पपई लागवड

पपई लागवड 

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download  Agrojay Mobile Application: http://bit.ly/Agrojay )

(पोपई; हिं, पपया, पपिता; क. गुप्पे, पप्पाई, पांगी; सं. चिरभीता; ई. पपाया, पॅपॉ; लॅ. कॅरिका पपया; कुल-कॅरिकेसी), ह्या परिचित लहान ओषधीय [→ओषधि] वृक्षाचे मूलस्थान मेक्सिको असून हल्ली त्याचा प्रसार उष्ण कटिबंधातील देशांत व उपोष्ण कटिबंधातील उष्ण प्रदेशात सर्वत्र झालेला आढळतो. याचा अंतर्भाव हल्ली ⇨कॅरिकेसी कुलात (पपई कुलात) केला असून याची सामान्य शारीरिक लक्षणे त्यात वर्णिल्याप्रमाणे आहेत. कॅरिका या शास्त्रीय नावाच्या दोन किंवा अधिक जातींच्या संकराने पपईची उत्पत्ती झाली असावी, असे मानतात. याचे खोड सु. ३-४ मी. (क्वचित ६ मी.) उंच असून त्याला फार क्विचित फांद्या फुटतात. पडून गेलेल्या पानांच्या तळांचे वण (किण) खोडावर ठळकपणे दिसतात. खोडात काष्ठाचा भाग फार कमी असतो, त्यामुळे ते नरम असते. खोडाच्या शेंड्यावर मोठी, कमीजास्त विभागलेली, साधी, हस्ताकृती पाने एकाआड एक येऊन त्यांचा एक मोठा झुबका दिसतो. देठ पोकळ, जागजूड व सु. ६० सेंमी. लांब आणि पानाची पाती तितक्याच व्यासाची असतात.

नर व मादी झाडे स्वतंत्र असून त्यांवर पानांच्या बगलेतून लांब नर-पुष्पांचे घोस अथवा एकेकटी स्त्री-पुष्पे येतात. एकत्रलिंगी झाडे व द्विलिंगी फुले क्वचित आढळतात. फुले पिवळी असतात; नर-पुष्पांमध्ये पाच पाकळ्या खाली जुळून लांब नलिका बनते व वरचा भाग नसराळ्यासारखा दिसतो. त्यात आखूड तंतूंची दहा केसरदले व वंध्य किंजमंडल असते. स्त्री-पुष्पाच्या पाच मांसल पाकळ्या तळाशी जुळलेल्या परंतु वर सुट्या व बाहेरच्या बाजूस वळलेल्या दिसतात. त्यात वंध्य केसरदले आढळतात; किंजदले पाच, जुळलेली व किंजपुट ऊर्ध्वस्थ असून त्यावर पंख्यासारखा पाच भागांचा किंजल्क असतो. किंजपुटात एक कप्पा आणि अनेक बीजके आतील बाजूस तटलग्न (मित्तीय) असतात [→ फूल]. मृदुफळ मोठे, गोलसर किंवा लांबट गोल आणि पिकल्यावर बाहेरून पिवळे व आत पिवळट शेंदरी असते. साधारणपणे त्याची लांबी २०-२५ सेंमी. व व्यास १०-१५ सेंमी. असतो. पिकलेल्या फलातील मगज (गर) गोड व स्वादिष्ट असतो. बिया विपुल व गर्द पिंगट असून त्यावंर नरम बाह्यावरण वा कठीण अंतरावरण असते; बाह्यावरणाला आभासी अध्यावरण [→ बीज] म्हणतात;त्यावर बारीक पुरळ असतो. फळ पौष्टिक व उत्तम खाद्य आहे. त्यामध्ये पेक्टीन, अ आणि क ही जीवनसत्त्वे व पेपेन नावाचे प्रथिन-पाचक (प्रथिनाचे शरीरात पचन होण्यास मदत करणारे) द्रव्य असते. ते द्रव्य प्राण्यांतील पेप्सिनाप्रमाणे क्रियाशील असते. पेपेन लोकर. चीज, जेली, च्युईंग गम, सौंदर्यप्रसाधने इ. तयार करण्याच्या उद्योगात वापरतात. पाने वा कच्च्या परईचे तुकडे मांस लवकर शिजण्याकरिता त्यात घालतात; कच्ची पपई भाजीकरिता वापरतात. अग्निमांद्यावर फले उपयुक्त असतात. पेपेन औषधी उपयोगाचे आहे; ते प्लीहेचे (पानथरीचे) विकार आणि मासिक पाळीचे विकार यांवर देतात.

पपई हे सतत हिरवे रहाणारे फळझाड आहे. भारतात ते सोळाव्या शतकात आणले गेले. हल्ली त्याची लागवड हवाई बेटे, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, ऑस्ट्रेलीया, फिलिपीन्स बेटे आणि भारत या प्रदेशांत होते. भारताच्या कोरड्या तसेच पावसाळी हवामानाच्या व समुद्रसपाटीपासून १,३०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात पपई वाढू शकते. उपलब्ध माहितीप्रमाणे भारतातील पपईच्या लागवडीचे एकूण क्षेत्र १०,८४८ हे. असून सर्वात जास्त क्षेत्र (३,८८० हे.) बिहार राज्यात आहे. आसाममध्ये २,०४१ हे., मध्य प्रदेशात २,००० हे. आणि महाराष्ट्र व गुजरात मिळून १,२३६ हे. क्षेत्र आहे आणि इतर राज्यांत १,४१७ हे. क्षेत्र आहे.

हवामान :कोरड्या उष्ण हवामानात आणि योग्य पाणीपुरवठा असेल अशा ठिकाणी पपईची वाढ चांगली होते. २° से. च्या खालील तापमान पपईला मानवत नाही. थंड हवामानात तयार झालेली फळे बेचव असतात.

जमीनपपईच्या लागवडीला मोकळी, पाण्याचा निचरा चांगला होणारी तसेच जैव पदार्थांचा भरपूर पुरवठा असलेली जमीन चांगली असते. गाळाच्या जमिनीत त्याचप्रमाणे भारताच्या दक्षिणेकडील भागातील मध्यम काळ्या जमिनीत पपई चांगली वाढते. खडकाळ चुनखडीच्या व जैव पदार्थांचा अभाव असलेल्या तसेच भारी काळ्या व खोलगट जमिनीत परईची वाढ चांगली होत नाही. या पिकाच्या बाबतीत पाण्याच्या निचऱ्याला फार महत्त्व आहे. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न झाल्यास रोगामुळे खोड बुंध्याशी कुजते.लागवड
रोपे लावून लागवड करतात. नांगरणी, भरखत घालणे, कुळवणी वगैरे मशागत केलेल्या जमिनीत कमी पावसाच्या प्रदेशात पावसाळ्याच्या सुरुवातीला व जास्त पावसाच्या प्रदेशात पावसाळ्याच्या अखेरीला रोपे लावतात.

रोपे तयार करणेचांगल्या जातिवंत पुष्कळ फळे देणाऱ्या झाडाच्या पूर्ण पिकलेल्या फळांचे बी घेऊन ते धुवून स्वच्छ करून व सावलीत वाळवून साठवून ठेवतात. रोपे करण्याकरिता ताजे बी नेहमी चांगले असते. लागवडीच्या वेळेच्या आधी सु. दोन महिने रोपांसाठी बी पेरतात. एक हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यासाठी रोपे तयार करावयाला २५० ग्रॅ. बी पुरेसे होते. बी सामान्यतः गादी वाफ्यांत लावतात. रोपे ९ - १२ सेंमी. उंचीची झाल्यावर ती वाफ्यांतून काढून तयार केलेल्या जमिनीत कायम जागी लावतात. दोन खड्‌ड्यांमध्ये २-३ मी. हमचौरस अंतर ठेवून रोपे लावतात. रोपाच्या अवस्थेत नर आणि मादी असा भेद ओळखता येत नाही. त्यामुळे लावलेल्या रोपांमधून ४०-६० टेक्केच मादीची झाडे निघतात. बाकीची नरझाडे असतात. नरझाडाला फळे येत नाहीत म्हणून ठराविक क्षेत्रातील उत्पन्न कमी येते. हे टाळण्याकरिता एकेका आळ्यात (खड्ड्यात) दोन-तीन रोपे लावतात. रोपे वाढून त्यांना फुले आली म्हणजे नर आणि मादी असा भेद ओळखता येतो. तेव्हा सबंध बागेत दोन-चार नराची झाडे ठेवून बाकीची नराची झाडे तोडून टाकतात. त्यामुळे त्या लागवडीत कमीतकमी निग्म्यापेक्षा अधिक मादी झाडे मिळतात.

https://mr.vikaspedia.in

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download  Agrojay Mobile Application: http://bit.ly/Agrojay )


Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology