पपईच्या जाती व रोपनिर्मितीचे तंत्रज्ञान
पपईच्या जाती व रोपनिर्मितीचे तंत्रज्ञान
Agrojay Innovations Pvt. Ltd.
पपईचे मूलस्थान मेक्सिको असून हल्ली त्याचा प्रसार उष्ण कटिबंधातील देशांत व समशिपोष्ण कटिबंधातील उष्ण प्रदेशात सर्वत्र झालेला आढळतो. पपई हे सतत हिरवे रहाणारे फळझाड आहे. भारतात ते सोळाव्या शतकात आणले गेले. हल्ली त्याची लागवड हवाई बेटे, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, ऑस्ट्रेलीया, फिलिपीन्स बेटे आणि भारत या प्रदेशांत होते. भारताच्या कोरड्या तसेच पावसाळी हवामानाच्या व समुद्रसपाटीपासून १३०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात पपई वाढू शकते.
भारतात पपईची लागवड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम , बिहार व पश्चिम बंगाल ई. राज्यात मोठ्या प्रमाणत उत्पादन होते. महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, जालना, नासिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात पपई घेतली जाते.
कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पन्न पपई या पिकातून मिळते. फळपिकांमध्ये केळी पिकानंतर सर्वात जास्त उत्पादन देणारे पिक म्हणून पपईकडे पहिले जाते.
जाती :
पपई सिलेक्शन क्र. १,२,३ व ५, , पुसा ड्वार्फ, पुसा नर्हा, पुसा जायंट, को-७, पुसा डेलीशीस, सनराइस सोलो, वॉशिग्टन, को-१,२, कुर्ग हनीड्यू (मधूबिंदू), पुसा डेलीशियस, सोलो, तैवान ७८६, रेडलेडी, रांची व गुजरात स्थानिक या जाती आहेत. तसेच सिलोन, सिंगापूर, बंगलोर हे प्रकारही भारतात लागवडीत आहेत. पेपेनसाठी कोईमतूर १ ते ६ व पुसा मेजेस्टी या जातीची शिफारस करण्यात आली आहे.
१) वॉशिंग्टन -
या जातीची लागवड सर्वत्र होत असली तरी भारताच्या पश्चिम विभागमध्ये ही जात अतिशय लोकप्रिय आहे. या प्रकारातील पानांच्या दांड्यांचा रंग जांभळा असतो व खोडावर जांभळ्या रंगाची पेरे असतात. फुले गडद पिवळी असतात. फळ आकाराने लांबट असून त्याच्या देठाकडील बाजूला जांभळी कडा असते. कच्च्या फळाची साल गर्द हिरव्या रंगाची असते. पिकलेल्या फळाची साल तकतकीत पिवळ्या रंगाची असते. फळाचे वजन सामान्यपणे एक-दोन किलो असते. फळात बिया थोड्याच असतात. इतर प्रकारांच्या फळांच्या मानाने वॉशिंग्टन प्रकारचे फळ जास्त टिकते. फळाचा गर नारंगी रंगाचा आणि गोड असून त्याला चांगला स्वाद असतो. पपईस वास सौम्य असला तरी स्वाद आवडणारा असतो. या जातीमध्ये नर झाडे आणि मादी झाडे वेगवेगळी असतात. बियांपासून तयार होणाऱ्या झाडांमध्ये नरझाडांचे प्रमाण पुष्कळ असते. फळे झाडावर उंचावर धरतात. घरगुती बगीच्यासाठी आणि व्यापारी प्रमाणावर लागवडीसाठी हा प्रकार एकंदरीने चांगला आहे.
२) कूर्ग हनीड्यू (मधुबिंदू) –
ही जात कूर्गमधील चेथाली येथील संत्रा संशोधन केंद्रामध्ये हनीड्यू या जातीच्या झाडापासून कूर्ग हनीड्यू जातीची निवड केली आहे. हनीड्यू जातीच्या एकाच झाडावर मादीफुले व द्विलिंगी फुले असतात. त्यामुळे वेगळ्या नर फुलांची गरज नसते. शुद्ध नर झाडे नसतात. झाडे मध्यम ठेंगणी असतात. झाडावर फळे खालीपासून लागलेली असतात. फळे लांबोळी असून फळात बियांचे प्रमाण कमी असते. गर जाड, मऊ, नारिंगी, मध्यम रसदार आणि उत्तम स्वादाचा असतो. उत्पादन भरपूर मिळते. ही जात गुजरात आणि उत्तर भारतात लोकप्रिय आहे.
३) रांची –
ही बिहारची जात असून दक्षिण भारतात लोकप्रिय आहे. फळे जमिनीपासून थोड्या उंचीवर लागतात आणि ती अंडाकृती व मध्यम आकारमानाची असतात. गर तकतकीत पिवळा, गोड व अप्रिय वासरहित असतो. बियापासूनची झाडे सतत वाढतच असतात. बियांपासून तयार केलेल्या झाडांत पुष्कळ प्रमाणात एक सारखेपणा असतो.
४) कोईमतुर १ –
तामिळनाडू कृषी विद्यापीठाने संशोधीत केलेल्या रांची या जातीमधून निवड पद्धतीने विकसित केलेली ही जात आहे. झाडे ठेंगणी, एकसारखी असतात. जमिनीपासून ४ ते ५ फुट उंचीपासून झाडाला फळे लागतात. फळे मध्यम आकाराची लंबवर्तुळाकार, गोल असतात. फळावरील साल सोनेरी पिवळ्या रंगाची असते. गर नारिंगी रंगाचा गोड असतो. या जातीमध्ये नर आणि मादी फुलांची झाडे वेगवेगळी असतात. कोईमतुर-१ ही जात उत्पन्नाला फार चांगली आहे. एक ते सात किग्रॅ. पर्यंत वजनाची एका झाडाला १०० ते ७०० पर्यंत फळे लागल्याची नोंद आहे.
५) कोईमतुर २ –
तामिळनाडू कृषी विद्यापीठाने १९७३ मध्ये स्थानिक जातीमधून निवड पद्धतीने निवडलेली ही जात आहे. झाडाचे खोड जाड असून उंची मध्यम असते. फळे मोठी, लांबोळी व साल पिवळसर हिरवी असते. गर नारिंगी, मध्यम व रसदार असतो. या जातीची फळे खाण्यासाठी आणि पेपेन काढण्यासाठी उत्तम असतात. एका फळापासून ४ ते ६ ग्रॅम पेपेन मिळते. एकरी १०० ते १२० किलो पेपेन मिळते.
६) कोईमतुर ३ –
ही जात तामिळनाडू कृषी विद्यापीठाने कोईमतुर-२ आणि सनराईज सोलो या दोन जातींच्या संकरापासून तयार केली. या जातीच्या पपईचे झाड जोमाने वाढते. पानाचा देठ सर्वसाधारण दीड फुटाचा, आखूड असतो. झाडाला खोडापासून ४ फुटावरून फळे लागतात. लागवडीपासून ९ ते १० महिन्यात फळे काढणीस येतात. कोईमतुर-२ आणि सनराईज सोलो या दोन्ही जातीपेक्षा फळांची प्रत उत्कृष्ट असते. फळे मध्यम आकाराची गोड व टिकाऊ असतात. गर लाल रंगाचा असून गरामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. या जातीमध्ये एकाच झाडावर द्विलींगी व मादी फुले असल्याने बागेमध्ये परागीकरणासाठी वेगळी नर झाडे राखाण्याची गरज नसते. दोन वर्षामध्ये एका झाडापासून १०० ते कोईमतुर १२० फळे मिळतात.
७) कोईमतुर ४ –
ही जात कोईमतुर-१ आणि वॉशिंग्टन या जातींच्या संकरापासून तयार केली आहे. या जातीची झाडे ८ फुटापासून १२ फुटापर्यंत वाढतात. पानांचा देठ लांब ३ ते ४ फुट जांभळ्या रंगाचा असतो. झाडाचे खोड बुंध्याकडे तपकिरी व शेंड्याकडे जांभळ्या छटेचे असते. नर आणि मादी फुलांची झाडे वेगवेगळी असतात. जमिनीपासून अडीच फूट उंचीवरून फळे लागतात. ४ ते ५ महिन्यात फुले लागून ९ ते १० महिन्यात फळे काढणीस सुरुवात होते. फळातील गर पिवळ्या रंगाचा, जांभळी छटा असलेला जाड असतो. एका झाडापासून दोन वर्षामध्ये ८० ते १०० फळे मिळतात.
८) कोईमतुर ६ –
कोईमतूरच्या तामिळनाडू कृषी विद्यापीठाने बिहारमधील पुसा मॅजेस्ट्री या जातीमधून शुद्ध ओळ पद्धतीने विकसीत केली असून या जातीच्या फळांचा उपयोग पेपेन व खाण्यासाठी होतो. झाडे ठेंगणी असून फुले लवकर येत असल्याने को -२ पेक्षा १ महिना लवकर फळे येतात. कोईमतुर-२ फळांपेक्षा या जातीच्या फळांपासून ४ ते ५ ग्रॅम पेपेन अधिक मिळते. लागवडीपासूनच्या २ वर्षात एका झाडापासून ८० ते ९० फळे मिळतात. एकरी २०० ते २१० टन उत्पादन मिळून ३२० ते ३६० किलो पेपेन मिळते.
९) पुसा डेलिशियस (पुसा १-१५) –
या जातीच्या एकाच झाडावर दोन्ही (नर आणि मादी) प्रकारची फुले असतात. झाडे जास्तीत जास्त ७ ते ७.५ फुट उंचीची असून लागवडीपासून ८ महिन्यात फळे लागतात. जमिनीपासून अडीच ते पावणेतीन फुटावरून फळे लागतात. फळांची प्रत उत्कृष्ट असल्याने बाजारभाव चांगले मिळतात. फळाचा गर नारिंगी असून चव व स्वाद उत्तम आहे. फळे मध्यम ते मोठ्या आकाराची, गोलाकार लांबोळी असतात. फळे १ ते २ किलो वजनाची असून गर ४ सेमी जाडीचा असतो.
१० ) पुसा मॅजेस्टी (पुसा २२-३) –
या जातीमध्ये नर आणि मादी होन्ही फुले एकाच झाडावर असतात. झाडांची उंची ६ ते ६.५ फुट असून रोपे लावल्यापासून ५ महिन्यात जमिनीपासून दीड फुटावरून फळधारणेस सुरवात होते.फळे मध्यम, गोलाकार, गर घट्ट पिवळसर, ३.५ सेमी जाडीचा असून फळे १ किलोपासून ३ किलोपर्यंत असतात. टिकाऊपणा अधिक असल्याने साठवणुकीत फळे खराब होण्याचे प्रमाण फार कमी असते.
११) पुसा जायंट (पुसा १-४५ व्ही) –
या जातीमध्ये नर व मादी फुलांची झाडे वेगवेगळी असतात. झाडे ७ ते ७.५ फुट उंच असतात. रोपांची लागवड केल्यापासून ८.५ महिन्यानंतर जमिनीपासून ३ फुटावरून फळे लागतात. खोड मजबूत असते. वारा व वादळ झाडे सहन करू शकतात. फळे आकर्षक, मोठी सव्वा ते ३ किलो वजनाची असतात. या फळांचा उपयोग भाजी व फॅनिंगसाठी केला जातो. फळाचा गर नारिंगी रंगाचा ५ सेमी जाडीचा असतो.
१२) पुसा ड्वार्फ (पुसा १-४५ डी) –
या जातीची झाडे ६ ते ६.५ फुट उंच असून नर व मादी फुलांची झाडे वेगवेगळी असतात. आठ महिन्यानंतर झाडावर जमिनीपासून दीड फुटावरून फळे लागतात. फळे मध्यम, लंबवर्तुळाकर असतात. फळातील गर लाल, नारिंगी रंगाचा ३.५ सेमी जाडीचा असतो. फळे ५०० ग्रॅम ते १ किलो वजनाची असतात.
वरील चारही पुसा जाती भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या पुसा (बिहार) येथील प्रादेशिक संशोधन केंदामध्ये तयार केलेल्या आहेत.
१३) गुजरात स्थानिक –
या जातीची झाडे मध्यम उंचीची असतात व त्यांना मोठ्या प्रमाणात फळे लागतात. पानाचा दांडा हिरवा किंवा पिवळसर हिरवा असून पाने व खोड त्याच रंगाची असतात. फुले पांढरी आणि फळे वॉशिंग्टन प्रकारापेक्षा मोठी असतात. फळातील गल मध्यम गोड असतो; परंतु चव किंचित कडवट असते व त्याला थोडासा अप्रिय वास असतो.
१४) डिस्को –
१९९० ते १९९५ च्या काळात या जातीने पपई क्षेत्रात क्रांतीची सुरुवात झाली होती. या जातीची पपई दिसण्यास कुरूप, लहान असून वजन ३०० ते ३५० ग्रॅम व फळाची साल हिरवट रंगाची असते. तरीही या पपईला बाजारात खूप मागणी होती. कारण या जातीची फळे दिसण्यास आकर्षक नसली, तरी आतमध्ये बी फारच कमी, तोंडाजवळ फक्त २ ते ४ बिया असतात. फळाचा गर गर्द केशरी रंगाचा, स्वादयुक्त, मधुर असा असल्यामुळे सुखवस्तु लोकांच्या पसंतीत उतरलेली अशी जात होती.
१५) तैवान ७८६ –
डिस्को पपईच्या आगमनापासून पपईच्या लागवडीमध्ये क्रांती होऊन पपईची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू झाली व नंतर तैवान जातींच्या पपईचे बी भारतात आयात होऊ लागले. भारतात आयात होणाऱ्या या पपईच्या लागवडीतील मुख्य अडचण म्हणजे या पपईच्या बियाणाची उगवण क्षमता फार कमी असते आणि बी खूप महाग असते.
रोपनिर्मिती :
रोपे घेणे महाग पडते तेव्हा शक्य असल्यास स्वतःच रोपनिर्मिती करून खर्च थोडा कमी करावा. पपईच्या रोपांच्या निर्मितीसाठी थंडीच्या काळात बियाण्याची लागवड रोपांसाठी करत असल्यास पॉलिहाऊसचा वापर गरजेचा आहे. अन्यथा, १५ जानेवारीनंतर थंडी कमी झाल्यावर पपईच्या बियाण्याची रोपांसाठी लागवड करावी. चांगल्या जातिवंत पुष्कळ फळे देणाऱ्या झाडाच्या पूर्ण पिकलेल्या फळांचे बी घेऊन ते धुवून स्वच्छ करून व सावलीत वाळवून साठवून ठेवतात. रोपे करण्याकरिता ताजे बी नेहमी चांगले असते. पपई रोपनिर्मितीसाठी दोन पद्धतींचा वापर केला जातो. रोप लागवडीच्या वेळेच्या आधी सुमारे दीड ते दोन महिने रोपांसाठी बी पेरतात किंवा लावतात.
१) गादी वाफ्यावर रोपनिर्मिती :
बी सामान्यतः गादी वाफ्यांत लावतात. उंच गादीवाफे सहा फुटांच्या अंतरावर पूर्व-पश्चिम दिशेने तयार करावेत. हिवाळ्यात आठ फुटांच्या अंतरामुळे बागेत हवेशीरपणा राहतो, तसेच दुसऱ्या बाजूच्या सहा फुटांच्या अंतरामुळे उन्हाळ्यातील प्रखर सूर्यकिरणांपासून फळांचे काही प्रमाणात संरक्षण होते.
रोपे ९ - १२ सेंमी. उंचीची झाल्यावर ती वाफ्यांतून काढून तयार केलेल्या जमिनीत कायम जागी लावतात. लागवडी अगोदर बियाण्यास सर्वांत प्रथम ८ तास जिबेर्लिक आम्ल-३ च्या (१०० पी.पी.एम.साठी १ लिटर पाण्यात १०० मि.लि. जिबेर्लिक आम्ल-३ मिसळावे) द्रावणात भिजवून घ्यावे. आठ तासांनंतर बियाणे द्रावणातून काढून पांढऱ्या कपड्यात १५ मिनिटे घट्ट बांधून ठेवावे. यानंतर सावलीत बियाणे कागदावर वाळवावे. बियाणे पूर्णपणे वाळल्यानंतर प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी. दोन खड्ड्यांमध्ये २-३ मी. हमचौरस अंतर ठेवून रोपे लावतात. रोपाच्या अवस्थेत नर आणि मादी असा भेद ओळखता येत नाही. त्यामुळे लावलेल्या रोपांमधून ४०-६० टेक्केच मादीची झाडे निघतात. बाकीची नरझाडे असतात. नरझाडाला फळे येत नाहीत म्हणून ठराविक क्षेत्रातील उत्पन्न कमी येते. हे टाळण्याकरिता एकेका आळ्यात (खड्ड्यात) दोन-तीन रोपे लावतात. रोपे वाढून त्यांना फुले आली म्हणजे नर आणि मादी असा भेद ओळखता येतो. तेव्हा १०:१ (मादी:नर) प्रमाण ठेवून बाकीची नराची झाडे तोडून टाकतात. एक नर जास्त असणे म्हणजे एक मादी कमी होणे, एका मादीपासून मिळणारे उत्पन्न कमी होणे.
२) पॉलिथिन पिशव्यांमध्ये रोपनिर्मिती :
बियाण्याचे अंकुरण व्यवस्थित व दर्जेदार रोपे मिळण्यासाठी १५० ते २०० गेजच्या ६ बाय ४ इंचाच्या पॉलिथिन पिशव्यांचा वापर करावा. या पॉलिथिन पिशव्यांना सहा छिद्रे करावीत. गारठ्यात रोपांची निर्मिती करत असल्यास काळ्या पॉलिथिन पिशव्यांचा वापर करावा. अन्यथा, पांढऱ्या पारदर्शक पिशव्या वापरल्या तरी चालतात. पॉलिथिन पिशव्यांत वापरण्यात येणाऱ्या माध्यमांचा निचरा अत्यंत उत्कृष्ट असणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील घटकांचा वापर गरजेचा आहे.
* पोयटा किंवा लाल माती- ४ पाटी
* शेणखत (चांगले कुजलेले असल्यास तरच वापर करावा)- १ पाटी
* सिंगल सुपर फॉस्फेट पावडर- २०० ग्रॅम
* वाळू- अर्धी पाटी
* कार्बेन्डाझीम- १० ग्रॅम
एवढ्या माध्यमात ६ बाय ४ इंचाच्या १०० पिशव्या सहज भरल्या जातात.
पिशव्या भरल्यानंतर साधारणतः एक सें.मी.च्या खोलीवर बियांची लागवड करावी. यापेक्षा जास्त खोलीवर लागवड केल्यास बियाण्याच्या अंकुरणावर विपरीत परिणाम होत असतो. लागवडीनंतर वातावरणात गारठा नसल्यास १३ ते १८ दिवसांत बियाण्याचे अंकुरण होत असते; मात्र गारठा असल्यास १८ ते २५ दिवसांचा कालावधी बियाण्याच्या अंकुरणासाठी लागतो. बियाण्याचे अंकुरण होईपर्यंत पॉलिथिन पिशव्यांना नियमित पाणी द्यावे. मात्र बियाण्याच्या अंकुरणानंतर पाण्याच्या पाळ्या सांभाळून देणे गरजेचे आहे.
अंकुरण झाल्यानंतर पिशव्या कायम वाफसा स्थितीतच ठेवाव्यात. पाण्याची पाळी एक ते दोन दिवस लांबली तरी चालेल, परंतु जास्त पाण्यामुळे पिथीयमचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पिथीयमच्या प्रादुर्भावामुळे बऱ्याचदा मोठ्या प्रमाणावर रोपे दगावतात. साधारणतः ४५ ते ६० दिवसांत रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात. साधारणपणे १२ ते १५ सें.मी.चे आठ पानांची मजबूत सशक्त खोड/ दांडा असलेली रोपे लागवडीसाठी योग्य असतात.
निरोगी रोपांसाठी महत्त्वाच्या बाबी :
मातीचे फॉर्मेलिनच्या द्रावणाने (प्रमाण एक लि. पाण्यात २५ मि.लि. फॉर्मेलिन) निर्जंतुकीकरण करून घ्यावे. फॉर्मेलिनचे द्रावण फवारल्यानंतर माती दोन दिवस पॉलिथिन पेपरने झाकून ठेवावी. त्यानंतर १५ दिवसांनी या मातीचा वापर सुरू करावा.
गारठ्यात रोपे तयार करत असल्यास पॉलिहाऊसमध्ये रोपे तयार करावीत, अन्यथा ५० टक्के शेडनेटचा वापर करावा.
रोपे सशक्त होण्यासाठी ३५ ते ४० दिवसांनंतर दोन ते तीन दिवस शेडनेटच्या बाहेर ठेवावीत.
पॉलिथिन पिशवीत बियाण्याची लागवड केल्यानंतर पहिले पाणी देताना कॉपर ऑक्सिक्लोराईड (दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाणी) त्यामध्ये मिसळावे.
पिशव्या कायम वाफसा स्थितीत ठेवाव्यात. अंकुरणानंतर पाण्याचा एक ते दोन दिवस ताण पडल्यास चालेल, परंतु कोणत्याही परिस्थितीत पाणी जास्त देऊ नये.
रोपांची उगवण झाल्यानंतर १० ते १५ दिवसांनी मेटॅलॅक्झील अधिक मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक दोन ग्रॅम प्रति लिटरची आळवणी (ड्रेंचिंग) करावी.
रोपावस्थेत नत्रयुक्त खते टाळा. आवश्यकता असल्यास ००:५२:३४ आणि ह्युमिक ऍसिडची आळवणी करावी.
वाढ नियंत्रणात नसल्यास ३५ ते ४० दिवसांनी क्लोरमेक्वाट क्लोराईड तीन मि.लि. प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पपई पिकात फोरेटचा वापर टाळावा.
Agrojay Innovations Pvt. Ltd.
Comments
Post a Comment