हळद लागवड
हळद लागवड
ऊस, मिरची, कांदा, आले, सुरण, भाजीपाला, कड धान्ये, गहू, रागी आणि मका या पिकानंतर घेता येऊ शकते. काही भागात आले ऐवजी हे पिक घेता येते. नारळ, सुपारी ,(मी स्वतः हळद पपई हे )मध्ये आंतरपीक म्हणून घेता येते. मिरची, कांदा, वांगी आणि मका, रागी सारख्या तृणधान्या सोबत मिश्रपीक म्हणून घेता येते. श्रावणघेवडा, कोथिंबीर या पिकांची लागवड करावी. मका पीक घेऊ नये. त्यामुळे हळदीच्या उत्पादनात १५ ते २० टक्के घट होते.
हवामान :
मध्यम पाऊस व चांगल्या स्वच्छ प्रकाशात या पिकाची वाढ उत्तम होते. पाण्याचा ताण व जास्त पाऊससमान हे पीक काही वेळ सहज सहन करू शकते, परंतु जास्त दिवस पिकात पाणी साचून राहणे हानिकारक आहे. तसेच कडक हिवाळा या पिकास मानवत नाही. सरासरी ५०० ते ७५० मिलीमीटर असणार्या निमशुष्क वातावरणात हळदीचे पीक चांगले येते.
थंडीमुळे हळदीची पानेवाढ काही अंशी थांबते व जमिनीतील कंदांची (फण्यांची) वाढ होते. कोरडे व थंड हवामान कंद पोषणास अनुकूल असते.
जमीन :
या पिकास मध्यम प्रतीची तसेच चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. भारी काळ्या चिकन, क्षारयुक्त जमिनीत हळदीचे पीक चांगले येत नाही म्हणून हळद लागवडीसाठी शक्यतो अशा जमिनीची निवड करू नये. चांगल्या उत्पादनासाठी मध्यम, काळी, पोयट्याची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी. आपल्याकडे हलक्या व माळरानांच्या जमिनीत सुध्दा हळदीचे पीक घेता येईल. मात्र सरासरी उत्पादन मिळविण्यासाठी त्या जमिनीची सुपिकता वाढवणे, पोत सुधारणे, सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे आणि जमिनीची चांगली मशागत करणे इ. गोष्टी केल्यास माळरानावर सुध्दा हे पीक फायद्याचे ठरू शकते. शक्यतो चुनखडीयुक्त जमिनीमध्ये हळद पीक घेणे टाळावे. अशा जमिनीत पिकावर सतत पिवळसरपणा दिसून येतो व पिकाची वाढ चांगली होत नाही.
प्रकार :
१) खाण्याची हळद (Curcuma Longa ) : बहुवर्षीय जात असून ६० ते ९० सेंमी उंच वाढते. पानांना खमंग वास असून फळे तीनधारी असतात. बोंड, कंद आखूड व जाड असतो. पातळ पाने ६० ते ९० सेंमी लांब असून कंदापासून ६ ते १० पोपटी हिरव्या रंगाची पाने वाढतात. फुले पिवळसर पांढरी असतात, मात्र लागवडीच्या पिकात फळे धरत नाहीत, कारण ती नपुंसक असतात. या जातीची ९६ % लागवड भारतात होते.
२) कस्तुरी किंवा रानहळद ( Cucuma Caesia) : ही जात वार्षिक असून महाबळेश्वर, कोकण विभाग आणि आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणात लागवड करतात. कंद मोठे गोलाकार, फिकट पिवळे (आत नारिंगी लाल) असून कापराचा वास असतो. प्रक्रियेनंतरच्या (हळकुंडास) गोड वास असतो. ६.१ % हिरवट तपकिरी तेल, कापराचा वास असल्याने औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पाने लांब-वर्तुळाकर व आल्यासारखी टोकदार, मध्यशीरा उठावदार असतात, फुले सुवासिक, औषधासाठी उपयोग.
३) इस्ट इंडियन अॅरोरूट (East Indian Aroroot) : मध्यभारत, बंगाल, महाराष्ट्रा, तामिळनाडुच्या डोंगराळ भागात व हिमालयात या जातीची लागवड आढळते. कंदातील स्टार्च १२.५ % असून त्याचा उपयोग खर्या अॅरोरूटला पर्याय म्हणून तसेच मुलांना व आजारी माणसांना मिल्क पुडिंग करून देतात.
