सुधारित दोडका लागवड

सुधारित दोडका लागवड 

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download    Agrojay    Mobile Application: -    http://bit.ly/Agrojay   )


दोडका अर्थात शिराळे हा दक्षिण आशियापासून आग्नेय आशिया व पूर्व आशियापर्यंत आढळणारा एक वेल आहे. याला दंडगोलाकार, शिरा किंवा कंगोरे असलेल्या सालीची फळे येतात. याची कोवळी फळे भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो, तसेच याची वाळलेली फळे अंघोळीसाठी नैसर्गिक स्पाँज म्हणून वापरली जातात.

दोडक्यांचा वापर आयुर्वेदात, उलटी व जुलाबाचे औषध म्हणून केला जात असे. वाळलेल्या दोडक्याची जाळी व गोखरू यांची धुरी घेतल्यास मुळव्याधीतील मोडावर इलाज होतो असा आयुर्वेदिक तज्ञांचा अनुभव आहे. प्रदुषणयुक्त वातावरणातून, गर्दीतून वाहन नेताना माणसाच्या मनावर जो ताण निर्माण होतो. तो ताण पातळ मुगाच्या डाळीबरोबर दोडक्याची भाजी भाकरीसोबत खाल्ल्यास कमी होतो. ही भाजी पाचक आहे. दोडक्याच्या सालीची चटणी इतर चटणीबरोबर (उदा. शेंगदाण्याची चटणी वगैरे) तर चविष्ट व आरोग्यदृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.


जमीन :


या पिकासाठी अर्धा ते एक मीटर खोलीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम काळी, कसदार जमीन निवडावी. क्षारयुक्त जमिनीत या पिकांची लागवड करू नये. हलकी ते मध्यम आणि उत्तम निच-याची जमीन चांगली मानवते. काळ्या जमिनीत जेथे पाणी धारण करण्याची क्षमता ५०% च्यावर आहे, तेथे पाण्याचा निचरा कमी झाल्याने जमीन जास्त फुगते व त्याच आर्द्रतेचे बाष्पीभवनामुळे पानाच्या खालील व वरील बाजूस ते बाष्प साठल्यामुळे खालच्या बाजूने करपा व वरच्यावर पानांवर भुरी पडण्याची दाट शक्यता असते.

हवामान :

या पिकाना चांगल्या वाढीसाठी समशीतोष्ण, कोरडे हवामान चांगले मानवते. कमी तापमान आणि जास्त आर्द्रता असल्यास या पिकांची वाढ चांगली होत नाही. रोग व किडीचे प्रमाण वाढते. २५ अंश सेल्शिअस ते ३५ अंश सेल्शिअस हे तापमान दोडक्याच्या वाढीस योग्य आहे. भरपूर सूर्यप्रकाश असणे पिकाच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहे.

सुधारित जाती :

दोडक्‍याच्या लागवडीसाठी पुसा नसदार, पुसा चिकनी, जयपूर लाँग, कोकण हरिता, फुले सुचिता, पनवेल या जातींची निवड करावी.

लागवड :

या पिकाची लागवड खरीप हंगामात जून-जुलैमध्ये, तर उन्हाळ्यात जानेवारी-मार्चमध्ये करावी. जास्त पावसाच्या भागात हिवाळ्याच्या सुरवातीला सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यांत लागवड करतात.
दोडका हे १२ ही महिने येणारे व ३ महिन्यात संपणारे पीक आहे. एक एकर क्षेत्र लागवडीसाठी दोडक्याचे ७०० ते १००० ग्रॅम बियाणे लागते. बियांचे कवच जाड असते, त्यामुळे बीजप्रक्रिया करणे गरजेचे असते. बियांची चांगली उगवण होण्यासाठी बिया २४ ते ४८ तास ओल्या फडक्‍यात बांधून ठेवाव्यात. लागवडीपूर्वी बियांना 3 ग्रॅम बाविस्टीन प्रति किलो याप्रमाणे बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. नंतर ऍझोटोबॅक्‍टर या जिवाणू- संवर्धकाची (२५० ग्रॅम/ १० किलो बियाणे) बीजप्रक्रिया करावी. जिवाणू मुळांच्या सान्निध्यात वाढून हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरीकरण करतात, यामुळे पिकाची वाढ जोमदार होऊन उत्पादनात भरीव वाढ होते. 


सर्वसाधारणपणे कारली या पिकासाठी ताटी पद्धतीचा वापर करावा. लागवडीचे अंतर १.५ मीटर बाय १ मीटर किंवा १.५ बाय ०.६ मीटर ठेवावे. जमिनीवर लागवड करताना ५ मीटर बाय १ मीटर अंतर ठेवावे. पारंपरिक पद्धतीपेक्षा या सुधारित पद्धतीमुळे कमी पाण्यात उत्पादनात वाढ मिळते. मांडव केल्यामुळे फळांना माती लागत नाही. फळे निरोगी आणि लांबट होतात. दोन ओळींतील अंतर जास्त असल्यामुळे यंत्राच्या साहाय्याने आंतरमशागत करणे सुलभ होते. ताटी अथवा मंडप पद्धतीमुळे भरपूर सूर्यप्रकाश खेळता राहतो, त्यामुळे फळांची प्रत सुधारते. वेलीवर कीटकनाशक अथवा बुरशीनाशकाची फवारणी करणे सुलभ होते. उत्पादनात अंदाजे २० ते २५ टक्के वाढ होते. फळांची तोडणी करणे अतिशय सोईस्कर होते.
दोडका हे पीक आंतरपीक म्हणून केले तरी फायदा होतो. कमी क्षेत्र व मर्यादित पाणी असणारे शेतकरी दोडका हे पीक फळबागगांमध्ये आंतरपीक म्हणून घेतात. हे पीक वर्षातून दोनदा आलटून-पालटून घेता येते.


खत व्यवस्थापन :

लागवडीपूर्वी शेताची चांगली मशागत करून एकरी ५ ते ७ टन शेणखत मिसळावे. माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी. सर्वसाधारणपणे एका एकर मधील दोडक्याला ३० किलो नत्र, २० किलो स्फुरद, २० किलो पालाश द्यावे लागते.

पाणी व्यवस्थापन :

ठिबक सिंचनामुळे दोडका चांगला मोठा व चविष्ट होतो. आजुबाजूची पाने कोरडी राहिल्याने झपाट्याने वाढतात. पाणी देतान खोडाचा देठ भिजणार नाही याची काळजी घ्यावी. अनियमित 'भीज पाणी' न देता नियमित 'टेक पाणी’ द्यावे. थंडीमध्ये सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत पाणी द्यावे. उन्हाळ्यामध्ये मात्र सकाळी ९ च्या आत पाणी द्यावे. फूल लागल्यानंतर चौथ्या दिवशी पाणी द्यावे. पाण्याचा ताण बसल्यावर दोडका वाढतो परंतु तो आतून पोकळ राहिल्याने बाजारपेठेत अश्या फळांना योग्य दर मिळत नाही.

काढणी व उत्पादन :

दोडका हे पिक १४० ते १५० दिवसांचे असते. लागवडीपासून प्रथम तोडणी ६५ ते ७५ दिवसात सुरू होते. एकरी ७५ ते १०० क्विंटल उत्पादन मिळते.
दोडका बाजारपेठेत नेताना त्यांची काळजी घ्यावी, फळ एकमेकांना घासून नये यासाठी पसरट पाटीमध्ये फळांच्या खाली गाजरगवताचा पाला घ्यावा व त्यावर निरगुडी व कडुनिंबाचा पाला टाकावा. त्यावर पळस, एरंडाची पाने ठेवून भरावीत. लांब दोडके असल्यास बैलगाडीचे आख, चाक किंवा घड्याळाच्या काट्याप्रमाणे भरावीत.



(Download    Agrojay    Mobile Application: -    http://bit.ly/Agrojay   )



Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology