खजूराची लागवड
खजूराची लागवड
आपल्या परिसरात अनेक प्रकारची झाडे असतात. आपण दररोज पौष्टिक फळे खात असतो. त्यांच्या बिया आपल्या परिसरात पडल्या कि, त्यांची रोपे उगवतात. त्यांपैकी एक झाड म्हणजे ‘खजूर’ होय. ही उपयुक्त वनस्पती इतिहासपूर्व काळापासून मानवास परिचित असून हिचे मूलस्थान उत्तर आफ्रिका किंवा अरबस्तान असावे. भारतात दाक्षिणात्य राज्ये, गुजरातचा काही भाग आणि राजस्थानात खजुराची शेती केली जाते. तथापि, आर्द्रतेमुळे तेथील फळांना हवा तसा गोडवा मिळत नाही. महाराष्ट्रातील (विशेषत: विदर्भातील) वातावरण खजुराच्या शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहे, पण आजवर ना राज्य सरकारने ना केंद्र सरकारने या पिकाकडे जातीने लक्ष दिले. कृषी विभागाच्या अधिकार्यांनी देखील या फळाचा फलोत्पादनाच्या सूचीत समावेश केलेला नाही. विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर खजुराची शेती हा उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो.
गुजरातमध्ये इस्त्रायलकडून आयात केलेल्या उती संवर्धीत जातींच्या खजुराच्या बागा आहेत. मागील दहा वर्षांपासून खजूराच्या बागा वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गुजरात, राजस्थान सरकार या फळासाठी ४०-९० टक्के सबसिडी देते, तशीच सबसिडी राज्य सरकारनेही गरीब शेतकर्यांना दिली तर या पिकाची लागवड निश्चितपणे वाढेल.
खजुराच्या एका झाडाची किंमत ३८०० ते ४५०० पर्यंत येते. इंग्लंड, इस्राईलहून आणलेली रोपटी राजस्थान, गुजरात येथील प्रयोगशाळेत आणून भारतीय वातावरणानुकूल केली जातात. त्यानंतर ही रोपटी देशभर पाठविली जातात. उती संवर्धीत विदेशी रोपट्यातून अधिक उत्पन्न मिळत आहे. एक झाड १०० ते १५० वर्षे जगते.
झाडाचे वर्णन :
खजुराचे झाड थोडेफार नारळाच्या झाडाशी मिळतेजुळते असते. या झाडाची उंची सर्वसाधारणपणे ६० ते ७० फुट असते. या झाडाचे खोड उंच व सरळ वाढते. या झाच्या फक्त टोकाशीच फांद्यांचा झुपका असतो. तसेच खोडावर भरपूर खाचा असतात त्या गळून पडलेल्या पानांच्या बुडापासून झालेल्या असतात. खोड पोकळ असते. पाने टनक व टोकाला अणकुचीदार असतात. तसेच ३ ते ४ फुट लांब असतात.
खजुराच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे विभक्तलिंगी झाडांची निर्मिति. ह्यात स्त्री आणि पुरुष अशी दोन प्रकारची झाडे असतात त्यातील पुरुष लिंगी झाडे हि परागकण निर्मिती करतात तर स्त्रीलिंगी झाडे फळांचे उत्पादन करतात. दोन उत्कृष्ट प्रकारच्या पुरुष वर्गातील झाडांचे परागकण हे साधारणपणे पन्नास स्त्री वर्गातील झाडांच्या परागीकरणासाठी पुरेसे ठरतात. एका मादी झाडावर साधारणपणे १०-१५ फुलोरे येतात; त्यांपैकी काही लहान तुरे तोडून टाकतात त्यामुळे राहिलेल्या तुऱ्यांवर चांगली फळे येतात. या झाडांचे परागण (परागसिंचन) वाऱ्यामुळे होते. नर झाडे माद्यांच्या संख्येच्या मानाने कमी असतात. कृत्रिम रीत्या पुं-पुष्पाची स्थूलकणिशे स्त्री-पुष्पांवर बांधून परागण घडवितात. हे परागकण गोळा करून कागदाच्या पुडीत काळजीपूर्वक ठेवल्यास त्याचा उपयोग निदान एक वर्षभर करता येतो. हंगामाव्यतिरिक्त फुलणाऱ्या झाडांच्या परागणास त्यांचा उपयोग होतो. सिंध प्रांतात साधारणत: २० फेब्रुवारी ते ३० मार्चपर्यंत कृत्रिमपणे असे परागण करतात.
जाती :
खजुराच्या ३००० जाती असून त्यातील ४०० इराणमध्ये, २५० टयुनिशियात, ३७० इराकमध्ये आहेत. यापैकी फक्त १५९ जाती व्यावसायिक शेतीसाठी उपयुक्त आहेत.
खजुराच्या जातींची तीन प्रकारात विभागणी केली जाते, ती अशी
१) नरम खजूर : अत्यंत नरम गर ज्यात भरपूर ओलावा आणि साखरेचे प्रमाण अत्यंत कमी असलेला. ह्या प्रकारातील प्रमुख जाती - खलास कासीम, खलास खर्ज, इ.
२) अर्ध-सुकलेले खजूर : थोडासा कडक गर ज्यात किंचित ओलावा आणि साखरेचे प्रमाण भरपूर असलेला. ह्या प्रकारातील प्रमुख जाती – अजवा, अनबरा, बार्नी, इ.
३) पूर्ण सुकलेले खजुर : कडक असा गर ज्यात साखरेचे प्रमाण भरपूर. ह्या प्रकारातील प्रमुख जाती – रुथाना, सुक्करी, इ.
भारतात प्रामुख्याने बारही, दायरी, डेग्लेट नूर, हिलावी, खुदाची, जाहिदी, सैदी, मक्तूम, मेजदूल, थुरी, खस्तावी, सायेर, इ. जातींचे खजूर आढळतात. विविध प्रकारच्या जातींचे खजूर हे प्रामुख्याने झाडाच्या पानाच्या आकारावरून, बुंध्यावरून ओळखले जातात.
जमीन :
जमिनीच्या बाबतीत खजुरीचे झाड फारसे चिकित्सेखोर नाही. या पिकाला सुपीक जमिनीची गरज नसते. कोणतीही जमीन चालणारे हे झाड रेताड, वाळवंटी जमिनीत चांगले येते व फळही लवकर पिकते. मातीच्या वरच्या थरामध्ये क्षाराचे प्रमाण शेंकडा ३-४ पर्यंत असले तरी झाड बिघडत नाही; पण त्याला फळ मात्र येत नाहीं. फळ येण्यासाठी झाडाच्या मुळ्या बर्याच खोल जाऊन तेथील क्षारांचे प्रमाण शेकडा अर्धा इतके उतरावयास पाहिजे.
हवामान :
खजुराला अतिउष्ण व कोरडी हवा लागते; पाऊस कमी लागतो. आर्द्रतेमुळे तेथील फळांना हवा तसा गोडवा मिळत नाही. जास्त तापमान असणा-या प्रदेशात खजूर चांगला घेता येतो. फूल येण्याच्या सुमारास म्हणजे मार्च ते मे महिन्यांत व फळ पिकण्याच्या म्हणजे ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यांत पाऊस असल्यास फळ धरत नाही किंवा ते कुजू लागते. ज्या वेळी पाने कोवळी नसतात त्या वेळी हवेचे उष्णमान फार खाली म्हणजे २० अंशांपर्यंत उतरले तरी हरकत नसते. खजुरीला उष्णता किती सहन करवते हे अद्याप समजले नाही. परंतु पृथ्वीवरील कोणत्याहि ठिकाणची अत्यंत प्रखर उष्णता व ऊन सहन करण्यास या झाडास कोणतीहि अडचण पडत नाही असे दिसते. झाड लहान असताना देखील त्याला ऊन पाहिजे.
लागवड :
बियांपासून रोपे बनवून लागवड करणे शक्य असले, तरी अशा झाडांपासून फळे मिळण्यास जवळजवळ ८ ते १० वर्षे लागतात. अजून एक समस्या म्हणजे बियापासून तयार केलेल्या रोपांमध्ये ५० टक्के नर रोपे असतात त्यामुळे फळ उत्पादन घटते. नर कमी व मादी झाडे जास्त आवश्यक म्हणून विद्यमान मादी झाडाला येणाऱ्या फुटव्यांपासून व्यावसायिक लागवड करणे फायदेशीर ठरते, त्यासाठी ३ ते ५ वर्षे वयाचे व १८-३४ किलो वजनाचे मुनवे वापरावे. त्यापासून मादी झाडे वाढून उत्पन्न चांगले येते. झाडे लावल्यावर ६-८ वर्षांनी फुलोरे येतात. वाढ चांगली होण्याच्या दृष्टीने काही फुलोरे सुरुवातीस काढून टाकतात; त्यानंतर ते झाड स्थलकालपरत्वे सु. १०० वर्षांपर्यंत फळे देत राहते.
खजूराचे झाड शिंदी आणि नारळाच्या झाडासारखे दिसते. ते मध्यम ते उंच अशा पद्धतीने वाढते, त्यामुळे लागवड करताना दोन झाडे आणि दोन ओळींतील अंतर सुटसुटीत राहील याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी दोन ओळींत ७-१० मीटर आणि दोन झाडांत ४-७ मीटर असे अंतर ठेवावे.
खजूराच्या रोपांची लागवड करण्यासाठी तीन फूट हमचौरस खड्डा घेऊन अर्धा खड्डा, २-३ किलो शेणखताने भरावा. झाड लावतेवेळी शेंड्यावर खत, माती वगैरे कांही पडणार नाही याची काळजी घ्यावी. वाळलेली पाने वर्षातून एकदा काढून काढावीत तसेच खालची पिल्ले दोन वर्षांनी एकदा काढावीत.
पाणी व्यवस्थापन :
खजूर शेतीसाठी पाऊस थोडा पाहिजे असला तरी झाडे तेवढ्या पावसावर टिकाव धरीत नाहीत; त्यांना थोडेसे पाणी द्यावे लागते. झाडे लावल्यावर महिनाभर दररोज, दुसर्या महिन्यांत चार दिवसांनी एकदां व नंतर महिन्यांतून एकदा असे पाणी द्यावे. फुले येण्याच्या वेळी (फेब्रुवारी व मार्च महिन्यात) झाडांना पाणी देत नाहीत; फळे लागल्यापासून ती पिकेपर्यंत नियमित पाणी देतात.
खत व्यवस्थापन :
दोन तीन वर्षांनी एकदा हिवाळ्याच्या सुरुवातीला एकरी ५-७ टन शेणखत टाकावे. मार्च-एप्रिलमध्ये ६०० ग्राम नत्र, १०० ग्राम स्फुरद आणि ७० ग्राम पालाश प्रति झाड याप्रमाणे खतांची मात्रा द्यावी. हवेतील नत्र जमिनीत शोषणाऱ्या वनस्पतींच्या अच्छादानामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यात मदत होते.
काढणी व उत्पादन :
फेब्रुवारी महिन्याचा सुरवातीस फळ तयार होण्यापूर्वी त्याभोवतीचे काटे काढून टाकण्यात येतात जेणेकरून फळ तयार झाल्यावर ते योग्यरीतीने काढता यावे. मे महिन्याच्या आसपास खजूर पिकण्यास सुरवात होते तेव्हापासून ते सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्या पर्यंत प्रत्येक आठवड्याला खजूर काळजीपूर्वक रित्या झाडावरून उतरवून घेतला जातो. जुन च्या महिन्यातला खजूर हा थोडा कडक असतो परंतु हाताने काढता येतो. जुलै मध्ये फळ पूर्णपणे चॉकलेटी रंगाचे आणि नरम होते. ऑगस्ट मध्ये फळ पूर्णपणे पिकते आणि झाड नुसते हलवले तरी खजूर खाली पडतात. खजुराचे फळ पूर्णपणे परिपक्व होण्यासाठी सुरवातीला अत्यंत कडक आणि सलग अशा उन्हाळ्याची आणि पक्वतेच्या काळात दमट हवामानाची गरज असते.
चार भागात खजुराच्या फळाच्या पक्वतेची प्रक्रिया विभागली जाते आणि जी संपूर्ण जगात पारंपारिक अरेबिक नावानेच ओळखली जाते : किमरी (कच्चे फळ), खलाल (पूर्ण आकारातील आणि थोडे कडक असे फळ), रताब (पिकलेले आणि नरम असे फळ), ताम्रर (पिकलेले आणि उन्हात सुकवलेले फळ).
खजुराची झाडे ८-१० वर्षांची झाली कि त्यांना चांगले फळे लागू लागतात. ही झाडे १०० वर्षांपर्यंत चांगले उत्पन्न देतात. प्रत्येक झाडापासून वर्षाला साधारणत: ८-१० चांगले घड मिळून त्यांपासून २०-२५ किलो खजूर मिळतो. शंभर ते दीडशे किलो प्रति झाड उत्पादन मिळते. घडातील सर्व फळे एकदमच पिकतात असे नाही; त्यासाठी बागाईतदार फळे पिकतील तशी तोडून त्यांची वर्गवारी करतो. साधारण प्रतीच्या खजुरामध्ये घड एकदमच उतरवला जाऊन त्यामध्ये काही पक्व व काही अर्धवट पिकलेली फळे असतात. सर्व घड उतरून त्यांतील वाईट फळें काढून टाकून तो सावलीत टांगून ठेवतात. खजुराला प्रति किलो ४० रुपये असा सरासरी भाव गृहीत धरला तर एक झाड चार हजार रुपये उत्पन्न देते.
आंतरपीक :
खजूराची झाडे मोठी होईपर्यंत मुग, उडीद, वाटणा, तीळ, डाळिंब, सीताफळ, शेवगा, पपई, इ. पिके आंतरपिके म्हणून घेतात. खजुराचे उत्पन्न चालू होईपर्यंत अतिरिक्त उत्पादनाचा चांगला स्रोत म्हणून आंतरपिकांकडे पाहता येऊ शकते.
खजूराचे उपयोग :
खजुराच्या झाडापासून खजूर व खारीक यांशिवाय इतर उपयुक्त पदार्थही मिळतात. पंजाबमध्ये ‘ताडी’ काढतात. पानांचा उपयोग छपरासाठी व खजूर फळे बांधण्याच्या बोऱ्या (चटया) बनविण्यास करतात. या झाडांपासून मिळणारा एक प्रकारचा गोंद औषधाकरिता पंजाब वगैरे प्रदेशांत वापरतात. झाडांपासून मिळणाऱ्या काथ्याचा दोऱ्याकरिता व फळे काढून घेतल्यावर उरलेल्या स्थूलकणिशाचा केरसुणी, ब्रश वगैरेंकरिता उपयोग करतात. कोवळ्या महाच्छदापासून ‘तारा’ नावाचे सुगंधी द्रव्य काढतात व ते पाण्यात वगैरे मिसळून अरबस्तानादी देशांतून सरबतासारखे वापरतात. खजुराचे कोंब व पाने भाजीसाठीही उपयोगात आणतात. झाडाचा ताजा रस थंड व सारक असतो. गोंद अतिसारावर व मूत्ररोगावर घेतात. फळे शामक, कफोत्सारक, पौष्टिक, सारक व कामोत्तेजक असून दमा, धातुविकार, श्वसनविकार, ज्वर, बद्धकोष्ठता, स्मरणदोष इत्यादींवर गुणकारी असतात. त्यांत अ, ब आणि ड ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. पिकलेला खजूर खाण्यासाठी वापरतात तसेच ताजा खजूर उन्हात वाळवून किंवा दुधात शिजवून खारीक तयार केली जाते. इतर फळांच्या तुलनेत खजुरात नैसर्गिक साखरेचे तसेच कॅलरीचे प्रमाण जास्त असते. १०० ग्रॅम ताज्या खजुरापासून १४४ ऊष्मांक, तर सुक्या खजुरापासून (खारकेपासून) सु. ३१७ ऊष्मांक मिळतात.
खजुराच्या बियाही फार उपयुक्त असतात. त्या वाळवून पीठ करून किंवा भिजवून नरम करून उंट, बकऱ्या, मेंढ्या व घोडे यांना खाऊ घालतात. त्या कोंबड्यांच्या खाद्यातही वापरतात. भाजलेल्या पुडीची कॉफीत व सुपारीत भेसळ करतात. बियांचे तेल इराकमध्ये साबणाकरिता उपयोगात आहे. बी उगाळून लहान मुलांस बाळघुटीत देतात. कपाळ दुखत असल्यास उगाळून लेप लावतात.
खजुरात लोहाचे प्रमाण भरपूर असते. पांडुरोगात किंवा शरीरात रक्ताची कमतरता आढळल्यास खजूर खायला देतात. त्यामध्ये जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. तसेच त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त तर सोडियमचे प्रमाण कमी असेत. ताज्या खजुरापासून कोशिंबीर, चटणी आणि लोणची बनविली जातात. खजुराचा उपयोग केक आणि पुडिंग बनविण्याकरिता होतो. पाने छपरासाठी आणि चटया बनविण्यासाठी वापरतात. फांद्यांपासून मिळणार्या काथ्याचा वापर दोर तयार करण्यासाठी केला जातो. फुलोर्याचा उपयोग केरसुणी व ब्रशसाठी केला जातो.
Comments
Post a Comment