सुधारित ऍस्टर लागवड
सुधारित ऍस्टर लागवड
Agrojay Innovations Pvt. Ltd.
ऍस्टर हे हंगामी फुलपीक असून त्यामध्ये पांढऱ्या, लाल, गुलाबी, जांभळ्या रंगाची फुले विशेषतः आढळतात. ऍस्टरमधील विविध प्रकार, पाकळ्यांची रचना आणि रंग, तसेच फुलांचा टिकाऊपणा या गुणधर्मामुळे या फुलाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. इतर फुलझाडांच्या तुलनेने ऍस्टरची लागवड सोपी, कमी खर्चाची असते. शिवाय फुलांची उपलब्धता लागवडीपासून थोड्याच दिवसांत होते, त्यामुळे कमी कालावधीत चांगले उत्पन्न या फुलांपासून मिळू शकते. ऍस्टरची लागवड संपूर्ण देशात तसेच राज्यात मोठमोठ्या शहरांच्या भोवती केली जाते. ऍस्टरची ‘लूज फ्लॉवर (फुलदांड्याविरहीत)’ तसेच ‘कट फ्लॉवर (फुलदांड्यासहीत)’ म्हणून उपयोग केला जातो. विविध फुलदाणीत सजावटीसाठी, हारांमध्ये, धार्मिक कार्यक्रमांमध्ये ही फुले वापरली जातात. बगीच्याम्ध्ये रस्त्यालगत तसेच कुंड्यांमध्ये ऍस्टरची लागवड केली जाते.
लागवडीचे नियोजन करताना लागवडीचा हंगाम, मोजक्या जातींची निवड, लागवडीचे क्षेत्र, पाण्याची उपलब्धता या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा. उपलब्ध जमीन आणि पाणीपुरवठा याच बरोबर किती काळ बाजारपेठेत पुरवठा करण्यात येईल या बाबींवर भर द्यावा. लागवड करताना सगळे क्षेत्र एकाच वेळी न लावता तीन ते चार टप्प्यात लावावे, म्हणजे फुले अधिक काळ बाजारात पाठविता येतील.
हवामान :
महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांत हे समशीतोष्ण फुलपीक घेतले जाते. थंड हवामानात ऍस्टरची वाढ चांगली होते व फुलांचा दर्जादेखील चांगला असतो. मात्र पीक फुलावर असताना कडक थंडी सहन होत नाही, तसेच कडक ऊनही मानवत नाही. तथापि या पिकास भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. साधारणपणे १० ते ३५ अंश सेल्सियस तापमान पिक वाढीसाठी उत्तम असते. उच्च प्रतीच्या फूल उत्पादनासाठी बियाण्यांची रोपांसाठी पेरणी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात करावी. खानदेश, विदर्भातील उन्हाळ्याचा काळ आणि कोकणपट्टीत पावसाळ्याचा काळ वगळला तर राज्यात वर्षभर लागवड करता येते.
जमीन :
ऍस्टरची लागवड निरनिराळ्या जमिनीमध्ये करतात. पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी, पोयट्याची जमीन या पिकास चांगली मानवते. काळ्या कसदार भारी व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत रोपांची मर मोठ्या प्रमाणात होते. तसेच वरकस, हलक्या, चुनखडीयुक्त जमिनीत ऍस्टरची लागवड करू नये.
प्रकार व जाती :
ऍस्टरमध्ये फुलांच्या आकारावरून, पाकळ्यांच्या रचनेवरून, दांड्याच्या लांबीनुसार आणि कालावधीनुसार अनेक प्रकार आणि जाती आढळतात.
रामकाठी प्रकार : या प्रकारात गुलाबी, पांढरा व जांभळा अशा रंगांची फुले येणाऱ्या जाती आहेत. यात फांद्यांची संख्या कमी असते. झाडे फारशी न पसरता उंच (७० ते ९० सें.मी.) वाढतात.
गरवा प्रकार : यात विविध रंगांची फुले येणाऱ्या जाती आहेत. पिकांची वाढ मध्यम उंच (४० ते ६० सें.मी.) आणि पसरट होते. पीक तयार होऊन हंगाम संपण्यास १५० दिवसांचा कालावधी लागतो.
निमगरवा प्रकार : या प्रकारातील जातींची वाढ मध्यम उंच (४० ते ६० सें.मी.) होते. फुलांचा हंगाम १०० ते १२० दिवसांत संपतो.
पावडर पफ : भरगच्च फुले निळ्या रंगाची आणि मोठ्या आकाराची असतात.
आट्रीम फ्लम : आकर्षक निळ्या रंगाची आणि मोठ्या आकाराची फुले असतात.
महाराष्ट्रातील वातावरणाचा विचार करून प्रादेशिक फळसंशोधन केंद्र, गणेशखिंड यांनी विकसित केलेल्या जाती :
१) फुले गणेश व्हाइट : ही जात लांब दांड्याची फुले मिळण्यासाठी उपयुक्त असून, फुले शुभ्र पांढऱ्या रंगाची असतात. हंगाम चार ते पाच महिन्यांचा असतो. फुलांचे चांगले उत्पादन मिळते. फुलदाणीमध्ये जास्त काळ फुले टिकतात. ही जात लांब दांड्याची फुले मिळण्यासाठी उपयुक्त असून, फुले शुभ्र पांढऱ्या रंगाची असतात. हंगाम चार ते पाच महिन्यांचा असतो.
२) फुले गणेश पिंक : फुलावर लवकर येणारी जात असून, निमपसरी, आकर्षक गुलाबी रंगाची फुले मिळतात. हंगाम चार ते पाच महिने असतो. फुलावर लवकर येणारी जात असून, निमपसरी, आकर्षक गुलाबी रंगाची फुले मिळतात. हंगाम चार ते पाच महिने असतो.
३) फुले गणेश व्हायलेट : ही जात निमपसरी, फुलावर लवकर येणारी आणि गडद जांभळ्या रंगाची फुले मिळतात. हंगाम चार ते पाच महिने असतो. ही जात निमपसरी, फुलावर लवकर येणारी आणि गडद जांभळ्या रंगाची फुले मिळतात. हंगाम चार ते पाच महिने असतो.
४) गणेश पर्पल : फुले फिक्कट जांभळ्या रंगाची असतात. फुलांचे चांगले उत्पादन मिळते. फुले फिक्कट जांभळ्या रंगाची असतात. फुलांचे चांगले उत्पादन मिळते.
तसेच भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था, बेंगलोर यांनी विकसित केलेल्या जाती: १) कामिनी, २) पौर्णिमा, ३) शशांक, ४) व्हायलेट कुशन, इ.
परदेशी जाती : १) ड्वार्फ क्विन, २) पिनॅचिओ, ३) अमेरिकन ब्युटी, ४) स्टार डस्ट, ५) जायंट ऑफ कॅलिफोर्निया, ६) सुपर प्रिन्सेस, इ.
लागवडीपूर्व तयारी :
लागवडीपूर्वी जमिनीची २ वेळा खोल नांगरट करावी व २ ते ३ वेळा वखरणी करावी. धसकटे व हरळीच्या काशा वेचून घेऊन जमीन स्वच्छ करावी. माती परीक्षण करून एकरी ८ ते १२ टन शेणखत चांगले जमिनीत मिसळून घ्यावे. शेणखताबरोबरच प्रति एकरी २० किलो नत्र, २० किलो स्फुरद व २० किलो पालाश जमिनीत चांगले मिसळून घ्यावे व नंतर ६० सें.मी., ४५ सें.मी. किंवा ३० सें.मी. अंतरावर सरी वरंबे तयार करावेत. त्यानंतर सऱ्यांची नाके तोडून पाणी पुरवठ्याच्या सोयीनुसार वाफे करून घ्यावेत.
लागवड :
जून–जुलै किंवा ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीमध्ये ऍस्टरची लागवड करावी. महाराष्ट्रात जमिनी चांगल्या मध्यम-भारी असल्यामुळे सरी वरंबा पद्धतीने लागवड करावी. ऍस्टरची लागवड ६० बाय ३० सें.मी. किंवा ४५ बाय ४५ सें.मी. किंवा ४५ बाय ३० सें.मी. किंवा ३० बाय २० सें.मी. अंतरावर करतात. सरी वरंबा पद्धतीने लागवड करताना वरंब्याच्या मध्यभागी लागवड करावी. रोपांची लागवड सायंकाळी ४ वाजेनंतर व भरपूर पाण्यात करावी. तसेच लागवडीपूर्वी रोपांची मुळे शिफारशीत बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून घ्यावीत, जेणेकरून रोपांची मर होणार नाही.
ऍस्टर या पिकाची बियाण्याद्वारे किंवा रोप पुनर्लागवडीद्वारे करण्यात येते. बियाण्याची पेरणी केल्यानंतर ७ ते ८ दिवसांत बियाण्याची उगवण सुरु होते. बियाणाच्या उत्कृष्ट उगवणीसाठी सुमारे २० ते ३० अंश से. इतक्या तापमानाची आवश्यकता असते. ऍस्टरच्या बियाण्यास विश्रांती कालावधी नसल्याने बियाणे फुलातून काढल्यानंतर ताबडतोब पेरले तरी उगवते.
रोपनिर्मिती :
ऍस्टरची रोपे गादीवाफ्यावर किंवा कोकोपीट मध्ये तयार करून घ्यावी. रोपे तयार करताना पाण्याचा निचरा होणाऱ्या जागीच गादी वाफ्यांवर रोपे तयार करा व सुदृढ रोपेच लागवडीसाठी निवडा. रोपवाटिका तयार करण्यापूर्वी ३ बाय ९ मीटर या आकारमानाचे व २० सें.मी. उंचीचे गादीवाफे करावेत. एक एकर क्षेत्रास सुमारे १ ते १.५ किलो बियाणे पुरेसे होते. प्रत्येक वाफ्यात ६० ते ७० ग्रॅम १९:१९:१९ रासायनिक खते व ८-१० किलो चांगले कुजलेले; चाळलेले शेणखत चांगले मिसळून घ्यावे. या खतांबरोबरच प्रत्येक वाफ्यात ५ ग्रॅम प्रति चौरस मीटर या प्रमाणात फोरेट मिसळून घ्यावे. वरील सर्व खते व औषधे मिसळून वाफे भुसभुशीत करावेत व त्यांना व्यवस्थित आकार दयावा. १० सें.मी. अंतरावर दक्षिण-उत्तर ओळी, खुरप्याच्या सहाय्याने ०.५ से.मी. खोल करून घ्याव्यात व त्यामध्ये बियाणे पेरावे. बियाणे पेरताना दोन बियाण्यातील अंतर २.५ से.मी. राहील याची काळजी घ्यावी. पेरलेले बियाणे वस्त्रगाळ पोयटा माती, शेणखत व वाळू यांच्या २:१:१ या प्रमाणात मिश्रण करून या मिश्रणाने झाकावे. त्यावर रोज सकाळी व सायंकाळी झारीने अथवा शॉवरगनच्या सहाय्याने पाण्याचा हलका फवारा मारावा. बियाणे उगवून येईपर्यंत गादीवाफे, गवत, पालापाचोळा अथवा पोत्याच्या तडप्याने झाकून ठेवावे. वाफे नेहमी ओलसर म्हणजे वापसा अवस्थेत ठेवावेत. वापसा अवस्थेपेक्षा जास्त पाणी देऊ नयेत किंवा पाणी कमी देखील पडू देऊ नये. रोपे साधारणपणे २१ ते २५ दिवसात तयार होतात. तयार झालेली रोपे वाफे वापसा अवस्थेत असतानाच काढावीत. रोपे उपटताना मुळे तुटू देऊ नये.
आंतरमशागत :
लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली खुरपणी करावी. त्यावेळी एकरी ३५ किलो नत्राचा दुसरा हप्ता दयावा. खुरपणी बरोबरच ऍस्टर लागवड केलेल्या क्षेत्राची रानबांधणी देखील करावी. रानबांधणी करताना सुरुवातीला नत्र खत सरीमध्ये टाकावे व वरंबा अर्धा फोडून दुसऱ्या वरंब्यास रोपांच्या पोटाशी लावावा म्हणजे खत देखील मातीमध्ये बुजविले जाईल व झाडाला देखील मातीची भर मिळेल. रानबांधणी करताना रोप वरंब्याच्या मध्यावर येईल असे पाहावे. म्हणजे खोडाला मातीचा आधार मिळून फुले लागल्यानंतर झाड पडणार नाही. तसेच गरजेनुसार खुरपणी करावी. त्यामुळे रोपांच्या वाढीला तणांचा त्रास होत नाही.
अन्नद्रव्ये व्यवस्थापन :
ऍस्टर या पिकाचे चांगले उत्पादन मिळण्याकरिता शेणखत भरपूर घालणे जरुरीचे आहे. त्याचप्रमाणे ऍस्टर झाडांची योग्य वाढ होऊन फुले दर्जेदार मिळण्यासाठी इतर रासायनिक खते देखील वेळोवेळी घालणे आवश्यक असते. लागवडीसाठी जमीन तयार करतना व लागवडीनंतर २ ते ३ आठवड्यांनी रानबांधणी करताना माती परिक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी. तसेच लागवडीनंतर दहा दिवसांनी २ किलो ऍझोटोबॅक्टर किंवा ऍझोस्पिरीलम २० किलो ओलसर शेणखतात मिसळावे. या मिश्रणाचा ढीग करून तो प्लॅस्टिकच्या कागदाने आठवडाभर झाकून ठेवावा. अशाच प्रकारे ४ किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक आणि २ किलो ट्रायकोडर्मा प्रत्येकी २० किलो शेणखतात मिसळून वेगवेगळे ढीग करून आठवडाभर झाकून ठेवावेत. एक आठवड्यानंतर तिन्ही ढीग एकत्र मिसळून एक एकर क्षेत्रातील पिकाला द्यावे.
पाणी व्यवस्थापन :
ऍस्टर पिकास करावयाचा पाणीपुरवठा मुख्यत्वे जमिनीचा प्रकार, वातावरण व हंगाम यावर अवलंबून असतो. ऍस्टर पिकाच्या मुळ्या जास्त नसल्यामुळे लागवड केलेले वरंबे नेहमी वापसा अवस्थेत राहतील याची काळजी घेणे जरुरी आहे. साधारणपणे ऍस्टर पिकास ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी दयावे. ऍस्टर पिकास कळ्या येऊ लागल्यानंतर फुले येईपर्यंत पाण्याच्या ताण देऊ नये. अन्यथा फुलांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
फवारणी करताना प्रत्येक फवारणीमध्ये ५ मी.ली. प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात स्टिकर्स मिसळावे व वारा शांत असताना शक्यतो सकाळी १०.०० पूर्वी किंवा सायंकाळी ४.०० नंतर फवारणी करावी.
काढणी व उत्पन्न :
साधारणपणे जातीनुसार ३ ते ४ महिन्यांत फुले येतात. एकरी सुमारे २० लाख म्हणजेच ५ ते ६ टन फुले मिळतात. फुलांची तोडणी २ ते ३ दिवसांच्या अंतराने करावी. ऍस्टरच्या फुलाची तोडणी दोन प्रकारे केली जाते. एक प्रकार म्हणजे पूजेसाठी किंवा सजावटीसाठी पूर्ण उमललेली फुले तोडली जातात व दुसरा प्रकार म्हणजे काही प्रमाणात फुले उमलल्यानंतर १० ते २० सें.मी. लांब फुलदांडा राहील याप्रकारे ती छाटतात. फक्त फुलांची तोडणी करावयाची झाल्यास सकाळी लवकर तोडणी करावी व फुलदांडयासहीत वापरायचे असल्यास सायंकाळी छाटणी करून लगेच फुले स्वच्छ पाण्यामध्ये ठेवावीत.
Comments
Post a Comment