४) आंबेहळद (Curcuma Amada) : कोवळ्या कंदाला कच्च्या आंब्याचा वास असल्याने त्याला आंबे हळद म्हणतात. कोकण, बंगाल, तामिळनाडू व पश्चिम घाटातील भागात प्रामुख्याने लागवड केली जाते. कंद बारीक व आतील गार पांढरा असून कंदाचे लोणचे करतात. बहुवर्षायु जात असून पाने लांब वर्तुळाकार, आल्यासारखी व पानांचा जुडगा खालपासून वाढतो. मधली शीर उठावदार असते. फुले हिरवट - पांढरी असून बोंड तीनधारी असते.
ही हळद कातडी मऊ होण्यासाठी अंगाला चोळतात. मुरगळल्यावर व सुजेवर उगाळून लावतात. चामडीची खाज घालविते. थंड, पाचक व रक्तशुद्धीकरता, जंतुनाशक म्हणून उपयुक्त आहे.
५) काळी हळद (Curcuma Caesia) : बंगालमध्ये आढळते. ताजे कंद फिकट पिवळे, सुवासिक, सौंदर्यप्रसाधनात वापरतात. कंदामध्ये ९.७६% सुवासिक तेल असते.
६) कचोर (Curcuma Zedoria) : वार्षिक जात असून कोकणात सर्वत या जातींची लागवड आढळते. औषधाकरिता ताजे मूळ व गड्डे रक्त शुद्धीकरणासाठी वापरतात. पानांचा रस महारोगांवर उपयुक्त ठरतो.
सुधारित जाती :
१) फुले स्वरूप : ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केली असून सदर जात ही मध्यम उंच वाढणारी अशी आहे. सरळ वाढीची सवय असून पानांचा रंग हिरवा असून क्रियाशील पानांची संख्या ६ ते ७ असते. या जातीचा पक्क्तेचा काळ हा ८.५ महिन्याचा असून फुटव्यांची संख्या २ ते ३ प्रति झाड असते. या जातीचे जेठे गड्डे मध्यम आकाराचे असून वजनाचे ५० ते ५५ ग्रॅम असतात. हळकुंडे ३५ ते ४० ग्रॅम वजनाची असून प्रत्येक कंदात ७ ते ८ हळकुंडे असतात. त्यांनंतर त्यावर उपहळकुंडाची वाढ होत असते. मुख्य हळकुंडाची लांबी ७ ते ८ सें.मी. असते. बियाणे व उत्पादनाचे प्रमाण १:५ असे आहे. हळकुंडे सरळ लांब वाढतात. हळकुंडाच्या गाभ्याचा रंग गर्द पिवळसर असा आहे. या जातीमध्ये पिवळेपणाचे प्रमाण सध्या प्रसारीत असलेल्या जातीपेक्षा जास्त म्हणजे ५.१९% इतके असून उतार २२% इतका मिळतो. या जातीने सरासरी ओल्या हळदीचे उत्पादन ३५८.३० क्विं./हे. दिल्याचे दिसून आले असून वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७८.८२ क्विं./हे. हिल्याची नोंद आहे. या जातींमध्ये पानावरील करपा रोगास तसेच कंदमाशी या किडीस प्रतिकारक गुण असल्याचे दिसून आले आहे.
२) सेलम : या जातींची पाने रुंद हिरवी असतात. पिकाच्या एकूण वाढीच्या कालावधीमध्ये १२ ते १५ पाने येतात. झाडास सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये १२ ते १५ पाने येतात. हळकुंडे व उपहळकुंडे जाड व ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गाभ्याचा रंग केशरी पिवळसर असतो. हळकुंडावरील पेर्यांची संख्या ८ ते ९ असते. कच्च्या हळदीचे उत्पादन एकरी १२० ते १५० क्विंटल मिळते. या जातीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण ४.५ टक्के असते. वाळलेल्या हळदीचे एकरी २८ ते ३० क्विंटल उत्पादन मिळते. ही जात पक्क होण्यास ८.५ ते ९ महिने लागतात. चांगल्या कसदार पोताच्या जमिनीत या जातीच्या झाडांची उंची जवळजवळ ५ फुटांपर्यंत वाढते आणि ३ ते ४ फुटवे येतात. सध्या महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर ,हिंगोली,नांदेड व सोलापूर या जिल्ह्यामध्ये लागवड करण्यास महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर यांनी या जातीची शिफारस केली आहे.
३) कृष्णा (कडाप्पा ) : या जातीची हळकुंडे लांब, जाड व प्रमाणबद्ध असतात. हळकुंडाचा गाभा पांढरट पिवळा असतो. दोन पर्यामधील अंतर इतर जातीच्या तुलनेने जास्त असते. पेर्यांची संख्या ८ ते ९ असून झासांची पाने रुंद आणि सपाट असतात. एकून पिकाच्या कालावधीमध्ये १० ते १२ पाने येतात. पानावरील ठिपके (लिफ ब्लॉच) या रोगास ही जात अल्प प्रमाणत बळी पडते. वाळलेली हळकुंडे थोडीशी सुकलेली दिसतात. वाळल्यानंतर मुख्य हळकुंडाची लांबी जवळ जवळ ६ ते ७ सेंमी असते. या जातीच्या वाळलेल्या हळदीचे उत्पादन एकरी ३० ते ३२ क्विंटल येते. ही जात हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज येथून सन १९८४ साली कडाप्पा जातीमधून निवड पद्धतीने काढण्यात येऊन शेतकर्यांना लागवडीसाठी प्रसारित केली आहे.
४) राजापुरी : या जातीची पाने रुंद, फिकट हिरवी व सपाट असतात. पिकाच्या वाढीच्या एकूण कालावधीमध्ये १० ते १८ पाने येतात. झाडास फुले क्वचित येतात. हळकुंडे व उपहळकुंडे आखूड व जाड ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गड्ड्यांचा रंग पिवळा ते गर्द पिवळा असतो. शिजवल्यानंतर वाळलेल्या हळदीचा उतारा १८ ते २० टक्के पडतो व एकरी कच्च्या हळदीचे उत्पादन २२ ते २३ क्विंटल मिळते. ही जात करपा रोगास बळी पडते. पक्क होण्यास ८ ते ९ महिने लागतात. या जातीला स्थानिक बाजारपेठेत तसेच गुजरात व राजस्थान राज्यांतून चांगली मागणी असल्याने भावही चांगला मिळतो. बर्याच वेळा हळदीच्या वायदे बाजारातील भाव या जातीवरून ठरला जातो. महणून ही जात कमी उत्पादन देणारी असली, तरी लागवडीसाठी प्राधान्याने शेतकरी या जातीला पसंती देतात.
जमिनीची मशागत :
नांगरणी करून जमीन उन्हात तापू द्या. आडव्या-उभ्या पाळया द्या. लागवडीसाठी जमीन तयार करून घ्यावी. जमीन भुसभूसीत करण्यासाठी दोन वेळा खोलवर नांगरणी करा. तण, धसकटे आणि मुळे काढून टाका. २०-३० सेंमी खोलीची नांगराने उभी नांगरट करून तापू द्यावी त्यानंतर १०-१५ दिवसानी दुसरी आडवी नांगरट करावी . उभी, आडवी नांगरट पध्यतिचा वापर करा. कुळवानंतर सेंद्रिय खत वापरा. शेणखताचा वापर जास्त करा, खत कुजविणारे जिवाणू वापरा.
हळद लागवडीच्या पद्धती :
१) सरी वरंबा पध्दत : हळदीचे कंद जमिनीत वाढत असल्याने या पिकाची लागवड सरी वरंबा किंवा रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावयाची झाल्यास ७५ ते ९० सेंमी अंतरावर सर्या पाडून घ्याव्यात. शक्य असेल तर सरी पाडण्यापूर्वी शिफारस केलेले स्फुरद आणि पालाश जमिनीत टाकून द्यावे. जमीनच्या उताराप्रमाणे ६ ते ७ सरी वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुर्याची लांबी जमिनीच्या उतारानुसार पाणी बसेल अशी ठेवावी. सोयीप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाण्याचे पाट सोडावेत.
२) रुंद वरंबा पध्दत : रुंद वरंबा पद्धतीने रान बांधणी करून काही ठिकाणी अधिक उत्पादन घेतले जाते. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसून उत्पादनात २० ते २५ % वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या पद्धतीने जमिनीस पाणी देण्यास जास्त त्रास होतो म्हणून अशा पद्धतीने लागण करावयाची असल्यास जमीन समपातळीत असणे आवश्यक आहे किंवा पाणी देण्याच्या सुधारित तंत्रज्ञानामधील ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे. रुंद वरंबा तयार करताना १५० सेंमी अंतरावर प्रथम सर्या पाडाव्यात. त्या सर्या उजरून ८० ते ९० सेंमी माथा असलेले १५ सेंमी उंचीचे व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी व्यवस्थित बसेल अशा लांबी रूंदीचे सरी वरंबे पाडावेत. वरंब्याचा माथा सपाट करून घ्यावा आणि मग लागवड करून घ्यावी.
लागवडीचा हंगाम आणि लागवड :
हळदीची लागवड साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. ठिकठिकाणच्या स्थानिक प्राप्त परिस्थितीनुसार लागवडीचा कालावधी मागेपुढे होतो. लागवडीसाठी वापरले जाणार्या बियाणांची सुप्तावस्थ संपलेली असावी. बियाणाचे डोळे नकळत फुगलेले असावेत. कुजलेले, अर्धवट सडलेले बियाणे लागवडीसाठी वापरू नये. लागवडीसाठी हळकुंड बियाणे वापरले तरी चालतात. मात्र हळकुंड बियाणे ३० ग्रॅमपेक्षा वजनाने मोठे असावेत. सरी वरंबा पद्धतीने लागवड करावयाची झाल्यास वरंब्याच्या दोन्ही बाजूस ३० सेंमी अंतरावरती गड्डे कुदळीने अगर्या घेऊन लावावेत किंवा वाकुरी पाण्याने भरल्यानंतर गड्डे पाण्यामध्ये वरंब्यात ३ ते ५ सेंमी खोल दाबून घ्यावेत. रुंद वरंबा पद्धतीने ३० बाय ३० सेंमी अंतरावरती गड्डे लावून घ्यावेत. लागवडीच्या वेळी गड्डे पुर्ण झाकले जातील याची दक्षता घ्यावी.
जोड ओळ पद्धत : दोन ओळींतील नेहमीचे अंतर कमी करून पुढील दोन ओळींतील अंतर वाढवा. पानांची फारशी दाटी होणार नाही अशी दक्षता घ्या. दोन ओळींतील अंतर ३० सेंमी पर्यंत कमी करता येईल.
सोडओळ पद्धत : पेरणी नेहमीच्या अंतरावर करतात. पण प्रत्येक दोन ओळींनंतर एक ओळ पेरत नाहीत. त्या कमी झालेल्या ओळीतील रोपे राहिलेल्या दोन ओळींच्या जागेमध्ये लावतात व सोडलेल्या ओळीत आंतरपीक घेतात.
रुंद पेरा पद्धत : या पद्धतीत पिकाच्या दोन ओळीतील अंतर नेहमीच्या दुप्पट ठेवतात. कमी झालेल्या ओळीतील रोपे उरलेल्या ओळीमधील जागेत पेरतात.
बीजप्रक्रिया :
एकरी हजार किलो कंद पुरेसे असतात. फळबागेमध्ये आंतरपीक म्हणून घेतल्यास एकरी १२५-२०० किलो कंद लावावेत. २५ % क्विनालफोस २० मिली किंवा ३० % डायमेथोएट १० मिली पैकी एक + ५० % कार्बेन्डाझिम २५ ग्राम किंवा डायथेन एम ४५, ३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून प्रक्रिया करा. कंद १०-१५ मिनटे द्रावणात बुडवा. १० लिटरचे द्रावण १००-१२० किलो बियाणांस पुरते. रासायनिक बीजप्रक्रीयेनंतर २५ ग्राम अझोस्पाइरिलियम तसेच २५ ग्राम पी.एस.बी प्रति लिटर पाण्यात घेवून त्यात १०-१५ मिनिटे बुडवा व लागण करा.
आंतरमशागत (भरणी करणे) :
हळदीच्या लागवडीनंतर २.५ ते ३ महि
न्यांनी भरणी करणे अत्यंत आवश्यक आहे. सरीमधील माती किंवा लागण केलेल्या दोन्ही गड्ड्यांच्यामधील मोकळ्या जागेमधील माती १.५ ते २ इंच शिपीच्या कुदळीने खणून दोन्ही बाजूंच्या गड्ड्यांना लावणे म्हणजे 'भरणी करणे' होय.
माती लावताना संपूर्ण कंद झाकला जाईल अशा पद्धतीने माती लावावी. भरणी केल्यानंतर पिकास हलकेसे पाणी द्यावे. भरणी केल्यामुळे नवीन येणारे हळकुंड झाकले जातात व त्यांची चांगली वाढ होते. मात्र याउलट भरणी न केल्यास जमिनीच्या बाहेर आलेल्या हळकुंडाची वाढ होत नाही. थोडीफार झाली तरी ती निकृष्ट दर्जाची होते आणि उत्पादनामध्ये जवळजवळ १० ते १५ टक्क्यांनी घट येते.
तण व्यवस्थापन :
बेण्याच्या लागवडीनंतर शिफारशीनुसार एकरी ८०० ग्राम सिमाझीन किंवा ११०० ग्राम बुटाक्लोर किंवा ३०० ग्राम बसालिन फवारा व बाळा भरणी वेळेस खुरपनी करून घ्यावी.
पिकाचे पोषण :
जैविक खते : एकरी १५-१८ टन शेणखत किंवा कंपोस्ट हे जमीन तयार करताना शेतात टाका किंवा लागवडीनंतर कंद झाकण्यासाठी वाफ्यावर पसरा. लागवडीच्या वेळी एकरी ८ क्विंटल निंबोळी पेंड जमिनीत घातल्यास कंद कूज, सूत्रकृमी यांच्यापासून पिकाचे संरक्षण होते.
रासायनिक खते : माती परीक्षणानुसार पेरणी करताना व पेरणीनंतर चार महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला एकरी १० : १०: ७ किलो नत्र : स्फुरद : पालाश द्यावे.
विद्राव्य खते : लागवडीनंतर ९० व १२० दिवसांनी एकरी ३ किलो कैल्शियम नायट्रेट व ३ किलो फेरस सल्फेट वेगवेगळे ठिबकने पिकास सोडावेत. लागवडीनंतर ५ महिन्यांनंतर १०-१२ दिवसांच्या अंतराने एकरी ७ किलो ००:५२:३४ ठिबकने द्यावे. ६ महिन्यानंतर हाच डोस चालू ठेवावा. पिकाच्या शेवटच्या काळात म्हणजे ७ महिन्यानंतर एकरी ५ किलो ००:००:५० ठिबकने द्यावे.
सुक्ष्म अन्नद्रव्ये : लागवडीच्या वेळी मातीपरीक्षणानुसार एकरी २ किलो झिंक सल्फेट द्यावे. वाढीच्या काळात बोरॉन, लोह आणि झिंक कमतरता भरून काढण्यासाठी १५० ग्राम फेरस सल्फेट, १५० ग्राम झिंक सल्फेट, १५० ग्राम बोरॉक्स व १२० ग्राम युरीया २५० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारा.
किंवा
लागवडीनंतर १०-१५ दिवसांनी २.५-३ ग्राम १९:१९:१९ + २.५-३ ग्राम मिश्र सुक्ष्म अन्नद्रव्ये + १ ग्राम चिलेटेड झिंक प्रती लिटर पाण्यातून फवारा.
लागवडीनंतर ४०-४५ दिवसांनी १ ग्राम चिलेटेड फेरस + २.५-३ ग्राम मिश्र सुक्ष्म अन्नद्रव्ये प्रती लिटर पाण्यातून फवारा.
लागवडीनंतर ४ महिन्यांनी ४-५ ग्राम ००:५२:३४ + २.५-३ ग्राम मिश्र सुक्ष्म अन्नद्रव्ये प्रती लिटर पाण्यातून फवारा.
लागवडीनंतर ६ महिन्यांनी २-३ वेळेस ४-५ ग्राम ००:५२:३४ + १ ग्राम बोरॉन लिटर पाण्यातून फवारा.
लागवडीनंतर ८ महिन्यांनी ४-५ ग्राम ००:००:५० + २-२.५ ग्राम कॅल्शियम नायट्रेट प्रती लिटर पाण्यातून फवारा.
पाणी व्यवस्थापन :
सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास, हवामान व मातीच्या प्रकारानुसार, १५-४० वेळा ७-१० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पेरणी पुर्वी किंवा पेरणी नंतर पहिले हलके पाणी द्यावे. दुसरे पाणी पेरणी नंतर ३-४ दिवसांनी द्यावे. त्यानंतर ८ ते १० दिवसाच्या अंतराने द्यावे. गरज असल्यास रुजवण होण्याच्या काळात ८-१० दिवसाच्या अंतराने व हलक्या जमिनीत ७-८ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्यावे. हिवाळ्यामध्ये १२-१५ दिवसांनी पाणी द्यावे. काढणीच्या अगोदर १५ दिवस पाणी देऊ नये.
मध्यम वाढीच्या काळात भारी जमिनीत ४ वेळा सिंचन १०-१२ दिवसाच्या अंतराने व हलक्या जमिनीत ६ वेळा सिंचन ७-८ दिवसाच्या अंतराने द्यावे. सक्रिय वाढीच्या काळात भारी जमिनी मध्ये ६ वेळा १०-१५ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे व हलक्या जमिनीत १० वेळा, ७-८ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
शिथिल वाढीच्या काळात भारी जमिनीत ४ वेळा, १०-१५ दिवसाच्या अंतराने तर हलक्या जमिनीत ८ वेळा, ७ ते ८ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. शिथिल वाढीच्या काळात भारी जमिनीत ४ वेळा, १०-१५ दिवसाच्या अंतराने तर हलक्या जमिनीत ८ वेळा, ७ ते ८ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. तयार होण्याच्या काळात भारी जमिनिसाठी ४ वेळा, १०-१२ दिवसाच्या अंतराने तर हलक्या जमिनीत ८ वेळा, ७-८ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
पिक संरक्षण :
कंद माशी, अंकुर पोखरणारी अळी, रसशोषक किडी, हुमणी या किडींचा तर करपा, मुळ/कंदकुज, लीप ब्लॉच, पानावरील डाग, पाने पिवळी पडणे, इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. चांगल्या उत्पादनासाठी वेळोवेळी कीड व रोगांवर तज्ञांचा सल्ला घेऊन नियंत्रण मिळवा.
काढणी :
हळद लागवडीमध्ये अतिशय महत्त्वाची आणि शेतकरी बंधूना खर्या अर्थाने क्लिष्ट वाटणारी बाब म्हणजे काढणी होय. चांगल्या उत्पादन देणार्या हळद पिकाची काढणी ८.५ ते ९ महिन्यांनी करावी. पक्क झालेल्या हळद पिकाच्या झाडाला पाला जमिनीच्या मगदूरानुसार पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ६० ते ८० टक्केच वाळला जातो. अशावेळी झाडाचा पाल जमिनीलगत धारदार विळ्याने कापून घ्यावा. त्यानंतर जमीन थोडीशी भेगाळून घ्यावी आणि कुदळीच्या सहाय्याने हळद काढणी करावी. काढणी करताना जेठे गड्डे, हळकुंडे, सोर गड्डा अशी प्रतवारी करावी. काढणीनंतर हळकुंडे तसेच बियाणे त्वरीत सावलीच्या ठिकाणी हलवावे.
गड्डे जातीपरत्वे ८-९ महिन्यांनी वेळेत काढावेत. काढणीचे वेळी गड्ड्यांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी. इजा झालेले गड्डे वेगळे ठेवावे. सर्व गड्डे सावलीत किंवा छपराखाली ढीग करून ठेवावे. जरूरीप्रमाणे पाणी शिंपडावे. असे गड्डे पुढील वर्षी लागवडीस वापरतात. काढणी करताना जेठे गड्डे, बगल गड्डे, हळकुंडे, सोरा गड्डा अशी प्रतवारी करणे उत्तम. आत्ता नविन तंत्रज्ञाना उपयोग करुन हळद काढणी साठी ट्रैक्टर चलीत यंत्र सुध्दा उपलब्ध झाले आहे.
Comments
Post a Comment