शेवगा उत्पन्न देणार पीक
शेवगा उत्पन्न देणार पीक
शेवगा हे सर्वाच्या परिचयाचं भाजीपाल्याचं झाड आहे. भारतात सगळीकडे शेताच्या बांधावर, परसबागेत याचं अस्तित्व आढळून येतं. शेवग्याचे उगमस्थान भारत असून, त्यात असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे या झाडाचा प्रसार जगातील अनेक देशांत झाला आहे. असे असले तरी त्यांची व्यापारी शेती भारत, श्रीलंका व केनिया या तीनच देशांत केली जाते. भारतात तामिळनाडू, गुजरात व महाराष्ट्र या राज्यांत शेवग्याची व्यापारी शेती केली जाते.
याशिवाय पानांची पावडर, बियांची पावडर, बीपासून बेन-ऑईल यासारखे प्रक्रिया पदार्थ साध्या पद्धतीने बनविता येत असून, त्याला जगभरातून मोठी मागणी आहे. पानांच्या पावडरचा उपयोग कुपोषण थांबविण्यासाठी पोषक आहार म्हणून, तर बियांची पावडर, पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाते. बियांपासून बनविलेल्या बेनऑईलचा वापर घडय़ाळे व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुरुस्तीमध्ये केला जातो.
शेवगा बियापासून जे तेल निघते, त्याला बेन ऑइल म्हणतात. हे तेल सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूत वंगण म्हणून वापरतात. मोबाईल, घडय़ाळे, टीव्ही इत्यादी दर लिटरला २० हजार रुपयांनी ते जाते. तसेच वाळलेल्या शेवगा बियाची पावडर ही पाणी र्निजंतूक करण्यासाठी जगभर वापरली जाते. जागतिक आरोग्य संघटनेने दर १०००लि.पाणी र्निजतुक करण्यास ८०० ग्रॅम पावडर वापरावी असे सुचित केले आहे.
हवामान :
शेवग्याची लागवड सर्व हवामानात करता येते. सर्वसाधारणपणे २५ ते ३० डिग्री सें. तापमानात वाढ चांगली होते. तसेच तापमान ४० डिग्री सें. पेक्षा जास्त असल्यास फुलगळ होते.
लागवडीसाठी जमीन :
शेवग्याची लागवड हलक्या, माळरान जमिनीत तसेच डोंगरउताराच्या जमिनीत करता येते. चोपण जमिनीत शेवग्याची लागवड करू नये. जमिनीचा सामू ६-७.५ असावा.
लागवड :
महाराष्ट्र राज्यात दहा-बारा वर्षांपासून शेवग्याची व्यापारी शेती करण्यास सुरुवात झाली असून, ती कमालीची यशस्वी झाली आहे. शेवग्याची लागवड महाराष्ट्रातील सर्व विभागांत करता येते. शेवगा लागवडीसाठी हलकी, मध्यम व भारी यापैकी कोणत्याही प्रकारची जमीन असली तरी चालते; परंतु चांगले उत्पन्न मिळण्यासाठी पाण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत शेवग्याला अजिबात पाणी नसले तरी झाड मरत नाही. फक्त त्या कालावधीत उत्पन्न खंडित होते. जेथे वर्षभर पाणी आहे अशा ठिकाणी नोव्हेंबर ते जून असे सात ते आठ महिने शेवगा शेंगांचे उत्पन्न मिळते.
शेवग्याची लागवड कोकणातील जिल्ह्य़ांत सप्टेंबर-ऑक्टोबरपासून फेब्रुवारी-मार्च या कालावधीत करावी. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांत लागवड जूनपासून जानेवारीपर्यंत केव्हाही केली तरी चालते. शेवगा लागवड हलक्या जमिनीत १० बाय १० फूट अंतरावर करावी. एकरी ४३५ झाडे बसतात. मध्यम व भारी जमिनीत १२ बाय ६ अंतरावर लागवड करावी. एकरी ६०० झाडे बसतात. लागवडीसाठी २ बाय २ बाय १.५ फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. ज्यांना खड्डे घेणे शक्य नाही त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने खोल सरी करावी. प्रत्येक खड्डय़ात चांगले शेणखत दोन घमेली, अर्धा किलो दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट व पाच ते दहा ग्रॅम फोरेट टाकून हे सर्व मिश्रण मातीत एकत्र करून खड्डा जमिनीबरोबर भरावा. आळे तयार करून घ्यावे व एक-दोन चांगला पाऊस झाल्यानंतर प्रत्येक खड्डय़ात एक रोप लावावे.
पिशवी मध्ये रोपे तयार करणे :
पिशव्या भरताना प्रथम पंचिंग मशिनने ०.७५ ते १ इंच वरून व खालून पिशवीच्या दोन्ही बाजूने छिद्रे पाडून घ्यावे... बाजारामध्ये तयार पिशव्याही उपलब्ध आहेत... नंतर यामध्ये एका प्रकारची माती, चांगले कुजलेले शेणखत व वाळू किंवा मुरुम २:१:१ याप्रमाणे मिश्रण तयार करुन त्यामध्ये थोडीशी ट्रायकोडर्मा पावडरचे टाकावी. पिशवीचा वरील एक सेंटीमीटर भाग रिकामा ठेवावा...
बीजप्रक्रिया करताना १ लिटर पाण्यात २५ मिली जर्मिनेटर किंवा कोमट पाणी व त्यामध्ये बावीस्टीन किंवा थायरमचा वापर शिफारशीप्रमाणे करून य द्रावणात बी टाकून काठीने ढवळून ते रात्रभर भिजवून त्यावर झाकण ठेवणे... दुसऱ्या दिवशी हे बी प्लॅस्टिकच्या कागदावर किंवा पोत्यावर अंथरूण सावलीत सुकवावे व नंतर भरलेल्या पिशवीच्या मधोमध ते लावावे.
सुधारित जाती :
१) जाफना - हा शेवगा वाण स्थानिक व लोकल आहे. देशी शेवगा म्हणून ओळखतात. या वाणाच्या शेंगा चवदार असतात. या वाणाचे वैशिष्टय़ एका देठावर एकच शेंग येते. ती २० ते ३० सें.मी. लांब असते. या वाणाला वर्षांतून एक वेळ म्हणजे फेब्रुवारीत फुले लागतात. मार्च, एप्रिल, मे मध्ये शेंगा मिळतात. एक किलोत २० ते २२ शेंगा बसतात. दर झाडी एक हंगामात १५० ते २०० शेंगा मिळतात. चवीला चांगली. बी मोठे होतात.
२) रोहित-१ - या जातीचे वैशिष्टय़ म्हणजे लागवडीपासून सहा महिन्यांत उत्पन्न सुरू होते. शेंगांची लांबी मध्यम प्रतिची ४५ ते ५५ सें.मी. असून, शेंगा सरळ व गोल आहेत. रंग गर्द हिरवा असून, चव गोड आहे. उपलब्ध सर्व जातींपेक्षा ३० टक्के उत्पन्न जास्त आहे. व्यापारी उत्पन्न देण्याचा कालावधी ७ ते ८ वर्षांचा आहे. वर्षभरात एका झाडापासून सरासरी १५ ते २० किलो शेंगांचे उत्पन्न मिळते. शिवाय या जातीतून ८० टक्के शेंगा एक्स्पोर्ट गुणवत्तेच्या मिळतात.
३) कोकण रुचिरा - हा वाण कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केला आहे. कोकणासाठी शिफारस केला आहे. झाडाची उंची ५ ते १६ मीटर. या एका झाडाला १५ ते १७ फांद्या उपफांद्या येतात. शेंगा गर्द हिरव्या रंगाचे असतात. या वाणाचे उत्पादन ओलीताखाली सर्वोत्तम येते. शेंगा या एका देठावर एकच लागते. या वाणाला एकाच हंगामात शेंगा येतात. साइज मध्यम त्यामुळे वजन कमी भरते. दर झाडी पी.के.एम. २ या वाणाचे तुलनेत ४० टक्के उत्पन्न मिळते.
४) पी. के. एम. १ - हा वाण तामीळनाडू कृषी विद्यापीठाचे पेरीया कुलम फळबाग संशोधन केंद्राने विकसित केला आहे. हा वाण चवदार आहे. या वाणात खालील अनेक वैशिष्टय़े आहेत. १) रोप लावणी नंतर ६ महिन्यात शेंगा सुरू होतात. २) शेंगा ४० ते ४५ सें. मी. लांब असतात. ३) या वाणाला महाराष्ट्र वातावरणात वर्षांतून दोन वेळा शेंगा येतात. ४) शेंगा वजनदार व चविष्ट, मात्र बी मोठे होत नाही. ५) या वाणाची झाडे ४.५ ते ५ मीटर उंच होतात. ६) दोन्ही हंगामात मिळून ६५० ते ८५० शेंगा ओलीताखाली मिळतात.
५) पी. के. एम. २ - हा वाण देखील तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसीत केला आहे. हा वाण आज महाराष्ट्रातील स्वतंत्र शेवगा शेतीत तसेच अंतर पीक शेवगा शेतीत आहे. १) शेवगा शेतीतली खरी क्रांती या वाणानेच केली आहे. २) भारतात आज ज्ञात असलेल्या सर्व शेवगा वाणात हा वाण विक्रमी उत्पादन देतो. दोन हंगामात ओलीता खाली व छाटणी आणि खत व्यवस्थापन उत्तम ठेवल्यास ८०० ते ११०० शेंगा दर झाडी मिळतात. ३) या वाणाचे शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. ४) सर्व वाणात लांब शेंगा असणारा हा वाण आहे. शेंगा ७० ते ८० सें. मि. लांब येतात. ५) लांब शेंगा वजनदार शेंगा यामुळे बाजारभाव सर्वोत्तम व सर्वात जादा मिळतो. ६) एका झाडाला एकाच हंगामात २१९० शंगा मिळवण्याचा विक्रम या वाणाने केला. ७) या वाणात एका देठावर ४-५ शेंगाचा झुपका येतो. हे वैशिष्टय़ इतर कोणतेही जातीत नाही. ८) बेन ऑइलसाठी व पाणी शुद्ध करण्यासाठी याच वाणाला प्राधान्य दिले जाते.
९) सध्या याच वाणाची परदेशी निर्यात केली जाते.
थोडक्यात, पी.के.एम.२ हा वाण लावणे, वाढवणे, जोपासणे योग्य आहे. महत्त्वाचे आहे.
या वरील वाणाखेरीज शेवगा पिकाचे महाराष्ट्रात खालील वाण आढळतात. मात्र ८० ते ८२ टक्के लागवड ही पी.के.एम. २ ची आहे.
१) दत्त शेवगा कोल्हापूर, २) शबनम शेवगा, ३) जी.के.व्ही.के. १ व जी.के.व्ही ३, ४) चेन मुरिंगा, ५) चावा काचेरी, ६) कोईमतूर, इ. मात्र जादा उत्पादन २ वेळ हंगाम व चव आणि लांबी या दृष्टीने पी.के.एम. २ सर्वश्रेष्ठ आहे.
छाटणी :
शेवग्याचे रोप लागवडीनंतर झाडाची उंची चार फूट झाल्यानंतर तीन फूट झाड ठेवून वरील सर्व भाग छाटून टाकावा. त्यामुळे बगलफूट होईन. येणाऱ्या नवीन फांद्यांवर शेंगांचे उत्पन्न मिळते. जून-जुलैत लागवड केली तर जानेवारी-फेब्रुवारीपासून मेपर्यंत शेंगांचे उत्पन्न मिळते. मेमध्ये हंगाम संपल्यानंतर जूनमध्ये छाटणी घ्यावी. छाटणीसाठी फांदी जेथून फुटली आहे, तेथे चार ते सहा इंच फांदी ठेवून वरील सर्व भाग छाटून टाकावा.
किडी व रोग व्यवस्थापन :
शेवगा झाडावर कोणताही रोग आढळून येत नाही. मात्र पावसाळ्यात पाने खाणारी अळी व जाळे तयार करणारा कोळी पिकाचे नुकसान करतो. त्याच्या नियंत्रणासाठी नुवॉन हे कीटकनाशक १० लीटर पाण्यात १५ ते २० मि.ली. घेऊन फवारणी करावी. शिवाय महिन्यातून एकदा ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
खते :
शेवग्याला दर तीन महिन्यांनी अल्प प्रमाणात रासायनिक खते द्यावीत. लागवडीनंतर पहिल्या तीन महिन्यांनी प्रत्येक झाडाला १०० ग्रॅम १८:४६ हे खत द्यावे. पुढच्या तीन महिन्यांनी १०:२६:२६ हे खत १५० ग्रॅम द्यावे व पाणी असल्यास मार्चमध्ये १८:१८:१० हे खत द्यावे. याप्रमाणे जसजसे झाडाचे वय वाढत जाईल तसतसे दरवर्षी खतमात्रेत ५० ग्रॅमने वाढ करावी. शेणखत किंवा लेंडीखत वर्षांतून एकदाच जूनमध्ये छाटणी झाल्यानंतर द्यावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी निंबोळी पेंड व गांडूळ खताचा अवश्य वापर करावा.
काढणी आणि उत्पादन :
शेवगा लागवडीनंतर पहिल्या सहा महिन्यांत प्रत्येक झाडापासून सरासरी ३ ते ७ किलो शेंगा मिळतात. दुसऱ्या वर्षी १५ ते २० किलो शेंगा मिळतात व पुढे जसजसे झाडाचे वय वाढत जाते तसतसे उत्पन्नात वाढ होते. जेथे जमीन हलकी आहे व पाणी फेब्रुवारी- मार्चपर्यंतच आहे, अशा ठिकाणी वर्षभरात ३ ते ४ टन शेंगांचे उत्पन्न मिळते व खर्च वजा जाता ३० ते ५० हजार रुपये फायदा होतो. जेथे जमीन मध्यम व भारी आहे व वर्षभर पाण्याची सुविधा आहे. अशा ठिकाणी वर्षभरात ५ ते ८ टन शेंगांचे उत्पन्न मिळते व ६० ते ८० हजार रुपयांचा फायदा होतो. शेवगा शेतीचे चांगले व्यवस्थापन करून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी बागायत शेतीतून ७० हजार ते १ लाख २५ हजारापर्यंत उत्पन्न मिळवले आहे. शेवगा शेंगांना स्थानिक बाजारपेठांपासून पुणे व मुंबई बाजारात चांगले दर मिळतात. सरासरी १५ ते २० रु. प्रतिकिलो असे शेंगाचे दर असून २००८-०९ मध्ये पुणे-मुंबई बाजारात १० ते ५० रुपये प्रतिकिलो असा दर होता.
शेवग्याच्या स्वतंत्र लागवडीबरोबरच आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, आवळा यासारख्या फळझाडांमध्ये आंतरपीक म्हणून लागवड करणे फायदेशीर आहे. वरील फळझाडांचे उत्पन्न मिळेपर्यंत शेवगा उत्पन्न देतो व फळझाडांचे उत्पन्न सुरू झाल्यानंतर शेवगा झाडे कमी केली तरी चालू शकतात.मी गेल्या अकरा वर्षांपासून शेवगा शेती करत असून, माझ्याकडे रोहित-१ या जातीची तीन एकरावर लागवड आहे. माझी जमीन हलकी, माळरानाची असून, पाणी फक्त फेब्रुवारीपर्यंत असते. तरीही मला दरवर्षी एका एकरातून ४० ते ५० हजार रुपये उत्पन्न, खर्चवजा जाता मिळते. मी या शेतीत विविध प्रयोग करून शेवग्याची छाटणी, खत, मात्रा व्यवस्थापन याचं स्वतंत्र तंत्र तयार करून भरघोस उत्पन्न मिळवले आहे.
Agrojay Innovations Pvt. Ltd.
Comments
Post a Comment