जांभूळ उत्पादन

जांभूळ उत्पादन 

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download  Agrojay  Mobile Application:  http://bit.ly/Agrojay )

ग्रीष्मातील रखरखता उन्हाळा संपताच मृगाची चाहूल लागत असताना सर्वांना हवेहवेसे वाटणारे आणि औषधीयुक्त बहुगुणी फळ म्हणजेच जांभूळ. जांभळ्या टपोऱ्या फळांना खाण्यासाठी व प्रक्रिया केलेले पदार्थ आणि आयुर्वेदिक औषधी बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे, मात्र हे फळ टिकाऊ नाही, त्यामुळे ते पिकल्यानंतर तीन- चार दिवसांत खावे लागते. स्थानिक बाजारपेठेतही जांभळाच्या फळांना चांगली मागणी असते. शहरांतील बाजारपेठांत तर जांभळाच्या फळांना फार मोठी मागणी असते. 

जांभूळ हे अत्यंत काटक असे, कोरडवाहू जमिनीत तसेच अधिक पावसाच्या प्रदेशात चांगल्या प्रकारे येणारे एक फळपीक आहे. या झाडाला १०० वर्षांपेक्षा अधिक आयुष्य आहे. भारत देश जांभळाचे उगमस्थान समजला जातो. जांभळाच्या फळामध्ये लोह, खनिजे, शर्करा आणि इतर अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. या फळांचा रस आणि बियांचे चूर्ण मधुमेहासाठी गुणकारी आहे. जांभळाच्या फळांचा रस थंड आणि पाचक असतो. महाराष्ट्रात महाबळेश्वर, लोणावळा, सातारा, कोल्हापूर, नागपूर, अहमदनगर, धुळे या भागात जांभळाची झाडे आढळतात.


हवामान आणि जमीन :

कोकाणामधील उष्ण आणि दमट हवामान भरपूर पाउस तसेच दुष्काळी भागातील अत्यंत कमी पाउस व कोरडे हवामान जांभळाच्या झाडास मानवते. जांभळाची लागवड प्रामुख्याने उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात केली जाते.

जांभळाच्या झाडाच्या वाढीसाठी ठराविक प्रकारच्या जमिनीची आवश्यकता नसते. माळरानावरील हलकी पोयट्याची जमीन आणि कोकणातील जांभ्या खडकाची तांबडी जमीन अशा विविध प्रकारच्या जमिनीत जांभळाची झाडे चांगली येतात.


जाती :

 उत्तर भारतात “राजा जामून” या प्रचलित जातीची लागवड करतात.


लागवड :

जांभळाच्या लागवडीसाठी १० बाय १० मीटर अंतरावर ९० बाय ९० से.मी. आकाराचे खड्डे करावेत. खड्डे माती २ ते ३ घमेले शेणखत आणि १ किलो सुपर फोस्फेट यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात २५० ग्रॅम १० टक्के लिंडेन पावडर मातीत मिसळावी, पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक खड्ड्यात जांभळाचे एक रोप लावावे.


खते आणि पाणी व्यवस्थापन :

पूर्ण वाढलेल्या जांभळाच्या झाडाला पाचव्या वर्षांपासून ५ घमेली शेणखत, ६०० ग्राम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद व ३०० ग्राम पालाश द्यावे. लागवडीनंतर पहिली दोन वर्षे प्रत्येक कलमास आठवड्यातून एक वेळ २० लिटर पाणी द्यावे.
पावसाळ्यातील शेवटच्या पावसानंतर वाळलेले गावात किंवा वाळलेला पाला, भाताची काडं, उसाचे पाचट, गोठ्यातील जनावरांच्या पायाखाली आलेले कडब्याचे तुकडे वापरून प्रत्येक झाडाच्या आळ्यावर आच्छादन करावे. यामुळे तणांची वाढ होत नाही आणि जमिनीच्या खालच्या भागात ओलावा टिकून राहतो.


आंतरपिके :

जांभळाच्या बागेत पानकोबी, फुलकोबी, मुळा, वांगी, गाजर, इ. भाजीपाला पिके घेता येतात. लागवड झाल्यानंतर सुरुवातीची ३ ते ४ वर्षे तूर, चवळी, भुईमुग, सोयाबीन, हरभरा यासारखी पिके खरीप हंगामात आंतरपिके म्हणून घेतल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.


काढणी व उत्पन्न :

बियांपासून अभिवृद्धी केलेल्या झाडाला ६ ते ७ वर्षांनी फळे येतात. जांभळाच्या झाडाला जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात फुले आल्यानंतर एप्रिल ते जूनमध्ये फळे काढणीस येतात. फळे पूर्ण पिकल्यानंतर काळसर झाल्यावर लवकरच काढणी करावी. फळे तोडायला विलंब झाल्यास ती जास्त पिकून खाडावरून खाली गळून पडतात. जांभळाच्या एका झाडापासून सुमारे ९०-१०० किलोपर्यंत फळे मिळतात.


साठवण :

जांभळाचे फळ खूप नाशवंत असल्यामुळे साधारण तापमानाला एक किंवा दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवून ठेवणे शक्य नसते. पुर्वशीतकरण केलेली फळे छिद्र असलेल्या पॉलीथीन पिशवीमध्ये ८ ते १० अंश सेल्सियस तापमान आणि ८० ते ९० टक्के एवढ्या अद्रतेमध्ये ३ दिवसांपर्यंत साठवून ठेवता येतात. फळे काढणीनंतर झाडाच्या पानांचा वापर करून बनवलेल्या द्रोणांमध्ये ठेवतात. नंतर या द्रोणांवर छिद्र असलेल्या पॉलीथीन पिशव्यांद्वारे पॅकिंग केली जाते. यामुळे फळांची प्रत चांगली राहते.


प्रक्रिया : पूर्ण पिकलेली, रसरशीत, ताज्या जांभळाच्या फळांपासून सरबत किंवा सिरप, रेडी-टू-सर्व्ह, वाईन, जेली, इ, पदार्थ तयार करता येतात.

जांभळाची आकर्षक आणि रसरशीत फळे घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. ती चांगली कुस्करून घ्यावीत. नंतर कुस्करलेल्या फळांच्या रसात साखर टाकून ६० अंश सेल्सियस तापमानाला ५ ते १० मिनिटे गरम करावीत. हा सिरप साधारण तापमानात ४५ दिवसांपर्यंत चांगला राहतो.




Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download  Agrojay  Mobile Application:  http://bit.ly/Agrojay )


Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology