जट्रोफा लागवड
जट्रोफा लागवड
जट्रोफाची लागवड पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीत करावी, त्यासाठी एप्रिल-मेमध्ये जमीन नांगरावी. हलक्या जमिनीत 60 x 60 x 60 सें.मी. व भारी जमिनीत 45 x 45 x 45 सें.मी. आकाराचे खड्डे उन्हाळ्यात तयार करून घ्यावेत. दोन झाडांतील अंतर 2 x 2 मीटर किंवा 3 x 3 मीटर ठेवावे. रोपांची लागवड करण्याअगोदर खड्ड्यात शिफारशीत कीडनाशक पावडर टाकावी.
रोपे तयार करून लागवड :
रोपे तयार करण्यासाठी 12.5 x 25 सें.मी. आकाराच्या पॉलिथिन पिशवीत वाळू आणि शेणखत यांचे 1:1:2 या प्रमाणात मिश्रण फेब्रुवारी-मार्च महिन्यांत भरून मे महिन्यात प्रत्येक पिशवीत एक ते दोन बिया टाकून झारीने पाणी द्यावे. लागवडीसाठी रोपे दोन ते तीन महिन्यांत तयार होतात.
बियांद्वारे लागवड :
बियांद्वारे लागवड करायची असल्यास शेतात उभी - आडवी नांगरट करून भारी जमिनीत 3 x 3 मीटर, तसेच हलक्या जमिनीत 2 x 2 मीटर अंतरावर लागवड करावी. झाडावरून जमा केलेले चांगले नवीन बियाणे वापरावे. प्रत्येक चौफुलीवर दोन बिया पेराव्यात. पेरणी पहिला पाऊस झाल्यावर वाफसा येताच करावी. बी जास्त खोल पेरू नये. उगवणीनंतर प्रत्येक चौफुलीवर एक रोप राहील अशा तऱ्हेने विरळणी करावी. दोन रोपांत दोन मीटर अंतर ठेवावे.
छाट कलमांद्वारे लागवड :
एप्रिल किंवा मे महिन्यात 30 सें.मी. लांब व दोन ते तीन सें.मी. व्यासाची छाट कलमे तयार करावी. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात कलमांना मुळ्या आल्यानंतर योग्य त्या अंतरावर लागवड करावी. छाट कलमांद्वारे लागवड केल्यास फळधारणा लवकर होते. लागवडीनंतर प्रत्येक वर्षी पावसाळ्यात प्रत्येक झाडास 250 ग्रॅम संयुक्त खते (15:15:15) दिल्यास चांगली वाढ होते. लागवड करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
Agrojay Innovations Pvt. Ltd.
Comments
Post a Comment