सोयाबीन किडींचे नियंत्रण

सोयाबीन किडींचे नियंत्रण

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download    Agrojay    Mobile Application:    http://bit.ly/Agrojay   )



खोडमाशीचा प्रादुर्भाव:

या किडीची प्रौढ माशी खूप लहान 1.9 ते 2.2 मि.मी. लांब असते. तिचा रंग चमकदार काळा असतो. फक्त पाय, स्पर्शिका व पंखांच्या शिरा फिकट तपकिरी असतात. अंडी पांढरी, अंडाकृती असतात. अळी पिवळी, तोंडाच्या बाजूने टोकदार व मागील बाजूने गोलाकार असते. कोष तपकिरी रंगाचा असतो.


नुकसानीचा प्रकार - सोयाबीन बीजदल जमिनीच्या वर आल्यानंतर मादी माशी बीजदलाच्या वरच्या बाजूला पोखरून आत अंडी घालते. अंड्यातून अळी निघाल्यानंतर ती बीजदल पोखरते, त्यामुळे फिकट वेड्यावाकड्या रेषा दिसतात, त्या नंतर तपकिरी होतात. सुरवातीला अळी पोखरत वरच्या बाजूला व नंतर खालच्या बाजूला जाते. मादीने पानावर वरच्या बाजूला पोखरून केलेला मार्ग वेडावाकडा असतो, तर मेलॅनोग्रोमायझा सोजी प्रजातीच्या अळीचा मार्ग लहान व सरळ असतो. सुरवातीला हा मार्ग पांढरा व नंतर तपकिरी दिसतो. तीन पानांच्या अवस्थेत अळी खालच्या बाजूने पोखरते. हा पोखरलेला मार्ग लहान व सरळ पानाच्या शिरेपर्यंत असतो.

अळी पान पोखरून शिरेपर्यंत पोचून शिरेतून पानाच्या देठामध्ये शिरते. त्यानंतर खोडामध्ये शिरते. अशाप्रकारे अळी आतील भाग खात जमिनीपर्यंत पोचते व कोषामध्ये जाते.
झाड मोठे झाल्यानंतर वरून या किडीचा प्रादुर्भाव जाणवत नाही. फक्त जमिनीजवळ खोडामधून प्रौढ माशी निघाल्यास खोडाला छिद्र दिसते. यामुळे झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. फुले व शेंगा कमी लागतात. शेंगांमध्ये दाणे लहान व सुरकुतलेले असतात.

चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव :

या किडींचे प्रौढ भुंगे फिकट तपकिरी रंगाचे व सात ते दहा मि.मी. लांब असतात. पुढील टणक पंखाचा शरीराकडील अर्धा भाग गर्द तपकिरी आणि उर्वरित अर्धा भाग गर्द काळा असतो. अळी पिवळसर पांढरी, गुळगुळीत, बिनपायाची असून, तिच्या डोक्‍याकडील भाग जाड असतो. पूर्ण वाढलेली अळी 19 ते 22 मि.मी. लांब असते.


नुकसानीचा प्रकार - या किडीची अळी तसेच प्रौढ अवस्था पिकाचे नुकसान करते. मादी भुंगेरा फांदी, देठ व मधल्या पानाच्या देठावर दोन चक्रकाप तयार करते व त्याच्या मधल्या भागात तीन छिद्रे पाडून त्यात अंडी घालते. कापावरील भाग वाळतो. फांद्यांवरील चक्रकापामुळे जास्त नुकसान होते. अळी खोडातील भाग बुडापर्यंत पोखरते, त्यामुळे झाडे मोडून पडतात व उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. उत्पादनात 29 ते 83 टक्केपर्यंत घट होते. मुख्यतः मॉन्सूनपूर्व पेरलेल्या पिकाचे जास्त नुकसान होते.

एकात्मिक व्यवस्थापन :

पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे.
पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावे. बांधावर असणाऱ्या किडीच्या पर्यायी खाद्य वनस्पतींचा नाश करावा.
आंतरमशागत निंदणी व कोळपणी वेळेवर करावी.
खोडमाशी व चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाने, फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा.
जेथे खोडमाशी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर येतो, अशा ठिकाणी कोळपताना मोघ्याच्या साहाय्याने फोरेट (10 टक्के दाणेदार) दहा किलो प्रति हेक्‍टर जमिनीत ओल असताना पेरून द्यावे. कीटकनाशके पेरताना रबरी हातमोज्यांचा वापर करावा.
खोडमाशी व चक्रीभुंगा या किडींनी अंडी घालू नये म्हणून त्याकरिता सुरवातीलाच पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
कीड व्यवस्थापनासाठी 20 मि.लि. ट्रायझोफॉस (40 टक्के प्रवाही) किंवा 20 मि.लि. इथेफेनप्रॉक्‍स (10 टक्के प्रवाही) प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारावे. पॉवर स्प्रेसाठी कीटकनाशकाचे प्रमाणे तीन पट वापरावे.



Agrojay Innovations Pvt. Ltd.


Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology