नारळ - गेंडा भुंगा किड
नारळ - गेंडा भुंगा किड
Agrojay Innovations Pvt. Ltd.
गेंडा भुंगा हा मध्यम आकाराचा असून, रंगाने गडद तपकिरी किंवा काळा असतो. त्याच्या डोक्यावर पाठीमागच्या बाजूस गेंड्यासारखे एक शिंग असल्यानेच या किडीला "गेंड्या भुंगा' असे म्हटले जाते. प्रौढ भुंगा नारळाच्या झाडाचे नुकसान करतो. गेंड्या भुंग्याच्या अंडी, अळी व कोष या तीनही अवस्था शेणखत तसेच कुजलेल्या पालापाचोळ्यामध्ये आढळतात.
भुंगा नारळाच्या शेंड्यामध्ये नवीन येणारा कोंब किंवा सुई पोखरून खातो. लहान रोपांमध्ये सुईचे उगमस्थान भुंग्याने खाऊन फस्त केल्यास अशा रोपांना नवीन सुई येत नाही. कालांतराने रोप मृत पावते.
नुकसानीची पद्धत आणि लक्षणे :
काही वेळेस न उमललेली पोयदेखील भुंगा कुरतडून खातो. अशी पोय न उमलता वाळते. त्यामुळे याचा परिणाम नारळाची वाढ आणि उत्पादनावर होतो. नवीन सुई कुरतडली गेल्यामुळे लागण झालेल्या झाडाच्या झावळ्या त्रिकोणी आकारात कात्रीने कापल्यासारख्या दिसतात. या प्रमुख लक्षणावरून या किडीचा प्रादुर्भाव सहज ओळखता येतो. लहान झाडांबरोबर मोठ्या झाडांवर या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत या भुंग्यांची तीव्रता जास्त आढळते.
नियंत्रणाचे उपाय :
बाग स्वच्छ ठेवणे - कुजलेला पालापाचोळा तसेच तोडलेल्या नारळाच्या खोडांचे अवशेष बागेत ठेवू नयेत. शेणखताची साठवण नारळ बागेत किंवा जवळपास करू नये. शेणखतात आढळणाऱ्या अंडी, अळी व कोष या अवस्था वेळोवेळी गोळा करून त्यांचा नाश करावा.
कार्बारिल फवारणी - शेणखताच्या खड्ड्यावर दर दोन महिन्यांच्या अंतराने 50 टक्के पाण्यात मिसळणारी कार्बारिल भुकटी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फसवे खड्डे तयार करा - नारळ बागेमध्ये 60 सें.मी. लांब, 60 सें.मी. रुंद व 60 सें.मी. खोल या आकाराचे फसवे खड्डे तयार करून त्यामध्ये कुजलेला पालापाचोळा, शेणखत भरून घ्यावे. अशा खड्ड्यांवर 50 टक्के पाण्यात मिसळणारी कार्बारिल भुकटी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे या खड्ड्यात तयार होणाऱ्या भुंग्यांच्या तिन्ही अवस्थांचा नायनाट होईल.
गंध सापळा - भुंगे नियंत्रणासाठी गंध सापळ्यांचा वापर बागेतील भुंगे आकर्षित करून मारण्यासाठी प्रभावीपणे करता येतो. प्रति हेक्टरी एक सापळा बागेत लावावा.
तारेचा हूक आणि कीटकनाशकाचा वापर - झाडाला गेंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आल्यास प्रथम तारेच्या टोकदार हुकाने खोडातील भुंगे काढून घ्यावेत. त्यांचा नाश करावा. भुंग्यांनी पोखरलेला भाग स्वच्छ करून त्या छिद्रात वाळू आणि 10 टक्के स्वरूपाच्या कार्बारिलची भुकटी यांचे समप्रमाणात मिश्रण (तज्ज्ञांच्या सल्ल्याने) तयार करून त्यामध्ये भरावे. हे मिश्रण दर दोन महिन्यांनी नवीन येणाऱ्या पहिल्या दोन पानांच्या देठाच्या बेचक्यात नियमित टाकावे.
Agrojay Innovations Pvt. Ltd.
Comments
Post a Comment