झेंडू लागवड
झेंडू लागवड
हवामान व जमीन :
महाराष्ट्रातील हवामानात झेंडूचे पीक वर्षभर घेता येते.हे पीक उष्ण-कोरड्या तसेच दमट हवामानात चांगले वाढत असले तरी झेंडू हे मुख्यत्वाने थंड हवामानाचे पिक आहे. थंड हवामानात झेंडूची वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो. जोराचा पाऊस, कडक ऊन आणि कडक थंडी या पिकाला मानवत नाही. अती थंडीमुळे झाडाचे आणि फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अति तपमानामुळे झाडाची वाढ खुंटते. फुलांच्या उत्पादन प्रक्रियेवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. फुलांचा आकार अतिशय लहान होतो. अलीकडच्या काळात झेंडूच्या काही संकरित बुटक्या जाती विकसित करण्यात आल्या असून त्या थंड हवामानात उत्तम वाढतात.झेंडू या पिकांस भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे. सावलीमध्ये झाडांची वाढ चांगली होते परंतु फुले येत नाहीत.
झेंडूचे पीक अनेक प्रकारच्या जमिनीत उत्तम वाढू शकते. हलकी ते मध्यम, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन झेंडूच्या पिकास मानवते. भारी आणि सकस जमिनीत झेंडूची झाडे खूप वाढतात. परंतु फुलांचे उत्पादन फारच कमी मिळते. तसेच फुलांचा हंगामही उशीरा मिळतो. झेंडूच्या पिकासाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली, पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि ७ ते ७.५ पर्यंत सामू असलेली जमीन चांगली मानवते. शेतीच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला जी मोकळी जागा असते तेथे गाजर, गवत या ताणाचा फैलाव दिसतो. अशा ठिकाणी कमी श्रमात व कमी खर्चात झेंडूचे पीक घेता येईल व त्यामुळे तणांचा उपद्रवही कमी होईल.ज्या जमिनीत सुतकृमींचा प्रादुर्भाव जास्त आहे अश्या जमिनीत झेंडूची लागवड करावी.पाणथळ जमिनीत झेंडूची लागवड करू नये.
जाती :
झेंडूमध्ये अनेक प्रकार व जाती आहेत, यांतील महत्त्वाच्या जाती म्हणजे आफ्रिकन झेंडू, फ्रेंच झेंडू, संकरित झेंडू. झेंडूच्या झाडाची उंची, झाडाची वाढीची सवय आणि फुलांचा आकार यावरून झेंडूच्या जातीचे हे प्रकार पडतात.हंगामानुसार आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार योग्य जातींची लागवड करावी.
अ) आफ्रिकन झेंडू - या प्रकारातील झेंडूची झुडपे उंच वाढतात. झुडूप काटक असते. पावसाळी हंगामात झुडपे १००सें.मी. ते १५० सें.मी.पर्यंत उंच वाढतात. फुले टपोरी असून फुलांना केशरी आणि पिवळ्या रंगाच्या छटा असतात. या प्रकारात पांढरी फुले असलेली जातही विकसित करण्यात आली आहे. या प्रकारातील फुले मोठ्या प्रमाणात हारासाठी वापरली जातात.
उदा. पुसा नारंगी गेंदा, पुसा बसंती गेंदा,क्रॅकर जॅक, अलास्का, ऑरेंज ट्रेझन्ट, आफ्रिकन टॉल डबल मिक्स्ड, यलो सुप्रीम, गियाना गोल्ड, स्पॅन गोल्ड, हवाई, आफ्रिकन डबल ऑरेंज, सन जाएंट, जायंट डबल, आफ्रिकन यलो, ऑरेंज, अर्ली यलो, अर्ली ऑरेंज, बंगलोर लोकल, दिशी सनशाईन, इत्यादी.
ब) फ्रेंच झेंडू - या प्रकारातील झेंडूची झुडपे उंचीला कमी असतात व झुडपासारखी वाढतात. झुडपाची उंची ३०ते ४० सें.मी. असते. फुलांचा आकार लहान ते मध्यम असून रंगात मात्र विविधता असते.या प्रकारातील जाती कुंडीत, बागेत, रस्त्याच्या दुतर्फा तसेच फुलांचा गालिचा तयार करण्यासाठी, हिरवळीच्या कडा सुशोभीकरणासाठी लावतात.
उदा.पुसा अर्पीता,स्प्रे, फ्रेंच डबल मिक्स्ड, बटरबॉल, फ्लेश, यलो बॉय, हार्मोनी बॉय, लिटल डेव्हिल, बायकलर, बटर स्कॉच, लेमन ड्वार्फ यलो, रेड मारिटा, हार्मोनी, रॉयल बेंगाल, क्विन, सोफिया, इत्यादी.
क) संकरित जाती -बाजारामध्ये विविध संकरित जाती उपलब्ध आहेत.
उदा. पिटाईट, जिप्सी, रेड हेड, इन्का ऑरेंज, इन्का यलो, हार्मनी हायब्रिड, कलर मॅजीक, क्वीन सोफी, हार बेस्टमून, इत्यादी.
प्रचलित जाती :
१) मखमली : ही जात बुटकी असून फुले लहान आकाराची असतात. या जातीची फुले दुरंगी असतात. ही जात कुंडीत लावण्यासाठी अथवा बागेच्या कडेने लावण्यासाठी चांगली आहे.
२) गेंदा : या जातीमध्ये पिवळा गेंदा आणि भगवा गेंदा असे दोन प्रकार आहेत. या जातीची झाडे मध्यम उंच वाढतात. फुलांचा आकार मध्यम असून हारासाठी या जातीच्या फुलांना चांगली मागणी असते.
३) गेंदा डबल : यामध्येही पिवळा आणि भगवा असे दोन प्रकार आहेत. या जातीची फुले आकाराने मोठी आणि संख्येने कमी असतात. कटफ्लॉवर म्हणून या जातीला चांगला वाव आहे.
४) पुसा नारंगी: या जातीस लागवडीनंतर १२३-१३६ दिवसानंतर फुले येतात. झुडुप ७३ सें.मी.उंच वाढते व वाढ देखील जोमदार असते. फुले नारंगी रंगाची व ७ ते ८ सें.मी.व्यासाची असतात.
५) पुसा बसंती: या जातीस १३५ ते १४५ दिवसात फुले येतात. झुडुप ५९ सें.मी.ऊंच व जोमदार वाढते. फुले पिवळ्या रंगाची असून ६ ते ९ सें.मी.व्यासाची असतात. प्रत्येक झुडुप सरासरी ५८ फुले देते. कुंड्यात लागवड करण्यासाठी ही जात जास्त योग्य आहे.
६) एम.डी.यू.१: झुडुपे मध्यम उंचीची असतात. ऊंची ६५ सें.मी. पर्यंत वाढते. या झुडुपास सरासरी ९७ फुले येतात. फुलांचा रंग नारंगी असतो व ७ सें.मी.व्यासाची असतात.
रोपनिर्मिती :
रोपवाटिका करण्यापूर्वी ३ बाय१ मीटर या आकारमानाचे व २० सें.मी.उंचीचे ६-७ गादीवाफे करावेत. गादीवाफ्यासाठी जमीन भुसभुशीत करावी. त्यामध्ये प्रत्येक वाफ्यात ५० ग्रॅम १९:१९:१९ व ८ ते १० किलो चांगले कुजलेले, चाळलेले शेणखत मिसळावे. त्यात ५ ग्रॅम प्रति चौ. मीटर याप्रमाणे फोरेट मिसळून घ्यावे. १० सें.मी.अंतरावर दक्षिण-उत्तर ओळी खुरप्याच्या सहाय्याने ०.५ सें.मी.खोल करून घ्याव्यात.गादीवाफ्यावर बियाणे टाकताना दोन ओळींत चार-पाच सें.मी. अंतर ठेवावे. बियाण्याची खोली दोन-तीन सें.मी. ठेवावी. बी काळे, लांब, काटक, वजनाने हलके असते. एक ग्रॅम वजनाच्या बियाण्यात सुमारे ३५० ते ४०० बिया असतात. एक एकरी लागवडीसाठी २०० ग्रॅम बी लागते. हे बियाणे सुपीक माती, शेणखत व वाळू यांचे २:१:१ याप्रमाणे मिश्रण करून या मिश्रणाने बी झाकून टाकावे. त्यावर रोज सकाळी व सायंकाळी पाण्याचा फवारा मारावा व बियाणे उगवेपर्यंत गादी वाफे, गवत पालापाचोळा किंवा पाने झाकून घ्यावे. वाफे नेहमी ओलसर म्हणजे वापसा अवस्थेत ठेवावीत. त्यापेक्षा जास्त पाणी देखील होऊ देऊ नये, किंवा पाणी कमी देखील पडू देऊ नये. रोपे तयार झाल्यानंतर मुळांसहित काढावीत. वाफे वापसा अवस्थेत असतानाच रोपे काढावीत. बियाणे पेरणीपासून २५ ते ३० दिवसाची, १५ ते २० सें.मी. उंचीची रोपे पुनर्लागवडीसाठी वापरावीत. रोपे तयार करताना जास्त काळजी घ्यावी. सुदृढ रोपांचीच लागवडीसाठी निवड करावी.
लागवड पूर्व तयारी :
लागवडीआधी जमीन एकसारखी सपाट व तणमुक्त, तसेच पाण्याचा योग्य निचरा होईल अशा पद्धतीने तयार करावी. जमीन नांगरून भुसभुशीत करून त्यानंतर छोटे छोटे वाफे तयार करावेत. तयार केलेल्या जमिनीस हलके पाणी द्यावे. खरीप हंगामात सरी-वरंबा पद्धतीने लागवड करावी, तर उन्हाळी व रब्बी हंगामात उंच सपाट वाफ्यांत लागवड करावी. एकरी१० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत मिसळून २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ८० किलो पालाश लागवडीपूर्वीच जमीनीत पूर्णपणे मिसळून घ्यावे.
लागवड पद्धत:
१) आंतरपीक- नवीन फळबागेत पट्टा पद्धतीने
२) मिश्र पीक – भाजीपाला पिकात
३) स्वतंत्र लागवड
लागवड:
झेंडूची लागवड पावसाळी, हिवाळी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते. मात्र झेंडू हे थंड हवामानातील पीक असून, थंड हवामानात झेंडूची वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो.
लागवडीपुर्वी जमिनीचा मशागत करून वरीलप्रमाणे खते आणि २५ किलो १० टक्के लिंडेन अथवा कार्बारिल मातीत मिसळून सपाट वाफे अथवा सरी वाफे तयार करून घ्यावेत. जातीनुसार तसेच हंगामानुसार झेंडू लागवडीसाठी दोन ओळीत, दोन झाडात खालीलप्रमाणे अंतर राखावे.
लागवड करताना प्रत्येक ठिकाणी निवडक असे एकच रोप लावावे.पूर्ण लागवड करताना शक्यतो दुपारनंतर करावी. रोपांची लागवड करताना बरोबर अंतर ठेवून खड्ड्याच्या मधोमध रोप लावावे व दोन्ही हातांच्या बोटांनी दाबावे. यामुळे रोपे कोलमडून खाली पडणार नाहीत. पूर्ण लागवडीनंतर लगेच हलकेसे पाणी द्यावे.६० बाय ३० सें.मी.अंतरावर लागवड केल्यास एकरी१६ हजार रोपे लागतात.
अन्नद्रव्ये व पाणी व्यवस्थापन :
फुलांचे एकसारखे आणि भरपूर उत्पादन मिळविण्यासाठी वरखते देणे आवश्यक आहे. लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार एकरी २० किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश मिळेल याप्रमाणे खत द्यावे. फक्त नत्रयुक्त खत अथवा अधिक नत्र वापरल्यास पिकाची शाखीय वाढ जास्त होते,परिणामी फुलांच्या उत्पादनात घट होते. लागवडीनंतर १ महिन्याने २० किलो नत्राचा दुसरा हप्ता देऊन झाडांना मातीची भर लावावी.लागवडीनंतर ८-१० दिवसांनी ४ किलो ऍझोटोबॅक्टर किंवा ऍझोस्पिरिलम २५ किलो ओलसर शेणखतात मिसळावे. या मिश्रणाचा ढीग करून तो ढीग प्लॅस्टिकच्या कागदाने आठवडाभर झाकून ठेवावा. अशाच प्रकारे ४ किलो स्फुरद विरघळवणारे जिवाणू खत आणि ४ किलो ट्रायकोडर्मा प्रत्येकी २५ किलो ओलसर शेणखतामध्ये वेगवेगळे ढीग करून आठवडाभर प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावेत. एका आठवड्यानंतर हे तिन्ही ढीग एकत्र मिसळून एक एकर क्षेत्रातील झेंडूच्या पिकाला द्यावे. यानंतर एका आठवड्याने शेंडाखुडीचे काम पूर्ण करावे, त्यामुळे बाजूस फांद्या फुटतात आणि फुलांची संख्या भरपूर वाढते.
झेंडूच्या पिकाला पावसाळ्यात आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. झाडांना कळ्या आल्यापासून तोडणी संपेपर्यंत पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. तसेच याच काळात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देऊ नये. हिवाळी हंगामातील पिकासाठी ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे व उन्हाळी हंगामासाठी ५ ते ७ दिवसांनी पाणी द्यावे.
आंतरमशागत :
लागवडीनंतर १५ दिवसांनी पहिली खुरपणी करावी. त्यानंतर १५ दिवसांनी २० किलो नत्राचा दुसरा हप्ता देऊन झाडांना मातीची भर लावावी.त्याचवेळी रोपाचा शेंडा खुडावा म्हणजे झेंडूच्या रोपास भरपूर फांद्या फुटतात व उत्पादन चांगले येते.
आंतरपिक:
झेंडूचे पीक स्वतंत्र किंवा इतर पिकांत मिश्र पीक म्हणून घेता येतो. विशेषत: फळपिकांमध्ये झेंडूचे पीक आंतरपीक म्हणून घेता येते. काही प्रयोगांवरून असे दिसून आले आहे की, द्राक्षबागेत आणि पपईच्या पिकात झेंडूचे आंतरपीक घेणे फारच उपयुक्त ठरते. झेंडू पीक घेतल्यास निमॅटोडचा उपद्रव कमी होतो. पावसाळ्यात घेतल्यास फुलांचा हंगाम दसरा सणापर्यंत संपविता येतो. मिश्र पीक म्हणून लागवड करताना झेंडूच्या बुटक्या व हलक्या जाती निवडणे आवश्यक आहे .
पीक संरक्षण :
कीड :
१) लाल कोळी (रेड स्पायडर माईट) : या किडीचा उपद्रव साधारणपणे फुले येण्याच्या काळात होतो. ही कीड पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे झाडाची पाने धुरकट, लालसर रंगाची दिसतात.
२) केसाळ अळी (हेअरी कॅटरपीलर) : ही अळी झाडाची पाने कुरतडून खाते, त्यामुळे पानाच्या फक्त शिराच शिल्लक राहतात.
३) तुडतुडे (लीफ हॉपर) : या किडीची पिले आणि पौढ कीड पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे पाने वाळतात आणि नंतर सुकतात. कोवळ्या फांद्यांमधील रस शोषून घेतल्यामुळे फांद्या टोकांकडून सुकत जातात.
रोग :
१) करपा :हा ‘आल्टरनेरीया’ जातीच्या बुरशीमुळे पिकावर येणारा महत्त्वाचा रोग असून पिकाच्या पानांवर व फुलांवर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. हा रोग झाल्यास, वेळीच काळजी न घेतल्यास झेंडूची रोपे मरतात.
२) मुळकुजव्या : झाडाच्या मुळांवर बुरशीची लागण झाल्यामुळे झाडाची मुळे कुजतात, मुळांवर तपकिरी रंगाचे डाग पडतात. मुळांवर सुरू झालेली कुज खोडाच्या दिशेने वाढत जाते. त्यामुळे रोपे कोलमडतात आणि मरतात.
३) पानांवरील ठिपके : या बुरशीजन्य रोगामुळेपानांवर तपकिरी रंगाचे गोलसर ठिपके पडतात. या ठिपक्यांचा आकार वाढत जाऊन ते एकमेकांत मिसळतात. त्यामुळे पानांवर काळसर तपकिरी रंगाचे वेडेवाकडे डाग दिसतात. काही वेळा पानांच्या देठावर आणि फांद्यावरही बुरशीची लागण दिसून येते.
काढणी व उत्पादन :
झेंडू लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी फुले येतात. झेंडूची पूर्ण उमललेली फुले देठाजवळ तोडून वेचणी करावी. हारांसाठी देठविरहित फुले तसेच गुच्छ किंवा फुलदाणीसाठी देठासह फुले तोडावीत. फुलांची तोडणी दुपारनंतर करावी. त्यांच्या रंग, आकार व जातीनुसार फुलांची प्रतवारी करावी व नंतर फुले बांबूच्या करंड्यात भरून सावलीच्या ठिकाणी गारव्याला ठेवावीत. फुले बाजारात विक्रीसाठी पाठविताना पॉलिथीन पिशव्यांत अथवा पोत्यात भरून पाठवावीत. कटफ्लॉवर्ससाठी ६ ते ९ फुलांच्या जुड्या बांधून वर्तमानपत्रात गुंडाळून त्या कागदी खोक्यांतून विक्रीसाठी पाठवाव्यात.झेंडूची तोडणी केलेली फुले पॉलीथीनच्या पिशवीत थंड जागी ठेवल्यास ६ ते ७ दिवसांपर्यंत चांगली राहतात. फुले तोडताना कळ्या व कोवळ्या फांद्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
Agrojay Innovations Pvt. Ltd.
Comments
Post a Comment