डेझी लागवड

 डेझी लागवड

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download   Agrojay  Mobile Application:  http://bit.ly/Agrojay )

पिवळी डेझी फुलांच्या दांड्यांना वर्षभर मागणी असते. ही वनस्पती बहुवर्षायू असल्याने वर्षभर फुलांचा सातत्याने पुरवठा करणे शक्‍य आहे. आपल्याकडील हवामानात याची लागवड केव्हाही करता येते.

जमिनीची निवड :

लागवडीसाठी मध्यम किंवा हलक्‍या प्रकारातील उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून हेक्‍टरी 15 टन कुजलेले शेणखत मिसळावे, त्यानंतर लागवडीसाठी तीन मीटर लांब आणि दोन मीटर रुंद आकाराचे सपाट वाफे तयार करावेत किंवा सरी वरंब्यावर देखील लागवड करता येते.

गोल्डन रॉडची अभिवृद्धी सहजगत्या रोपाच्या कडेला फुटणाऱ्या फुटव्यांद्वारे करण्यात येते. फुटव्यांची लागवड 30 ु 30 सें.मी. किंवा 50 ु 50 सें.मी. अंतरावर करावी. सरीत लागवड करताना 45 ते 50 सें.मी. अंतर ठेवून रोपांतील अंतर 30 सें.मी.पर्यंत ठेवावे. शक्‍यतो संध्याकाळच्या वेळी मुनवे लावावेत.

मुनवे आणताना ते गोणपाटात गुंडाळून आणावेत आणि लगेच शेतात लावावेत. जास्त दाट लागवड केल्यास कालांतराने मुनव्यांची दाटी होते व रोपे व्यवस्थित वाढत नाहीत. अशा खुरटलेल्या वाढीवर लहान, कमी उंचीचे फुलदांडे येतात. अशा लहान दांड्यांना बाजारात फारशी मागणी नसते.

सुरवातीला तण काढून शेत स्वच्छ ठेवावे. कालांतराने रोप वाढून सर्व जागा व्यापते व त्यामुळे तण फारसे वाढत नाही; मात्र रोपाभोवती येणारे मुनवे वेळोवेळी काढावेत. फुलदांडा उंच वाढल्यानंतर प्रत्येक रोपाभोवती एक किंवा दोन मुनवे राखावेत व इतर काढून टाकावेत. पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. 

रोपांच्या जोमदार वाढीसाठी माती परीक्षणानुसार दरवर्षी हेक्‍टरी 80 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 80 किलो पालाश ही खत मात्रा द्यावी. नत्राची मात्रा दोन समान हप्त्यांत द्यावी. लागवडीनंतर दहा दिवसांनी पाच किलो ऍझोटोबॅक्‍टर किंवा ऍझोस्पिरीलम प्रति 50 किलो ओलसर शेणखतात मिसळावे. या मिश्रणाचा ढीग प्लॅस्टिकच्या कागदामध्ये आठवडाभर झाकून ठेवावा.

पाच किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणूसंवर्धक प्रति 50 किलो शेणखतात वेगवेगळे ढीग करून प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावेत. याचबरोबरीने पाच किलो ट्रायकोडर्मा 50 किलो शेणखतात वेगवेगळे ढीग करून प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावेत. आठवड्यानंतर तीनही ढीग एकत्र करून हे मिश्रण एक हेक्‍टर क्षेत्रातील पिकाला द्यावे. दर चार महिन्यांनी पिकाची खांदणी करून नत्र खताची मात्रा द्यावी. 

लागवडीनंतर 40 ते 50 दिवसांनी फुले येण्यास सुरवात होते. वर्षभर फुले येत राहतात. डेझीची फुले दांड्यासह काढावीत. दांड्याच्या खालील भागातील फुले उमलण्यास सुरवात झाल्यावर तुरे दांड्यासहित तोडावीत. दांडा जमिनीपासून खोडावर चार डोळे ठेवून कापावा. दांडा काढण्यासाठी चाकू किंवा सिकेटर वापरावे. काढलेल्या दांड्याचे कापलेले टोक पाण्यात बुडवून ठेवावे. दोन तासांनंतर दांडे काढून त्यांचे बंडल तयार करावे. एका बंडलमध्ये 10-12 काड्या/दांडे बांधावेत. 



Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download   Agrojay  Mobile Application:  http://bit.ly/Agrojay )


Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology