाडास पाणीदेखील फार कमी लागते. कमी पावसाच्या प्रदेशात याच्या लागवडीस चांगला वाव आहे. 
 
सीताफळाच्या पानांमध्ये अॅकोरिन आणि आोनोनीन ही अल्कालॉईडस् असतात. त्यामुळे कोणताही प्राणी याची पाने खात नाही. पानांचा लेप डोकेदुखीवर गुणकारी आहे. झाडामध्ये हायड्रोसायानिक आम्ल असल्यााने त्या झाडास वाळवी लागत नाही. सीताफळाच्या बियांपासून काढलेल्या तेलाचा उपयोग साबण तयार करण्यासाठी होतो. तसेच त्यातून निघालेल्या पेंडीचा उपयोग खत म्हणून केला जातो.
 
सीताफळाची फळे तयार होण्यास फलधारणेपासून जातीपरत्वे 135-150 दिवस लागतात. हे फळ झाडावरून काढल्यानंतर पिकते. म्हणून त्याची काढणी पूर्ण वाढीच्या वेळी करतात. डोळा पडलेली सीताफळे काढल्यास दोन-तीन दिवसांत पिकून खाण्यास तयार होतात. फळे अत्यंत नाशवंत असल्याने त्यांची 2-3 दिवसांपेक्षा जास्त काळ साठवण करता येत नाही. गरामध्ये पोषणमूल्य चांगली असते. पिकलेल्या सीताफळामध्ये शर्करा, प्रथिने व लोह यांचे प्रमाण भरपूर असते. 

सीताफळाची पिकलेली फळे खाण्यासाठी वापरली जातात. सीताफळाचा गर आईस्क्रीममध्ये मोठ्या प्रमाणावर वापरतात. तसेच गरापासून जॅम, जेली, पावडर, टॉफी, श्रीखंड, रबडी, मिल्कशेक इत्यादी पदार्थ तयार करता येतात. सीताफळाचा गर नियमित सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो. सीताफळाच्या पिकलेल्या फळाच्या सालीचा उपयोग जखमा बरा करण्यासाठी होतो. सीताफळाच्या बियांचा लेप जनावरांच्या जखमा बर्या करण्यासाठी केला जातो. फळाचा गर शुक्राणूवर्धक, तृष्णावर्धक, बलवर्धक, उत्साहवर्धक, पचणशक्ती वाढविणारा व पित्तविकार कमी करणारा आहे. फळे हाडांच्या व दातांच्या मजबुतीसाठी उपयोगी असतात. तो हृदयाची कार्यक्षमता वाढवतो तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा आहे. सीताफळाच्या मुळ्यांच्या काढ्याचा वापर कर्करोगासाठी केला जातो.
 
सीताफळ हे अत्यंत नाशवंत असे फळ आहे. पिकल्यानंतर 1-2 दिवसांपेक्षा जास्त काळ साठविता येत नाही. फळांचा हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत असतो. पिकलेल्या सीताफळामध्ये सर्वसाधारणपणे 50 : गर, 20 : टीएसएस व 0.30 : आम्लता असते. हंगामात भरपूर उत्पादन होते. त्या वेळी त्यांचे दर कोसळतात व उत्पादकांचे नुकसान होते. अशावेळी आपण फळांच्या गरापसून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून ठेवल्यास बाजारातील फळांचे दर स्थिर राखण्यास मदत होईल व फळांचा आस्वाद आपणास वर्षभर घेता येईल. सीताफळाच्या गरापासून आपल्याला पुढील मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. उदा. सीताफळाचा गर काढून साठविणे, गराची पावडर, टॉफी, जॅम, पेये, नेक्टर, सिरप, मिल्कशेक, रबडी, आइस्क्रीम, श्रीखंड इत्यादी, तसेच गराचा वापर विविध मिठाई, बेकरी व कन्फेक्शनरीमध्ये केला जातो. म्हणून फळांचा गर काढून साठवून ठेवल्यास कोणतेही पदार्थ तयार करण्यासाठी वापरता येतो. या पदार्थांना स्थानिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी असते. म्हणून आपणास सीताफळाच्या प्रक्रियेसाठी फार मोठा वाव आहे.
 
1. सीताफळाचा गर काढून साठविणे :

यासाठी प्रथम पिकलेली निरोगी चांगली सीताफळे निवडून घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. नंतर फळांचे हाताने फोडून दोन भाग करावेत व बियांसहित गर अलगदपणे चमच्याने काढून घ्यावा. हा काढलेला गर मिक्सरला लावून 1 मिमी स्टेनलेसस्टीलच्या चाळणीतून काढून घ्यावा किंवा पल्परला लावून घ्यावा. म्हणजे बिया व गर वेगळा होतो. हा गर स्टेनलेसस्टीलच्या पातेल्यामध्ये घेऊन त्यामध्ये 500 पीपीएम अॅस्कॉर्बिक आम्ल व 700 पीपीएम पोटॅशियम मेटाबाईसल्फाइट टाकूण गरम करून, निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये किंवा रिटॉर्टेबल पाऊचेसमध्ये भरून, हवाबंद करून परत पाश्चराइज करून थंड करून, लेबल लावून थंड ठिकाणी (शीतगृहात) साठवूण ठेवाव्यात. हा गर साठवण कालावधीमध्ये काळा पडण्याची शक्यता असते, म्हणून तो थंड तापमानाला ठेवावा. तसेच या पद्धतीशिवाय त्या काढलेल्या गरामध्ये 500 पीपीएम अॅस्कॉर्बिक आम्ल व 700 पीपीएम केएमएस घालून तो उणे 20 अंश सें. तापमानास गोठवून ठेवल्यास तो एक वर्षापर्यंत चांगला राहतो. तो गर आपणास विविध पदार्थ तयार करण्यासाठी वर्षभर वापरता येतो. या गोठविलेल्या सीताफळाच्या गरास स्थानिक, तसेच परदेशी बाजारपेठांत चांगली मागणी असते. असे उद्योग सासवड परिसरामध्ये काही प्रमाणावर सुरू आहेत.

2. सीताफळाच्या गराची पावडर :

वरील पद्धतीने काढलेला गर घेऊन त्यामध्ये 500 पीपीएम अॅस्कॉर्बिक आम्ल व 700 पीपीएम पोटॅशियम मेटाबाईसल्फाइट व 2-3 : माल्टो डेक्स्ट्रीन घालून स्प्रे ड्रायरमध्ये किंवा ड्रम ड्रायरमध्ये 5-8 : पाण्याचा अंश येईपर्यंत वाळवावा. नंतर तयार झालेली पावडर निर्वात केलेल्या पॉलिथिनच्या पिशवीमध्ये भरून, थंड ठिकाणी साठवून ठेवावी. अशाप्रकारे तयार केलेली पावडर आपणास आईस्क्रीममध्ये, कन्फेेक्शनरीमध्ये तसेच श्रीखंड, मिल्कशेक, टॉफी इत्यादी पदार्थ तयार करताना वापरता येते. या पावडरला परदेशी बाजारपेठांमध्ये चांगली मागणी असल्याने ती मोठ्या प्रमाणावर तयार करून निर्यात करण्यास फार वाव आहे.
 
3. सीताफळाचा जॅम :

वरील पद्धतीने काढलेल्या गरामध्ये गराच्या वजनाएवढी साखर टाकून ते गरम करावे व सतत ढवळत राहावे. नंतर यामध्ये 2-5 ग्रॅम प्रतिकिलो गर या प्रमाणात सायट्रिक आम्ल घालून ते मिश्रण घट्ट होईपर्यंत म्हणजेच तुकड्यांत पडेपर्यंत शिजवावे. या वेळी त्या मिश्रणाचा टीएसएस 68-69 : असतो. तयार झालेला जॅम निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून, बाटल्या थंड करून, त्यावर मेणाचा थर देऊन किंवा अॅल्युमिनियम फॉइल लावून, हवाबंद करून झाकणे लावून लेबल करून, थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.
 
4. सीताफळाचे सरबत :

सीताफळाच्या गराचे सरबत करण्यासाठी वरीलप्रमाणे काढलेला गर 15 : साखर 15 : व सायट्रिक आम्ल 0.25 : घेऊन उत्तम प्रकारे सरबत करता येते. यासाठी प्रथम गर घेऊन त्यामध्ये प्रमाणात मोजून घेतलेली साखर, सायट्रिक आम्ल व पाणी घालून ते चांगले ढवळूण घ्यावे व ते मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. थंड झाल्यावर त्याचा अस्वाद घ्यावा. जर हे सरबत जास्त काळ साठवूण ठेवायचे असल्यास ते गरम करून त्यामध्ये 100 पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाइट घालून निर्जंतुक केलेल्या 200 मिलीच्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून, झाकण लावून परत पाश्चराइज करून, थंड करून, लेबल लावून थंड ठिकाणी साठवून ठेवाव्यात. अशा तर्हेने तयार केलेले सरबत 1-2 महिने टिकवून ठेवता येते.

5. सीताफळाची रबडी :

सीताफळाची रबडी तयार करण्यासाठी वरीलप्रमाणे काढलेला गर 1 किलो घेऊन त्यामध्ये 900 ग्रॅम दूध व 100 ग्रॅम साखर मिसळून चांगले ढवळून घेऊन गाळून घ्यावे व ते मिश्रण 15 ते 20 मिनिटे गरम करावे. थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवून त्याचा आस्वाद घ्यावा.

6. सीताफळाचे श्रीखंड :

सीताफळाचा गर किंवा पावडर वापरून उत्तम प्रतीचे श्रीखंड तयार करता येते. या श्रीखंडास चांगला स्वाद असतो. यासाठी वरीलप्रमाणे काढलेला गर 100 ग्रॅम, साखर 500 ग्रॅम व 400 ग्रॅम चक्का हे घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. त्यामध्ये ड्रायफ्रुटस् टाकून फ्रिजमध्ये ठेवून थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यावा.

7. सीताफळाचा मिल्कशेक :

सीताफळाचा गर किंवा पावडर वापरून उत्कृष्ट प्रतीचा मिल्कशेक तयार करता येतो. यासाठी गायीचे किंवा म्हशीचे स्वच्छ दूध गाळून घेऊन गरम करून ते प्रमाणित करावे. नंतर ते 70 अंश से. तापमानास 15 मि. गरम करावे व त्यामध्ये 0.40 टक्के सोडियम अॅल्जीने घालून 10 टक्के साखर व 10 टक्के गर किंवा पावडर घालून ते मिश्रण चांगले गाळून घेऊन 70 अंश से. तापमानास 30 मि. गरम करावे. नंतर ते 10 अंश से. तापमानास 3 तास थंड करून घ्यावे. परत ते-2 ते -4 अंश से. तापमानाला 7 मिनिटे थंड करून मिक्सरला लावून त्याचा आस्वाद घ्यावा. सीताफळाच्या फळापासून तयार केलेले पदार्थ साठवणीच्या काळामध्ये काळपट पडण्याची शक्यता असल्याने ते थंड तापमानालाच साठवून ठेवावे लागतात. या पदार्थांना राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चांगली मागणी असते. म्हणून सीताफळापासून गर व पावडर तयार करण्याच्या उद्योगास महाराष्ट्रामध्ये फार मोठा वाव आहे.

https://www.digitalbaliraja.com

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download   Agrojay   Mobile Application:   http://bit.ly/Agrojay)



Comments

Popular posts from this blog

How to Prevent Soil Erosion on Farmlands

Agrojay Fruit and Vegetable Processing an Agricultural Industry

वांगी लागवड