डाळिंब -आंबे बहार व्यवस्थापन

डाळिंब -आंबे बहार व्यवस्थापन

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download    Agrojay    Mobile Application:    http://bit.ly/Agrojay )

डाळींब हे मध्यपूर्वेकडील देशातील फळझाड आहे. पण त्याचा प्रसार आता जगातील बर्‍याच देशातून झाला आहे. भारतात डाळींब लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. अधिक उत्पादन देणार्‍या मस्कत, गणेश व जी - १३७, आरक्त्त, मृदुल, शेंदरी जातींना बाजारात वाढती मागणी आहे, त्यामुळे महाराष्ट्रात डाळींब लागवडी खालील क्षेत्र खूप वाढलेले आहे. डाळींबाच्या अनेक जाती असल्या तरी गणेश या जातींची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केली जाते. ढोकला (गुजरात), ज्योती (कर्नाटक), जोधपूर रेड व जालोर सिडलेस (राजस्थान) या जातीही भारताच्या इतर भागात लावल्या जातात. डाळींब हे एक बहुगुणी फळ आहे. डाळींब फळामध्ये ७८% पाणी, १.९ प्रथीने, १.७% स्निग्ध पदार्थ, १५% साखर व ०.७% खनिजे असतात. याशिवाय केल्शियम १०, फॉस्फरस ७०, लोह ०.३०, मॅग्नेशियम १२, सोडियम ४ व पोटॅशियम १७ मि.ग्रॅ./१००ग्रॅम इतकी खनिजे असतात. तसेच थायमीन ०.०६, रिबोफ्लेवीन ०.१, नियासीन ०.३ व क जीवनसत्त्वे असतात.

डाळिंब हे पूर्णतः सदाहरित अथवा पूर्णतः पानझडी गटामध्ये मोडत नाही. हे फळझाड अत्यंत काटक व पाण्याचा ताण सहन करणारे आहे. त्यामुळे हे फळझाड विविध प्रकारच्या जमिनी व हवामान यांना यशस्वीपणे तोंड देवू शकते. डाळिंबाच्या झाडाला निर्सगतः वर्षभर फुले आणि फळे येत असतात. तथापि, उत्तम दर्जाचे फळे आणि अधिक उत्पादन घेण्यासाठी योग्य तो बहार धरणे महत्त्वाचे आहे.

नैसर्गिकरित्या वर्षभरात ३ वेळा बहार येतो. तथापि योग्य अवस्था कोणत्या बहारासाठी आहे त्यासाठी खालील तीन बाबींचा विचार करूनच बहार धरण्याची प्रक्रिया सुरू करावी.


१) बाजारपेठेतील मागणी : डाळींबाच्या फळांना कोणत्या काळात आणि कोणत्या बाजारपेठेतून मागणी असते याचा प्रथम विचार करावा, म्हणजे त्यानुसार बहार धरणे सोईचे ठरेल.

२) हवामान : हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा हे तीन हंगाम आपल्याकडे आहेत. हिवाळ्यातील कडक थंडी उन्हाळ्यातील उच्च तापमान आणि पावसाळ्यातील अधिक आर्द्रता यांचे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन बहाराची निवड करावी.

३) पाण्याची उपलब्धता : डाळींब हे काटक वर्गातील फळझाड असले तरी बहार काळात पाण्याची गरज असते. जास्त पाणी मात्र या फळास घातक ठरते. पाणी टंचाई आहे काय ? ती कधी आणि किती प्रमाणात आहे, याचा विचार करून बहाराची निवड करावी.

एकदा बहाराची निवड केल्यानंतर त्यात बदल करू नये. निदान ५ वर्षांसाठी तरी बहार धरण्याचा कार्यक्रम पक्का करावा.


डाळिंबामध्ये बहाराचे नियोजन करताना डाळिंब बागाईतदारांनी पुढील बाबी विचारात घ्याव्यात -
- ज्या भागात तेलकट डाग रोगाचे प्रमाण जास्त आहे, अशा भागात शक्‍यतो मृगबहार/पावसाळी घेऊ नये. 
- डाळिंबाचा पहिला बहार दोन वर्षांनंतरच धरावा. 
- वर्षांतून फक्त एकच बहार घ्यावा. 
- बहार घेतल्यानंतर बागेला 3 ते 4 महिने विश्रांती द्यावी. 


बहार व्यवस्थापन :

लागवडीनंतर पहिल्या २- ३ वर्षात झाडांची वाढ चांगली होण्याच्या दृष्टीने या काळात फळे धरू नयेत. या झाडावर येणारी फळे वेळीच काढून टाकावीत. सर्वसाधारण झाडे ३ - ४ वर्षाची झाल्यावर नियमीत बहार धरावा.

डाळींबास आपल्या हवामानात कमी जास्त प्रमाणात वर्षभर फुले येतात. डाळिंबामध्ये प्रामुख्याने मृग बहार, हस्त बहार आणि आंबे बहार असे तीन बहार घेतले जातात. आंबे बहारात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये फुले येतात. फळांची काढणी जून-ऑगस्टमध्ये येते. या बहारात भरपूर फुले येतात, फळांचा रंग आणि प्रत अतिशय चांगली असते. आंबे बहारात कीड आणि रोगांचे प्रमाण कमी अतिशय कमी असते. उत्पादन चांगले मिळते. संरक्षित पाणी असल्यास आंबे बहार धरणे फायद्याचे ठरते. जास्त काळ सूर्यप्रकाश मिळाल्याने व कोरडे हवामान यामुळे फळांची प्रत सुधारते.

डाळींबाची फुले ही मागील हंगामातील पक्व काडीवर येतात. या काडीचे पोषण व्यवस्थित होणे गरजेचे असते. या फुटीवरील पाने अन्न तयार करून काडीत साठवितात. फुले येण्याचा जेव्हा हंगाम असतो त्याच काळात झाडावर नवीन पालवी येते. काड्यात, फांद्यात आणि खोडात ज्या प्रमाणात अन्नसाठा असतो त्यानुसार नवीन फुटीचे साधारण तीन प्रकार पडतात. एक पालवीसह फुले येणे, दुसरा नुसती फुले येणे आणि तिसरा नुसती पालवी येणे होय. म्हणजेच अन्नसाठा जर फारच कमी असेल तर येणारी नवीन फुट फक्त्त पालवीच असते. म्हणजेच फुले नसतात. असलीतरी ती फार कमी प्रमाणात असतात. अन्नसाठा मध्यम स्वरूपाचा असेल तर पालवी आणि फुले सारख्या प्रमाणात लागतात. आणि जेव्हा अन्नसाठा मोठ्या प्रमाणात असतो तेव्हा फुले भरपूर लागतात त्या मानाने पालवी कमी असते.

खोडात अन्न साठविण्याच्या प्रक्रियेस सी: एन रेशो असे म्हणतात. सी म्हणजे कर्बो हायड्रेटस आणि एन म्हणजे नायट्रोजन (नत्र) होय. खोडांमध्ये यांचे प्रमाण खालील गटात मोडते.
१) C : n - भरपूर कर्बोदके व अल्प नत्र
२) c: N -अल्प कर्बोदके व भरपूर नत्र
३) c : n -अल्प कर्बोदके व अल्प नत्र
४) C : N - भरपूर कर्बोदके व भरपूर नत्र
या गटापैकी पहिल्या गटातील स्थिती असल्यास कोणत्याही बहाराची भरपूर फुले निघतात. त्यामानाने पालवी कमी असते. झाडावर फळांची संख्या पुष्कळ असून फळे झुपाक्यात लागतात एका झुपाक्यात ३ ते ४ फळे लागण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र फळे आकाराने मोठी वाढत नाहीत. जोड फळातील काही फळांची विरळणी करून मोजकी फळे ठेवली तरी राखून ठेवलेल्या फळांचा आकार वाढत नाही. उत्पादन कमी निघते. याचा दुसरा परिणाम असा होता की, पुढील बहार उशिराने निघतो, कमी फुले लागतात, फुले येण्याचा कालावधी वाढतो आणि दुसर्‍या हंगामातही उत्पादन कमी निघते. लागोपाठ दोन हंगामात उत्पादन कमी निघाल्यामुळे एकूण नुकसान वाढते.

यातील दुसर्‍या गटाची अवस्था असेल तर बहार धरताच लवकर पालवी येते, पालवी जोमदार वाढते, फुले उशिराने लागतात, फुलगळ अधिक होते. फळांची संख्या कमी असते. फळांची संख्या कमी असूनही त्यांचा आकार लहान राहतो. उपलब्ध अन्नसाठा पालवी वाढण्याकडे खर्च होतो आणि फळांचे पोषण अपूर्ण राहते. अशा वेळी फळे रोगांना लवकर बळी पडतात. त्यांची गुणवत्ता कमी दर्जाची असते. अशा परिस्थितीनंतर येणारा दुसरा बहार मात्र चांगला येतो.

तिसर्‍या गटाची अवस्था तर फारच हानिकारक ठरते. साठीव अन्न आणि नत्र यांचे प्रमाण अल्प असल्यामुळे पालवी खुरटते, फळे कमी व लहान राहतात आणि एकूण झाडाची अवस्था खुरटलेली दिसते. अशी अवस्था सुधारणे अवघड आणि खर्चिक जाते.

डाळींब झाडांची चौथ्या गटातील अवस्था योग्य समजली जाते. या अवस्थेत भरपूर अन्नसाठा आणि त्यास समतोल असे नत्र असल्यामुळे फुले आणि पालवी भरपूर येते. फळधारणा चांगली होत असल्यामुळे फळांची संख्याही भरपूर येते आणि त्याचबरोबर पालवी चांगली असल्यामुळे फळे मोठी होतात. फळांची गुणवत्ता वाढविणे सोपे पडते. या बहाराची फळे वेळेवर तयार होतात आणि पुढच्या बहारावरही विपरीत परिणाम होत नाही.

बहार धरतानाया चार अवस्थांपैकी चौथी अवस्था असणे हे फायदेशीर ठरते, तथापि ही अवस्था आपोआप अथवा नैसर्गिकरीत्या घडून येईल असे मात्र नाही. आणि ती तशी घडवून आणणे कोणत्याही बहाराचा पाया आहे हे ध्यानात घ्यावे.


ताण आणि पानगळ :

डाळिंबाला एकाच वेळी फुले आणि फळे येण्यासाठी झाडांना विशिष्ट कालावधीसाठी विश्रांती, पाणी तोडणे, पानगळ करून छाटणी करणे या बाबी महत्त्वाच्या असतात. विश्रांतीच्या काळात बाग, फळधारणेसाठी तयार केली जाते. नियमीत सिंचन, खत व्यवस्थापन व पीक संरक्षणासाठी योग्य उपाय योजल्यास बाग रोगमुक्त व निरोगी राहते.

- जमिनीच्या मगदुराप्रमाणे डाळिंबाच्या झाडांना किती दिवस ताण द्यायचा ते ठरवावे.
- बहार धरताना साधारणतः जमीन जर हलकी असेल तर बहार धरण्याअगोदर ३०-४५ दिवस पाणी तोडावे.
- तसेच मध्यम ते भारी जमिनीत ४०-५० दिवस पाणी बंद करावे. झाडांना ताण दिल्यानंतर छाटणीच्या तीन आठवडे इथ्रेलची फवारणी करून पानगळ करावी.
- डाळिंबाची ५० टक्क्यांपर्यंत जुने पाने गळणे व शेंड्याची वाढ पूर्ण थांबणे हे झाडाला नैसर्गिक ताण देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. परंतु या अवस्थेच्या पूर्वी जर पानगळ केली तर फुलांऐवजी शेंडे निघतात व सेटिंग लांबते, यासाठी नैसर्गिक पानगळ झाल्यानंतरच इथ्रेलची फवारणी घ्यावी.
- नैसर्गिक पानगळीनुसार १ ते २.५ मिली प्रति लिटर इथ्रेल व ५ ग्रॅम प्रति लिटर ०० : ५२ : ३ घेऊन सायंकाळच्या वेळी फवारणी करावी.
- इथ्रेल ऐवजी इतर कोणतेही ससायनाने पानगळ करू नये. इथ्रेल फवारणी नंतर कमीत कमी ८० टक्के  पानगळ होणे आवश्यक असते, त्यानंतरच बागेला पाणी चालू करावे.
- चांगले परागीभवन होण्यासाठी जमिनी व झाडातील कर्ब : नत्र गुणोत्तर १० ते १२: १ असावे. यामुळे येणारी फुले गुच्छ स्वरूपात किंवा झुपक्याने येतात व मादी व नराचे शेकडा प्रमाण ७०: ३० असे योग्य असते. यासाठी ताण काळात जोपर्यंत झाडे कार्यक्षम व हिरवीगार असताना म्हणजे पानांची कर्ब ग्रहनाची क्रिया चालू असते, त्यावेळी ५ ग्रॅम ०० : ५२ : ३४ व ५ मिली मल्टी मिक्रोनुट्रिएन्ट प्रति लिटर पाणी असा फवारा घ्यावा, हि फवारणी ताण काळात दोन वेळेस घ्यावी.


छाटणी : 

डाळिंबात छाटणी न केल्यास फळे टोकाला लागतात. त्यामुळे पानगळ केल्यानंतर डाळिंबाची हलकीशी छाटणी करावी. छाटणी करताना रोगट, तेलकट डाग रोगाच्या फांद्या काढून टाकाव्यात. भरपूर सूर्यप्रकाश, हवा खेळती राहील आणि फळे सावलीत राहतील अशा प्रकारे छाटणी करावी. छाटणी करताना झाडाचा वरचा समतोल बिघडणार नाही याची काळजी घेऊनच छाटणी करावी.  छाटणी केल्यानंतर लगेच १टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
        
अन्नद्रव्ये व्यवस्थापन :

डाळिंब पिकाची लागवड हलक्या जमिनी आणि कोरडवाहू भागात होत असल्याने पिकाला जास्तीत जास्त पोषणमुल्ये, चांगल्या वाढीसाठी देणे महत्वाचे ठरते. हे पीक नत्र व पालाश खताना चांगल्या प्रकारे प्रतिसाद देते. कॅल्षियम, मॅग्नेशिअम, मॅंगनीज, झिंक, लोह, बोरॉन आणि कॉपरसारख्या सूक्ष्मअन्न द्रव्याचा वापर केल्यास चांगल्या प्रतीची फळे मिळतात. सर्व साधारणपणे सर्व बुरशीनाशकांमधे कॉपर असल्यामुळे हे स्वतंत्रपणे देण्याची गरज पडत नाही.मॅंगनीज, झिंक, बोरॉन, आणि कॉपर चे पाना वरील फवारे मातीत देण्यापेक्षा जास्त प्रभावी ठरतात, शिवाय परवडतात ही. लोह मात्र चिलेटड स्वरूपात जमिनीतून देणे जास्त प्रभावी ठरते.
-    सर्वप्रथम जमिनीची आडवी उभी नांगरणी करून झाडालगतची जमीन चांगल्या प्रकारे चाळून घ्यावी.
-    माती परीक्षण करून डाळिंब झाडाच्या वयानुसार रासायनिक खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. 
-    चुनखडीयुक्त जमिनीमध्ये कॅल्शिअमयुक्त खते म्हणजे जिप्सम, कॅल्शिअम क्लोराईड, कॅल्शिअम नायट्रेट, इत्यादी खते टाकू नयेत.
-    रासायनिक खतांचा अतिरेक वापर टाळावा. त्यामुळे डाळिंब रोगास जास्त बळी पडू शकतात तसेच जमिनीचे स्वस्थही बिघडते.
- फळ छाटणीनंतर झाडाजवळ, ठिबक असेल तर जिथे ठिबकने पाणी पडते तिथे खड्डा घेवुन मुळावरगाठी आहेत का ते पाहावे. गाठी असल्यास कुदळीच्या सहाय्याने त्या बाहेर काढाव्यात व खड्डा २०किलोशेणखत, १किलो कोंबडी खत, १ किलोनिंबोळी पेंड, १००ग्राम युरिया, २००ग्राम१०:२६:२६, १००ग्रामपोटॅश, १५ ग्रामफोरेट टाकून भरून घ्यावा. जमिन मुरमाड असेल तर कोंबडी खत टाकू नये. ठिबक सिंचन असेल तर ८-१० तास पाणी द्यावे.
- विश्रांतीच्या काळामध्ये काडी पक्की होण्यासाठी ५ते १० ग्राम ००:५२:३४ व ५ मिली मिक्स मायक्रोन्युट्रियंट प्रति लिटर पाण्यातून ४ ते ५ फवारण्या घ्याव्यात.         
-    खत दिल्यानंतर बागेतील पालापाचोळा टाकून झाडाच्या खोडाजवळ नैसर्गिक आच्छादन करावे.
एकदा खतांची गरज समजली की आपापल्या ठिकाणी असलेल्या विद्राव्य खतांच्या प्रमाणे फर्टीगेशन चे तंत्र बसवता येते. लागणार्‍या खतांचा पूर्ण डोस दिलेल्या कालावधीसाठी विभागून घ्यावा आणि ठरलेल्या पाण्याच्या बरोबर द्यावा. जास्तीत जास्त खत विभागणी आणि वरचे वर दिलेल्या छोट्या खत मात्रा जास्त प्रभावी ठरतात.

कॅल्शिअम नायट्रेट २ महिन्यातून एकदा गरजेनुसार फवारावे.
-    फुलकळी लागण्यापूर्वी २ ग्राम चिलेटेड मल्टि मिक्रोनुट्रिएन्ट प्रती लिटर याप्रमाणे एक फवारणी घ्यावी.
-    फुलगळ होत असेल तर पाणी व्यवस्थापनावर लक्ष्य द्यावे. तसेच जमिनीमध्ये ओल असताना एनएए व बोरॉनचे १० ते १२ दिवसांच्या अंतराने वेगवेगळ्या २ फवारण्या घ्याव्यात व निम कोटेड निंबोळी पेंड ठिबक खाली टाकावी.
-    ५० टक्के फुलेआल्यानंतर २ ग्राम चिलेटेड मल्टि मिक्रोनुट्रिएन्ट प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी व यानंतर ५ ग्राम १२:६१:०० प्रति याप्रमाणे दुसरी फवारणी घ्यावी.
-    फळ तोडण्यापूर्वी १० दिवस अगोदर ५ ग्राम पोटेशिअम सोनाईट प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.


पाणी व्यवस्थापन :

-    डाळिंब हे उष्ण कटीबंधातील फळपीक असून, फार कमी पाणी लागते. 
-    डाळिंबाचे झाड ताणावर असताना दीड महिना पाणी पूर्ण बंद करावे.
-    त्यानंतर ताण सोडताना डाळिंबाला पहिले पाणी पाच ते सहा तास ठिबक सिंचनने द्यावे.
-    डाळिंबाची बाग फुलोऱ्यात असताना बेताचे पाणी द्यावे. 
-    डाळिंबाच्या झाडाला अति पाणी दिल्यास सूत्रकृमी, मर आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. 
-    पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे हे लक्ष्यात येत नसेल तर बागेतील काही झाडांजवळ मका टोकावी. मका सुकलेली दिसल्यासच झाडांना पाणी द्यावे. मका हे 
     पिक पाण्यासाठी अतिशय संवेदनशील असल्याने जमिनीतील ओलाव्याचा पिकावर लगेच परिणाम दिसून येतो.


फळ काढणी :

-   फुलोरा व फळे येण्याच्या काळात काटेकोर व्यवस्थापन केल्यास, चांगल्या प्रतीची फळे अधिक प्रमाणात मिळतात.
-   कीड व बुरशीनाशकांचा वापर आवश्यकते प्रमाणे करावा. रसायनांचा अवास्तव वापर केल्यास, खर्च वाढतो तसेच किड व रोग या रसायनांना सरावतात. 
     त्यामुळे आगामी काळात त्यांचे नियंत्रण अजूनच कठीण बनते.
-   सक्रिय मुळ्यांच्या जवळ कायम ओलावा ठेवणे आणि विभागून दिलेल्या लहान खत मात्रा फळ पोसण्यात महत्वाची भूमिका बजावतात.
-   शाश्‍वत डाळिंब उत्पादन घेण्यासाठी डाळिंब झाडाच्या वयाप्रमाणे फळांचे उत्पादन घ्यावे.
-   पूर्ण वाढ झालेल्या झाडाला ६० ते ८० फळे घ्यावीत. 
-   डाळिंबाचे फळ पक्‍व झाले की टोकाकडील पुष्प पाकळ्या मिटतात. फळांचा गोलाकारपणा किंचित कमी होऊन फळांना चपटा आकार येतो. 
-   साधारणतः फुलोऱ्यानंतर १५० ते २१० दिवसांनी आणि फळधारणेनंतर १२० ते १३० दिवसांनी डाळिंब काढणीस येतात. 
-   फळांना चांगला भाव भेटण्यासाठी फळांची प्रतीनुसार विभागणी करूनच फळे बाजारात विक्रीसाठी न्यावीत.




Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download    Agrojay    Mobile Application:    http://bit.ly/Agrojay )



Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology