भुईमुग लागवड तंत्र

भुईमुग लागवड तंत्र 

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download    Agrojay    Mobile Application:    http://bit.ly/Agrojay )

भुईमूग हे तेलबीया पिकातील एक महत्वाचे पिक आहे. आज जगभरात 85 देशांमध्ये भुईमुगाची लागवड केली जाते. जगभरात होणाऱ्या भुईमुग उत्पादनात भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. सरासरी पहायला गेले तर चीनमध्ये  भुईमुगाचे उत्पादन भारताच्या दुप्पट घेतले जाते.  भुईमूग हे खाद्य तेलाचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे पीक समजले जाते. मनुष्याच्या आहारात स्‍निग्ध पदार्थ व प्रथिने यांचा स्वस्त पुरवठा भुईमुगातून होत असल्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे. शिवाय भारताला त्यापासून परकीय चलन मिळते.खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रात 2.36 लाख हेक्टर लागवड क्षेत्र आहे आणि उन्हाळी हंगामात हे पिक 0.824 लाख हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते.

महाराष्ट्रात धुळे, जळगाव, नासिक, सातारा, सांगली, कोल्हापूर व उस्मानाबाद हे भुईमुगाच्या उत्पादनाचे प्रमुख जिल्हे आहेत. कोकणात आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांत भुईमुगाखाली फारच थोडे क्षेत्र आहे. इतर सर्व जिल्ह्यांत ते कमी जास्त प्रमाणात आहे.


हवामान :

भुईमुग हे उष्ण आणि कोरड्या हवामानातले पीक असून साधारणतः 18 ते 30अंश सेल्शिअस तापमानात हे पीक चांगले येते. उन्हाळी हंगामात दिवसाला 10 ते 12 तास भरपूर आणि स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतो. असे वातावरण भुईमुगाच्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त असते. भरपूर सूर्यप्रकाशामुळे किडी- रोगांचा कमी प्रादुर्भाव होतो आणि परिणामी खरीपापेक्षा उन्हाळी भुईमुगाचे उत्पादन जास्त प्रमाणात मिळते.


जमीन :

समपातळीतील मध्यम ते हलकी, पाण्याचा चांगला निचरा होणारी तसेच वाळू, चूना व सेंद्रिय पदार्थयुक्त जमीन भुईमूग पिकासाठी चांगली असते. परंतु भुईमूगाच्या शेंगा चांगल्या पोसण्यासाठी जमिनीची चांगली मशागत करणे आवश्यक आहे. तसेच अशा जमिनीत शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि सेंद्रिय खताचा वापर केल्यास जमीन भुसभुशीत होत असल्याने जमिनीत आऱ्या सहज जातात व शेंगाही चांगल्या पोसल्या जातात.


पूर्व मशागत :

जमीन उभी आडवी खोल नांगरून भुसभुशीत करावी व एकरी 3 टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट ख मातीमध्ये  मिसळून घ्यावे व नंतर रोटावेटर मारावे.


सुधारित जाती:

भुईमुगाची लागवड करताना सुधारित जातींचा वापर करावा. कोकण विद्यापीठाने कोकण गौरववट्रॉम्बे टपोरा या जाती विकसित करून प्रसारित केल्या आहेत. कोकणामध्ये या जाती खरीप तसेच रब्बी हंगामात लागवडीस योग्य आहेत.

1) एस.बी.-11 : ही जात पुर्ण महाराष्ट्रभर लागवडीस योग्य आहे. उपट्या प्रकारात मोडणारी ही जात 115 ते 120 दिवसात तयार होते. एकरी शेंगाचे उत्पादन 8 ते 10 क्विंटल मिळते.

2) टी.ए.जी.-24 :उपट्या प्रकारातील ही जात 110 ते 115 दिवसात काढणीस येत असून एकरी 40 ते 45 किलो बियाणे लागते. यामध्ये तेलाचे प्रमाण 49 ते 50 % असून एकरी 20ते 22 क्विंटल उत्पादन मिळते. याच्या 100 दाण्यांचे वजन 35 ते 45 ग्रॅम भरते.

3) टी.जी.-26 : ही उपट्या प्रकारातील जात असून 100 ते 110 दिवसात शेंगा काढणीस येतात. टी.ए.जी. २४ प्रमाणेच एकरी 40 ते 45 किलो बियाणे लागते. तेलाचे प्रमाण 49 ते 50 % असून 20 क्विंटल उत्पादन मिळते. 100 दाण्यांचे वजन 35 ते 45 ग्रॅम भरते. या दोन्ही जाती उन्हाळी हंगामासाठी संपूर्ण महारष्ट्रभर लागवडीस योग्य आहेत.

4) कोयना (बी-95 ) :निमपसऱ्या प्रकारातील ही जात पश्चिम महराष्ट्रात लागवडीस योग्य असून एकरी 45 ते 50 किलो बियाणे लागते. 135 ते 140 दिवसात काढणीस येत असून दाणे मोठे टपोरे असतात. 100 दाण्यांचे वजन 80 ते 90 ग्रॅम भरते. यामध्ये तेलाचे प्रमाण 95 % असून एकरी उत्पादन 22 ते 25 क्विंटल प्रति एकरी येते.

5) यु.एफ.70 -103 : ही जात निमपसरी असून पुर्ण महाराष्ट्रभर लागवडीस योग्य आहे. 135 ते 140 दिवसात काढणीस येते. 12 ते 15 क्विंटल शेंगाचे उत्पादन एकरी मिळते.

6 ) आय.सी.जी.एस.-11 : ही जात निमपसरी असून 125 ते 130 दिवसात काढणीस तयार होते. 12 ते 18 क्विंटल शेंगाचे उत्पादन एकरी मिळते. पूर्ण महाराष्ट्रभर लागवडीस योग्य आहे.

7) एम-13 : मराठवाडा, सोलापूर, नागपूर, पुणे भागात या जातीची लागवड करता येते. ही जात पसरी वाढणारी असून 135 ते 140 दिवसात पेरणीपासून तयार होते. शेंगाचे एकरी उत्पादन 8 ते 10 क्विंटल मिळते.


सोलापूर, नगर व मराठवाड्यातील पटाच्या पाण्याखालील क्षेत्रात भुईमूग मार्च - एप्रिल महिन्यात पेरून ऑगस्टमध्ये काढणी करतात व त्यांनतर रब्बी पीक घेतात. अशा भागात उन्हाळ्यात 120 -125 दिवसात तयार होणाऱ्या आय.सी.जी.एस.-11,यु.एफ.70-103 या निमपसऱ्या व एम-13 पसऱ्या जातीची लागवड करावी.

उन्हाळी हंगामामध्ये टपोऱ्या दाण्याच्या (एचपीएस) भुईमूगाच्या बी-95 (कोयना) आणि आय.सी.जी.व्ही.-86564(आय.सी.एस.-49) या जातींचा वापर करावा.

बीजप्रक्रिया :

बियाण्या पासुन व रोप अवस्थेत येणार्या रोगापासुन पिकाचे संरक्षण करण्यासाठी पेरणी पुर्वी बियाण्यास प्रति किलो 5 ग्रॅम थायरम किवा 2 ग्रॅम काबेंन्डाझीन किवा 3 ग्रॅम मॅंकोझेब किवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशी नाशक चोळावे व नंतर एक किलो बियाण्यास 25 रायझोबियम आणि 25 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू चोळावे व बिज प्रक्रिया केलेले बियाणे सावलित सुकवावे.


पेरणी:

पेरणीपूर्वी जमीन सपाट करून घ्यावी. आवश्यकता वाटल्यास पाण्याची एक पाळी द्यावी. पेरणी टोकन पद्धतीने करावी. उपट्या जातीची पेरणी आणि पसऱ्या जातीसाठी दोन ओळीतील अंतर 30 सेंमी ठेवून करावी. निमपसऱ्या आणि पसऱ्या जातीसाठी दोन ओळीतील अंतर 45 सेंमी ठेवावे. दोन रोपांतील अंतर 15 सेंमी ठेवावे. रब्बी हंगामात या पिकाची पेरणी जानेवारी च्या दुसऱ्याआठवडयापासून फेब्रुवारी च्या दुसऱ्या आठवडयापर्यंत पूर्ण करावी. खरीपातील पेरणी १० ते २० जूनपर्यंत करावी.


सुधारित लागवड पद्धत :

सपाट वाफा : प्रथम जमिनीचे सर्वसाधारण सपाटीकरण, जमिनीचा उतार व पाण्याच्या झोताप्रमाणे वाफ्याची रानबांधणी, वाण प्रकारानुसार दोन ओळींतील व बियाण्यातील अंतरावर बियाण्याचे टोकण करावे. उपट्या वाणासाठी 30 सेंमीबाय 15 सेंमी अंतर ठेवावे. प्रत्येक ठिकाणी दोन बियांची टोकण करावी.


गादीवाफा :गादीवाफ्याची तळाची रुंदी 120 सेंमी व पृष्ठभागावरील रुंदी 90 सेंमी ठेवावी. यामुळे दोन गादीवाफ्यातील अंतर एक फूट रहाते. सरीची खोली 15 सें.मी. असावी. वाफ्यावर उपट्या वाणाची पेरणी 20 सेंमीबाय 15 सेंमीकिंवा 30 सेंमी बाय 15 सेंमीअंतराने करावी. प्रत्येक ठिकाणी दोन बिया टोकाव्यात.

पॉलीथीन मल्चिंग तंत्रज्ञान :या तंत्रज्ञानाने शेती करण्यासाठी साधारण 7 मायक्रॉन जाडीचे पॉलीथीन वापरावे. सर्वसाधारण एक एकर क्षेत्रासाठी 5रोलची आवश्यकता भासते. एका रोलमध्ये 6 किलो इतका कागद असतो. कागदाची जाडी 7 मायक्रॉन एवढीच असल्याने त्यातुन आ-या सहजपणे खाली जातात. पॉलीथीन कागदामुळे जमिन झाकली जाते व बाहेरील गवताचे बियाणे जमिनीवर पडण्यास अटकाव होउन गवताची वाढ जवळपास 26 टक्क्यांनी कमी होते. त्याचबरोबर जमिनीचे तपमान वाढण्यास मदत होते परिणामी पेरणीच्या वेळी जमिनीचे तपमान कमी असले तरी बीयाणांची उगवण चांगली व 3 ते 4 दिवस लवकर होते.

कागद अंथरणे व पेरणी :वरील प्रकारच्या कागदाची रूंदी 90 सेंमी असते व त्यावरती बियाची टोकण करणेसाठी 4 सेंमी व्यासाची छिद्रे असतात. स्प्रिंकलर सेटच्या साह्याने जमिन किंचीत ओली करून वाफ्यावरती कागद अंथरावा आणि दोन्ही बाजूस मातीत खोचुन घट्ट बसवावा कागदास छिद्रे नसल्याने लोखंडी/पी.व्ही.सी पाईपने 4 सेंमी व्यासाची छिद्रे पाडावीत. निवड केलेल्या उन्हाळी भुईमुग बियाण्याची पेरणी करावी. दोन छिद्रांमधील अंतर 15 सेंमी तर दोन ओळीत अंतर साधारण 30 सेंमीठेवल्यास रोपांची वाढ चांगल्या पद्धतीने होते.

पॉली मल्चिंग च्या सहाय्याने भुईमुग शेती केल्यास दाण्याचा आकार वाढतो त्याचप्रमाणे उत्पादनात 50 टक्क्यांनी वाढ होते हि गोष्ट शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची आहे.


खतांचा वापर:

पेरणीच्या वेळी खतांच्या पूर्ण मात्रा द्याव्यात. एकरी10 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरद सुपर फ़ोस्फ़ेट्च्या स्वरुपात द्यावे.
सुक्ष्म द्रव्यांचा पुरवठा :उन्हाळी भुईमूगाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आवश्यकतेनुसार करावा.
1) जस्त (झींक) : जर जमिनीत जस्तानी कमतरता असेल तर झाडांची पाने लहान राहतात. पानांच्या शिरामधील भाग पिवळा होतो व नंतर पाने वाळल्यासारखी दिसतात. जमिनीत जस्त कमी असल्यास 4 किलो प्रति एकरी झींक सल्फेट पेरणीच्या वेळेस जमिनीत मिसळावे किंवा उभ्या पिकात कमतरता आढळल्यास 1 किलो झींक सल्फेट 200 लिटर  पाण्यात मिसळून फवारावे.
2) लोह (आयर्न) : जमिनीत लोहाची कमतरता आढळल्यास भुईमूगाची वाढ खुंटते, पाने पिवळी व त्यानंतर पांढरी पडतात. त्यासाठी एकरी 1 किलोग्रॅम फेरस सल्फेट, 400 ग्रॅम चुना आणि 1 किलो युरिया 200 लिटर पाण्यात विरघळून पिकावर फवारणी करावी.
3) बोरॉन :हलक्या व मध्यम जमिनीत भुईमूगाच्या पिकासाठी बोरॉन या सूक्षम द्रव्याचा वापर केल्यास उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पेरणीनंतर 30 ते 50 दिवसांनी पिक असताना 100 ग्रॅम बोरीक आम्ल 200 लिटर पाण्यात विरघळून फवारले असता उत्पादनात वाढ होते. एकरी 2 किलोबोरॅक्स पेरणीपूर्वी जमिनीत मिसळल्यास बोरॉन ची कमतरता राहत नाही.
4) कॅल्शियम व गंधक (सल्फर) : ज्या जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण 40 ग्रॅम/100 ग्रॅम पेक्षा कमी आहे. अशा जमिनीत भुईमूगासाठी प्रती एकरी 200 किलोग्रॅम जिप्सम पेरणीच्या वेळी आणि पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी 2 हप्त्यांत झाडालगत 5 सेंमी अंतरावर आऱ्यांची वाढ होते त्या भागात जमिनीत पेरून दिल्यास उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भुईमूगाच्या इक्रीसॅट पद्धतीच्या लागवडीत जिप्सम हे खत देण्याची शिफारस आहे. जिप्सममधून कॅल्शियम 24% आणि गंधक 18.6% उपलब्ध होते असल्याने भुईमूगाच्या आऱ्या जमिनीत सुलभरित्या जाण्यास, जसेच शेंगा चांगल्या पोसण्यास मदत होते.


अंतर मशागत :

पेरणी नंतर 12-15 दिवसांच्या अंतराने 2 कोळपण्या केल्यास तणांचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होते. गरज असल्यास एखादी खुरपणी करून घ्यावी. तणनाशकाचा वापर करायचा झाल्यास एकरी 400 ग्रामपेंडामीथिलीन 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. परंतु हि फवारणी पेरणीनंतर व पिक उगवणीच्या अगोदर करावी.


पाणी व्यवस्थापन :

पेरणी नंतर 4-5 दिवसांनी पहिले आंबवणी पाणी द्यावे म्हणजे राहिलेल्या सर्व बियाणे उगवते. नंतर 8-10 दिवसांच्या अंतराने 10-12 पाण्याच्या पाळ्या द्याव्या.


पिक संरक्षण :

तसे पाहायला गेले तर उन्हाळी भुईमुगाला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. यामुळे पिकावर किडी- रोगाचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. मात्र, असे असले तरी मावा, तुडतुडे, फूलकडे, पान गुंडाळणारी अळी, इत्यादी किंडींचाप्रादुर्भाव पिकासाठी घटक ठरू शकतो. वेळोवेळी तज्ञांचा सल्ला घेऊन नियंत्रण या किडींवर नियंत्रण मिळवावे.

टिक्का रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास 25 ग्रॅम मॅंकोझेब प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास 25 ग्रॅम बाविस्टीन प्रति10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.


काढणी व उत्पादन :

शेंगा पक्व होताना शेंगावरील शिरा स्पष्ट दिसतात. तसेच टरफलाची आतील बाजू काळसर दिसू लागते. दाणा पूर्ण भरला जाऊन त्याला चांगला रंग येतो. भुईमुगाचे डहाळे जमिनीत पुरेसा ओलावा सताना उपटून घेऊन शेंगा तोडून काढाव्यात. शेंगा झाडापासून वेगळ्या करून 4 ते 5 दिवस चांगल्या वाळवाव्यात.

सर्व प्रकारचे योग्य व्यवस्थापन केले तर उन्हाळी भुईमुगाचे जातीनिहाय उपट्या जातीचे वाळलेल्या शेंगाचे एकरी 10 ते 12 क्विंटल आणि पसऱ्या जातीचे एकरी 12 ते 16 क्विंटल उत्पादन मिळते.  शिवाय ढाळ्यांचा हिरवा अगर वाळवून पौष्टिक चारा 2 ते 3 टन मिळतो.
काढणीनंतर शेंगा सर्वसाधारणपणे तीन-चार आठवड्यांत विकल्या जातात. फक्त सधन शेतकरी जास्त किंमतीच्या अपेक्षेने तीन-चार महिन्यांपर्यंत माल ठेवून देतात.




Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download    Agrojay    Mobile Application:    http://bit.ly/Agrojay )

Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology