कागदी लिंब व्यवस्थापन

कागदी लिंब व्यवस्थापन

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download  Agrojay  Mobile Application:  http://bit.ly/Agrojay )


मूलस्थान भारत असणारे कागदी लिंबू (लॅ. सिट्रस ऑरॅन्टिफोलिया; कुल-रुटेसी) हे पुष्कळ फांद्या असलेले काटेरी झुडुप अथवा ठेंगणे झाड आहे. पाने लहान व अरुंद पंख असलेल्या देठाची, फुले लहान, पांढरी व गुच्छात येतात. फळे लहान, गोल अथवा अंडाकृती २.५ ते ४ सेंमी. असतात. फळाची साल पातळ व चकचकीत, गराला घट्टपणे चिकटलेली, हिरवी अथवा पिकल्यानंतर पिवळसर रंगाची; गर पिवळट हिरवा, आंबट व स्वादयुक्त असतो.

हे फळ उष्ण कटिबंधातील बहुतेक प्रदेशांत वाढते. मेक्सिको, वेस्ट इंडीज, इजिप्त व भारत हे कागदी लिंबाच्या उत्पादनात अग्रेसर देश आहेत. भारतात या फळाची लागवड सुमारे २९,००० हेक्टर क्षेत्रात होते आणि ती मुख्यत्वेकरून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तमिळनाडू या राज्यांत आहे. कर्नाटक व गुजरातमध्ये थोडेफार क्षेत्र आहे.

कागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, जास्त चुनखडी व क्षार नसणारी जमीन निवडावी. साधारणपणे ६.५ ते ७.५ सामू व क्षारांचे प्रमाण ०.१ टक्‍क्‍यापेक्षा कमी असलेली जमीन कागदी लिंबू लागवडीस चांगली असते. हे बागायती बहुवर्षीय फळझाड असल्यामुळे हमखास पाणीपुरवठ्याची सोय असेल तेथेच लागवड करावी. लागवड ६ बाय ६ मीटर अंतरावर करावी. लागवडीसाठी १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे उन्हाळ्यात खोदून उन्हात चांगले तापू द्यावेत. पावसाळ्यापूर्वी प्रत्येक खड्ड्यात दिड किलो सिंगल सुपर फॉस्फेट, पाच ते सहा घमेली चांगले कुजलेले शेणखत, निंबोळी पेंड व चांगल्या पोयटा मातीने खड्डे भरावेत. त्यानंतर जातिवंत रोपांची लागवड करून योग्य व्यवस्थापन करावे. लागवडीसाठी विक्रम, प्रमालिनी, साई सरबती, फुले शरबती या जातींची निवड करावी. 

कागदी लिंबाच्या झाडांची लागवड सुरवातीच्या चार-पाच वर्षांपर्यंत फळे येण्यापूर्वी लिंबाच्या दोन झाडांमधील मोकळ्या जागेत सुरवातीला कांदा, लसूण, मूग, चवळी, हरभरा, घेवडा, भुईमूग, गहू, मोहरी यांसारखी आंतरपिके घ्यावीत. आंतरपिके घेताना मुख्य पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होणार नाही आणि बागेची सुपीकता कायम राहील याची काळजी घ्यावी. मुख्य पिकाव्यतिरिक्त आंतरपिकास शिफारशीप्रमाणे खताची वेगळी मात्रा द्यावी.

लिंबू फळपिकातील बहार :

बहर धरणे म्हणजे झाडांना पाण्याचा ताण देऊन विश्रांती देणे. कागदी लिंबाच्या झाडाला लागवड केल्यानंतर ४ ते ५ वर्षांनंतर फुले व फळे धरण्यास सुरूवात होते. लिंबू पिकाला बारमाही ओलित लागत असल्याने झाडाला जवळजवळ वर्षभर फुले फळे येतात; परंतु फुले येण्याचे जून, ऑक्टोबर व फेब्रुवारी हे तीन प्रमुख हंगाम (बहार) आहेत. या फुलांचे प्रमाण अनुक्रमे ३६, १५ व ४९ टक्के एवढे असते. त्यांची फळे अनुक्रमे नोव्हेंबर, एप्रिल व जून-जूलैत तयार होतात. लिंबूत विशिष्ट बहर धरणे शक्‍य असले तरी आर्थिकदृष्ट्या ते फायदेशीर ठरत नाही. कारण, एखाद्या विशिष्ट बहरासाठी ताण दिला, तर त्या वेळी अगोदरच्या बहराची फळे अपक्व स्थितीतच गळून पडतात. उदा. मृग बहर घेतल्यास झाडावर आंबे बहराची फळे दोन ते अडीच महिन्यांची असतात. आंबे बहर घेतल्यास झाडावर हस्त बहराची फळे वाटाण्याएवढी असतात, ती पाण्याच्या ताणामुळे गळून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे ताण देण्याच्या पद्धतीचा वापर करून एखादा विशिष्ट बहर धरणे लिंबूस शक्‍य होत नाही. 


लिंबू पिकातील हस्त बहाराची फुले ऑक्टोबरमध्ये येतात व फळे ऐन उन्हाळ्यात (एप्रिल-मे मध्ये) मिळतात. या महिन्यात बाजारात फळांना भरपूर मागणी असल्यामुळे चांगला भाव येतो. बहार न धरल्यास कागदी लिंबाची झाडे वर्षभर फळे देऊ शकतात; परंतु त्यामुळे झाडाची शक्ती वाया जाते. फळ बरोबर पोसले जात नाही. परिणामी झाडावर एकाच वेळी फुले आणि लहान व मोठी फळे दिसून येतात. यामुळे फळांची राखण, रोग व किडींचा बंदोबस्त, फळांची काढणी व विक्री यांवर अधिक पैसा खर्च होतो. यासाठी सोईस्कर असा एकच बहार धरणे फायद्याचे ठरते. जेथे पाऊसमान कमी आहे व जमीन हलकी आहे अशा भागात ऑक्टोबर बहार घेणे फायद्याचे ठरते.

हस्त बहार व्यवस्थापन :

हस्त बहर धरण्यासाठी कागदी लिंबू झाडांना ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाण्याचा ताण द्यावा लागतो; परंतु या वेळी जर पाऊस असेल तर बागेला ताण बसत नाही, तसेच हवामान प्रतिकूल असल्यास फुलोऱ्याचे प्रमाण कमी मिळते. सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये फुलोऱ्याचे प्रमाण फक्त १० ते १५ टक्के असते. 

फुलोऱ्याचे प्रमाण वाढविण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये सायकोसिल या संजीवकाचे १००० पीपीएम तीव्रतेच्या दोन फवारण्या एक महिन्याच्या अंतराने देऊन हस्त बहर घ्यावा. सायकोसिलसारख्या वाढविरोधक संजीवकामुळे फाजील शेंडावाढ मंदावते व रोगप्रतिकारकशक्ती सुधारते.



(Download  Agrojay  Mobile Application:  http://bit.ly/Agrojay )


Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology