मोहरीची सुधारित शेती

मोहरीची सुधारित शेती 

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download  Agrojay  Mobile Application:  http://bit.ly/Agrojay )


देशाच्या अर्थव्यवस्थेत तेलबिया पिकाला अतिमहत्त्वाचे स्थान आहे. आपल्या  देशात मोठय़ा प्रमाणावर खाद्यतेलाची आयात केली जाते. तेलबियांमध्ये मोहरी हे देशातील दुस-या क्रमांकाचे पीक असून, त्याचा खाद्यतेल तयार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. तसेच या वनस्पतीच्या तेलाचा उपयोग आयुर्वेदिक औषधे आणि सौंदर्य प्रसाधने बनविण्यात पण मोठ्या प्रमाणत केला जातो. त्यामुळे मोहरीच्या तेलाला मोठी बाजारपेठ असून, शेतक-यांना आर्थिक लाभ देणारे हे पीक आहे.

भारतात पंजाब, उत्तर प्रदेश, तामिळनाडू या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होते. महाराष्ट्रात हे पीक रब्बी हंगामात गहू किंवा हरभरा या पिकात मिश्रपीक म्हणून घेतले जाते. सिंधुदुर्गमध्ये या पिकाची लागवड केली जाते. मात्र, या जिल्ह्याची गरज भागवण्यापुरतेच यातून उत्पादन मिळते. महाराष्ट्रात मिळणारी मोहरी भुरकट आकाराने लहान तर पंजाब आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी मिळणारी तांबूस, काळपट आणि आकाराने मोठी असते.


मोहरी ही एका हंगामात जीवनक्रम पूर्ण करणारी लहान झुडपासारखी वनस्पती आहे. ही वनस्पती ३ ते ४ फूट उंच व हिरवीगार कोवळे असते. या वनस्पतीला प्रधानमूळ असून त्यावर पाश्र्विक मुळे व उपमुळेसुद्धा असतात. खोड भुरकट पांढरे असून अल्पलोमयुक्त अनेक फांद्या असतात. पाने साधी, एका आड एक, लांबट, मुळाजवळ मोठी, टोकाकडे रुंद, बोथट, लांब देठावर, अनियमितपणे कातरलेल्या कडांची असतात. वरील पाने लहान देठरहित, टोकदार दंतूर कडाची, सर्व पानावर बोचणारे लोम असतात. कधीकधी या पानाची लांबी एक फुटापर्यंत सुद्धा असते. फुले पिवळी धमक, फांदीच्या टोकावर लांबत जाणा-या तु-यावर (मंजिरीवर) येतात. फुले खालून वरच्या दिशेने उमलत जातात. फळे शेंगासारखी ३ ते ५ से.मी. लांब व टोकदार, खाली फुगलेली व शेंड्याला टोकदार असते. या फळामध्ये बिया १० ते १५ असून त्या लहान, गोलाकार व काळपट किंवा तांबूस भुरकट रंगाच्या असतात. १०० ग्रॅम मोहरीमध्ये ३५ ते ४८ टक्के स्थिर तेल, २५ टक्के अस्थिर तेल, २० टक्के प्रथिने आणि एरूसिक अ‍ॅसिड असते

सुधारित जाती :

मोहरीच्या बियांमध्ये साधारणत: ३६ ते ४० टक्के तेलाचे प्रमाण असते. सुधारित वाणाची निवड केल्यामुळे २५ ते ३५ टक्केवाढ होऊ शकते. संपूर्ण महाराष्ट्रासाठी खालील सुधारित वाणांची कोरडवाहू व ओलिताखाली कृषी विभागाने शिफारस केलेली आहे.
१) सीता - पश्‍चिम, उत्तर महाराष्ट्र विदर्भासाठी प्रसारित.
२) पुसा बोल्ड - पीक तयार झाल्यावर गळ होत नाही.
३) वरुणा - महाराष्ट्रासाठी.
४) पुसा जयकिसान - महाराष्ट्रासाठी.
५) रजत - महाराष्ट्रासाठी.
६) टी.पी.एम. १ - भुरी रोगास प्रतिकारक, पिवळे दाणे, पश्‍चिम महाराष्ट्रासाठी.
७) क्रांती - महाराष्ट्रासाठी.
८) आरसीएम १९८ - महाराष्ट्रासाठी.


हवामान आणि जमीन :

मोहरी हे पीक समशितोष्ण कटिबंधातील आहे. मोहरी पिकाला २० अंश ते ३० अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असून, या पिकाची चांगली वाढ होण्यासाठी जास्त उष्णतेची आवश्यकता असते. तर बियाणे पूर्ण तयार होण्यासाठी कमी तापमानाची आवश्यकता असते. पीक फुलो-यात असताना ढगाळ वातावरण या पिकाला हानिकारक असते.

या पिकास मध्यम ते भारी आकाराची जमीन योग्य असते. लागवडीसाठी जमिनीत पाण्याचा उत्तम निचरा असावा. तसेच ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमताही असावी.


लागवड :

पीक जिराईत आणि बागायती अशा दोन्ही अवस्थेत घेता येते. खरीप पिकाच्या काढणीनंतर एक नां गरणी व दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पेरणीपूर्वी जमीन ओलावून वाफसा आल्यावर पेरणी केल्यास उगवण चांगली होते. जर मोहरी बागायती पीक म्हणून घ्यावयाची असेल, तर सारायंत्र किंवा वखराने सारे पाडावेत, म्हणजे पिकाला पाणी समप्रमाणात देणे शक्‍य होते.

जिरायती मोहरीची पेरणी १५ ऑक्‍टोबरपर्यंत करावी. बागायती मोहरीची पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत केली तरी चालते. जिरायती पीक घ्यावयाचे असल्यास पुरेशी ओल असताना व बागायती पिकास पाणी देऊन चांगला वाफसा आल्यावर तिफणीने पेरणी करावी. भारी जमिनीत दोन ओळींतील अंतर ४५ सें.मी., तर मध्यम जमिनीत ३० सें.मी. ठेवावे. बियाणे फार खोलवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. हेक्‍टरी पाच किलो बियाणे वापरावे. पेरणीसाठी दिशेलासुद्धा महत्त्व असून, मोहरीची पेरणी दक्षिण-उत्तर करावी. पेरणीच्या दिशेमुळे ४ ते ११ टक्क्यांपर्यंत उत्पन्नात वाढ होते. या पिकात विरळणी करणे फार गरजेचे आहे, त्यामुळे पिकाची संख्या कमी होऊन रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो व उत्पन्न चां गले येते. त्यासाठी पेरणीनंतर १५-२० दिवसांनी विरळणी करून दोन रोपांमधील अंतर १० ते १५ सें.मी. ठेवावे. आंतरपीक प्रयोगात गहू अधिक मोहरी (४:२) या प्रमाणात घेतल्यास जास्त फायद्याचे आढळून आले. पेरणीसाठी दिशेलासुद्धा महत्त्व असून, मोहरीची पेरणी दक्षिण-उत्तर करावी. सलग पिकापेक्षा मिश्रपीक पद्धतीत प्रतिहेक्टरी जास्त उत्पन्न मिळते.

खत व्यवस्थापन :

बागायती पिकासाठी हेक्‍टरी ५० किलो नत्र व २५ किलो स्फुरद द्यावे. नत्राची अर्धी मात्रा (२५ किलो) व संपूर्ण स्फुरद (२५ किलो) पेरणीच्या वेळी पेरून द्यावे. राहिलेले अर्धे नत्र (२५ किलो) पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी द्यावे. कोरडवाहू पिकासाठी ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे. रासायनिक खते पेरून द्यावीत. तसेच पीक तयार झाल्यानंतर झाडावरील सर्व पाने गळून जमिनीवर पडतात. त्यामुळे सेंद्रिय पदार्थ जमिनीत टाकले जातात.


पाणी व्यवस्थापन :

या पिकाला पाण्याची गरज कमी असते. पिकाला सोटमुळे असल्याने जमिनीतील खोलवरील ओलाव्याचा उपयोग होतो. साधारणत: पाण्याच्या ३ ते ४ पाळ्या १५ ते २० दिवसाच्या अंतराने देणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे फुले येण्याच्या अवस्थेत, शेंगा लागण्याच्या वेळी आणि दाणा भरतेवेळी पाणी देणे अत्यंत महत्त्वाचे आणि फायद्याचे ठरते. पाण्याचा ताण पडल्यास या पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो.


काढणी व उत्पन्न :

या पिकाचा कालावधी ९५ ते ११५ दिवसांचा असतो. झाडावरील ७५ ते ८० टक्के शेंगा पिवळय़ा पडल्यानंतर व शेंगातील दाणे टणक झाल्यावर मोहरी पीक काढणीस आले आहे, असे समजावे. शक्यतो काढणी सकाळच्या वेळी करावी. काढणीस फार उशीर झाल्यास शेंगा फुटतात. यासाठी काढणी योग्य वेळी करावी. पीक कापणीनंतर एका ठिकाणी पेंढय़ा बांधून जमा करून ढीग घालावा व नंतर काठीने झोडपून दाणे शेंगापासून वेगळे करावेत. सुधारित लागवड पद्धतीचा अवलंब केल्यास मोहरीचे हेक्टरी उत्पन्न १२ ते १५ क्विंटल पर्यंत मिळते.


सुधारित जातींची निवड, योग्य खताची मात्रा, पाणी व्यवस्थापन, कार्यक्षम पीक संरक्षण आणि वेळेवर कापणी या बाबींचा योग्य वापर करून सुधारित पद्धतीत लागवड केल्यास या पिकापासून चांगले उत्पन्न मिळू शकते. केवळ शेतीमध्ये स्वत:पुरते हे पीक घेण्यापेक्षा शेतकऱ्यांनी सुधारित पद्धतीची लागवड करून मोहरी पीक घेतल्यास एक पर्यायी आंतरपीक म्हणून मोहरी फायदेशीर ठरेल.



(Download  Agrojay  Mobile Application:  http://bit.ly/Agrojay )

Agrojay Innovations Pvt. Ltd.



Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology