संत्रा लागवडीचे सुधारित तंत्र
संत्रा लागवडीचे सुधारित तंत्र
संत्रा लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाची गोष्ट आहे. संत्रा बागेच्या दक्षिण- पश्चिम बाजूला जैविक कुंपण करावे. संत्र्याच्या दोन झाडांतील अंतर जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असते. आतापासूनच लागवडीचे नियोजन केल्यास पावसाळ्यामध्ये शास्त्रीय पद्धतीने संत्रा लागवड करणे सोपे जाईल.
संत्रा लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाची गोष्ट आहे. नुसती वरवर जमीन पाहून जमिनीची खरी स्थिती लक्षात येत नाही, त्यासाठी माती परीक्षणाबरोबरच पाणी परीक्षण करून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पहिल्या टप्प्यात लागवडीसाठी एक हेक्टर क्षेत्र निवडावे. अर्धा-अर्धा हेक्टरच्या पटीत क्षेत्र वाढवावे आणि जास्तीत जास्त दोन हेक्टर क्षेत्राची निवड करावी. यामुळे संत्रा बागेची जोपासना करताना अडचणी येत नाहीत.
१) लागवडीसाठी निवडलेले क्षेत्र मोठे असेल तर ते सलगपणे आणि एकच पट्टा समजून लागवड केली जाते. त्याऐवजी निवडलेल्या क्षेत्राचे १/२ हेक्टर पट्टे वाढवून घ्यावेत.
२) काही भागात निवडलेली जमीन सपाट असते. तेथे सपाटीकरण करण्याची गरज नाही असे समजले जाते. याउलट अधिक उताराची जमीन असल्यास जवळजवळ बांध घालून जमीन सपाट न करता लागवड केली जाते. या दोन्ही बाबी चुकीच्या आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये ठराविक उतार राखूनच सपाटीकरण करायला हवे. पाण्याचा निचरा होणे, त्याचबरोबर काही ठिकाणी पाणी साचून राहायला नको यासाठी जमिनीस तिचा मूळचा सुसंगत असा ढाळ (उतार) असावा. भारी आणि मध्यम काळ्या जमिनीत हा ढाळ एक टक्का एवढा असावा. हलक्या जमिनीत निचरा चांगला होतो; पण जमिनीतील वरच्या थरातील मातीची धूप होण्याची शक्यता असते आणि खालच्या थरातून मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्ये झिरपून जाण्याची शक्यता असते. तेव्हा जमिनीचा प्रकार कसाही असो आणि जमिनीचा उतार मूळचा कितीही असो, शास्त्रीय पद्धतीने सपाटीकरण करणे हे आवश्यक आहे.
३) जमिनीच्या मगदुराप्रमाणे आणि उताराच्या प्रमाणाचे अवलोकन करून क्षेत्रामध्ये आणि बाजूने चर काढावेत. किती अंतरावर, किती प्रमाणात आणि किती चर काढावेत हे नीट समजून घ्यावे. उतारास समांतर, उतारास आडवे चर खोदून ते एकमेकांशी मिळतील आणि त्यातील पाण्याचा निचरा एका ठिकाणी जमा होईल या हिशेबाने चर काढावेत.
४) बागेभोवती कुंपण असल्याने जनावरांपासून, माणसांच्या वर्दळीपासून संरक्षण होते. याशिवाय हिवाळ्यातील थंडीची लाट आणि उन्हाळ्यातील उष्ण वारे यांपासून संत्रा पिकाचे संरक्षण होते. संत्रा बागेच्या दक्षिण- पश्चिम बाजूला जैविक कुंपण करावे, त्यामुळे त्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यापासून जे नुकसान होते, त्यावर नियंत्रण ठेवता येते. कुंपणाची निवड आणि लागवड करताना कुंपणाचा अपाय संत्रा बागेस आणि शेजाऱ्यांना होणार नाही याची काळजी घ्यावी.
कुंपणासाठी झाडे :
१) बिनकाटेरी झाडे-झुडपे - खडसणी (सुरू), ड्य्रुपिंग अशोका, कडुनिंब, जांभूळ, कण्हेर, मलबेरी, गुलमेहंदी, सिल्व्हर ओक.
२) काटेरी झुडपे - विलायती चिंच, रामकाठी बाभूळ, निवडुंग, बोराटी, बाभूळ, सागरगोटी, चिलार, घायपात, करवंद, बोगनवेल.
हवामान :
संत्र्याच्या झाडाची वाढ १३ ते ३७ अंश से. ग्रे. या तापमानाच्या कक्षेत उत्तमरित्या होते. या पिकाला उष्ण व किंचित दमट हवामान, ३७० मि. मी. पाऊस आणि ५० ते ५३ टक्के हवेतील आद्रता चांगली मानवून झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते.
जमीन :
संत्रा लागवडीकरिता योग्य जमीन -
1) जमिनीचा पोत - मध्यम काळ्या पोताची
2) पाण्याचा उत्तम निचरा होणारी
3) एक ते दीड मीटर खोलीची व त्याखाली कच्चा मुरूम असणारी
4) जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ एवढा असावा
5) चुनखडीचे प्रमाण १० टक्केपेक्षा कमी
6) पावसाळ्यात पाण्याची पातळी दोन मीटरच्या खाली असावी
7) जमिनीची क्षारता ०.५ डेसिसायमन/ मीटरपर्यंत असावी
कलमांची निवड :
डोळा भरून तयार केलेल्या कलामांपासून संत्र्याची लागवड केली जाते. कलमांची निवड करतांना ती शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली निरोगी, जातिवंत, जोमदार, वाढणारी, जम्बेरी, किंवा रंगपूर लिंबू या खुंटावर डोळे भरलेली असावीत. जांबेरी लिंबुच्या मातृवृक्षावर कलम केलेली रोपे हि, फायटोप्थोरा आणि गमॉसिस रोगांस प्रतिकारक असतात, तसेच हि रोपे हलक्या जमिनीत जास्त योग्य रितीने वाढतात.
रंगपुरी मातृवृक्षावर कलम केलेली रोपे, रुट रॉट आणि ट्रिस्टेझा व्हायरस रोगांस प्रतिकारक असतात. रंगपुरी मातृवृक्षावरिल रोपे जास्त उंच वाढतात.
संत्र्याची कलमे कृषी विद्यापीठे व शासकीय रोपवाटिका येथूनच घ्यावीत.
जाती :
संत्र्याच्या नागपूर संत्र, किन्नो संत्र व नं. १८२ या जाती आहेत.
लागवड :
संत्र्याची लागवड करताना ६ बाय ६ मीटर किंवा ५ बाय ५ मीटर अंतरावर १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे करून ते शेणखत, निचऱ्यासाठी थोडी वाळू आणि रासायनिक खतांची पहिली मात्रा टाकून खड्डे बुजवून घ्यावेत. लागवड केल्यानंतर पाणी देणे आवश्यक असते.
पाणी व्यवस्थापन :
संत्रापिकास एका वर्षात साधारणतः २४ ते २५ ओलिताच्या पाळ्या द्याव्या लागतात. हिव्वाल्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने. उन्हाळ्यात ६ ते ७ दिवसांच्या अंतराने तर पावसाळ्यात गरजेप्रमाणे ओलीत करावे. ओलीत देण्यासाठी रिंग पद्धतीने आळे तयार करावेत व बाहेरील आळ्यात पाणी द्यावे. कारण झाडाची अन्न व पाणी घेणारी मुले झाडाच्या परीघाकडील भागात पसरलेली असतात. या पद्धतीमुळे झाडाच्या खोडास पाणी लागत नाही. त्यामुळे डिंक्यासारख्या रोगाला झाडे बळी पडून रोगांना प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
खत व्यवस्थापन :
संद्रिय खते फुलोरा येण्याच्या १ ते २ महिने आधी दिली जातात. तर रासायनिक खते फुलो-याच्या अगोदर, फळ पोसत असतांना व जानेवरी-फेब्रुवारी तसेच जुन-जुलै महिन्यात दिली जातात.
उत्पादन :
सर्वसाधारणपणे प्रती झाड ८०० ते १६०० फळे इतके उत्पन्न निघते.
Agrojay Innovations Pvt. Ltd.
Comments
Post a Comment