शेणखत वापर

शेणखत वापर

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download Agrojay Mobile Application: http://bit.ly/Agrojay)


शेणखत वापरताना घ्यावयाची काळजी :

1) लहान क्षेत्र असलेले शेतकरी शेतातील उकिरड्यात, खड्ड्यात वर्षभर साठवलेले शेण हे खत म्हणून शेतात मिसळतात. असे शेण चांगले कुजलेले असावे. अशा शेणामध्ये हुमणी, कॉकचाफर भुंगे, नारळावरील गेंड्या भुंग्याच्या अळ्या इत्यादी किडींच्या अळी अवस्था आढळतात. ज्यास बरेचसे शेतकरी "शेणकिडे' म्हणून संबोधतात. अशा विविध भुंगेरावर्गीय किडींच्या अळ्या शेणखताद्वारे पसरून शेतातील मुख्य पिकास नुकसान पोचवितात.

2) भुंगेरावर्गीय किडींची मादी मे-जून महिन्यांत शेणासारख्या कुजणाऱ्या पदार्थांमध्ये अंडी घालतात. त्यामुळे शेतातील शेणाचा खड्डा, ढिगारा, उकिरडा इत्यादी मे महिन्याच्या सुरवातीलाच रिकामा करून हे शेणखत शेतात मिसळून द्यावे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर त्यामध्ये घातल्या जाणाऱ्या अंड्यानंतर होणारा प्रसार थांबविता येईल. शेणखत जमिनीत मिसळताना त्यात सापडणाऱ्या भुंगेऱ्यांच्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात.

3) उन्हाळ्याच्या दिवसांत चाऱ्याची कमतरता असताना शेतकरी मोकळ्या शेतात जनावरे चरण्यास सोडतात. त्यांचे शेण शेतात विखुरलेल्या स्वरूपात पडते.

4) मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरवातीला पडणाऱ्या पावसाबरोबरच हुमणीच्या मादी भुंगेऱ्यांकडून अशा कुजणाऱ्या शेणात अंडी घातली जातात. त्यामुळे अशा शेतात पुढील हंगामात घेतले जाणारे पीक हे हुमणीच्या अळीद्वारे प्रादुर्भावग्रस्त होते.

5) काही शेतात तर शेळ्या-मेंढ्या ज्या गोलाकार रिंगणात बसविल्या जातात, त्याच भागात पावसाळ्यात हुमणीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. कुजणाऱ्या शेणात पिकांस उपद्रवी ठरणारी बुरशी, मर रोग, मूळकूज, करपा, सड या रोग निर्माण करणाऱ्या बुरशी या शेणात नसाव्यात.

6) बऱ्याच वेळा शेतातील निंदण्यात येणारे गवत जनावरांच्या गव्हाणीत चारा म्हणून वापरले जाते. अशा तणांच्या मुळास लटकलेली शेतातील माती रोगकारक बीजाणूंसह शेणाबरोबर खड्ड्यात जाते. त्या ठिकाणी इतर सेंद्रिय पदार्थांबरोबर वाढते. अशा वेळेस शेणखतास जैविक प्रक्रिया करून घेणे आवश्‍यक ठरते.


शेणखताचे महत्व :

1) शेणखतामधून अन्नद्रव्यांचे मिळणारे प्रमाण रासायनिक खतांच्या तुलनेत फारच अत्यल्प असते, परंतु सेंद्रिय पदार्थांचा अंतर्भाव जास्त असल्यामुळे सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण जमिनीत तयार होते. त्यामुळे जमिनीत अन्नद्रव्ये उपलब्ध करण्यास मदत करणारे जिवाणू जसे ऍझोटोबॅक्‍टर, स्फुरद विरघळवण्यास मदत करणारे जिवाणू इ. इतर सूक्ष्मजीवांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. गांडुळांचा जमिनीतील वावर वाढतो.

2) जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
3) शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होतात.

4) जमिनीतून वापरण्यात येणारे जैविक-कीड-रोगनाशके जसे ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, पॅसिलोमायसिस, बिव्हेरिया, मेटारायझियम आणि जैविक खते जसे ऍझोटोबॅक्‍टरसह इतर अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंची वाढ नैसर्गिक पद्धतीने होण्यास मदत होते.

5) जमिनीतील मुळांच्या कार्यक्षेत्रातील श्‍वसन वाढून मुळांद्वारे संश्‍लेषित करण्यात येणाऱ्या संजीवकांची निर्मिती चांगल्या प्रकारे होते. पांढऱ्या मुळींची वाढ जोमदार होऊन पीक संपूर्ण हंगामात निरोगी असते.
6) पांढऱ्या मुळीची चांगली वाढ झाल्यामुळे झाडातील संजीवकांची निर्मिती आणि वहन चांगल्याप्रकारे होते.

7) जमिनीची पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होऊन जमिनीच्या सामूमध्येदेखील अपेक्षित बदल होतो. इत्यादी.


शेणखताचा वापर करताना :

1) जमिनीची मशागत करताना शेवटी कुळवणी आधी हेक्‍टरी पाच ते 10 टन शेणखत मिसळावे. फळबागांसाठी उपलब्धतेनुसार एकरी 10-15 टन शेणखत मिसळावे.
2) भाजीपाला रोपवाटिका तयार करताना गादीवाफ्यावर चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत ट्रायकोडर्माचा वापर करून नंतरच बियाणे पेरावे.
3) चांगल्या कुजलेल्या शेणखताचे लहान-लहान ढीग करून त्यात ट्रायकोडर्मा, सुडोमोनास यांसारखी जैविक कीडनाशके आणि जैविक खते 15 दिवसांपर्यंत मिसळून ठेवल्यास अशा जैविक घटकांची वाढ झपाट्याने होते. नंतर असे सर्व ढीग एकत्र करून भाजीपाला पिके, फळबागेत मिसळल्यास अतिशय चांगले परिणाम मिळतात. शेणखताचा उत्तम माध्यम म्हणून जैविक घटकांच्या वाढीसाठी उपयोग करून घेता येईल.
4) टोमॅटोसारख्या भाजीपाला पिकासाठी गादीवाफा तयार करण्यापूर्वीच हेक्‍टरी 20 टन शेणखत, निंबोळी पेंड, ट्रायकोडर्मा इ.सह शेतात मिसळावे. नंतर तयार झालेल्या गादीवाफ्यावर रोपांची लागवड करावी.


शेणखतावर करता येणाऱ्या प्रक्रिया :

1) शेणखत शेतात मिसळताना चांगले कुजलेले असावे. शेणखत पूर्णपणे कुजविण्यासाठी कंपोस्ट कल्चरचा वापर करावा. कंपोस्ट कल्चरचा वापर करताना एक टन शेणखतासाठी एक किलो किंवा एक लिटर कल्चर पुरेसे ठरते.
2) शेणखतातून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरिडी, सुडोमोनास फ्लुरोसन्स या जैविक घटकांचा वापर शेणखड्ड्यात करावा. शेणकिड्यांच्या नियंत्रणासाठी मेटारायझियम ऍनिसोप्ली, बिव्हेरिया बॅसियाना यांसारख्या जैविक कीडनाशकांचा वापर करावा.
3) म्हशी, गाईंच्या गोठ्यात बाहेरून आणल्या जाणाऱ्या शेणात काहीवेळा प्लॅस्टिकच्या छोट्या बाटल्या, इंजेक्‍शन सिरींज - सुया, जनावरांच्या लसीकरणानंतरचे टाकाऊ पदार्थ, काच, कृत्रिम रेतन केल्यानंतर टाकण्यात येणारे प्लॅस्टिकचे हातमोजे, नळ्या काहीवेळा दिसून येतात. असे घटक शेतात आल्यास त्यापासून प्रदूषण वाढते. त्यामुळे या गोष्टी निवडून मगच शेतात खत टाकावे.
4) भाजीपाला पिकात अर्धवट कुजलेले शेणखत जमिनीत मिसळल्यास त्या ठिकाणी शेण कुजताना उष्णता निर्माण होते. त्यामुळे उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या संख्येवर, गांडुळांवर तसेच मुळांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ताजे शेण, अर्धवट कुजलेल्या शेणाऐवजी ते चांगले कुजवून मगच जमिनीत मिसळावे.
6) गोठ्यातील शेण, शेतातील कचरा, जनावरांच्या गोठ्यातील काडी-कचरा सेंद्रिय पदार्थांचा वापर करून सुधारित पद्धतीने कंपोस्टिंग करून शेतात मिसळल्यास अधिक चांगले ठरते. असे शक्‍य न झाल्यास गोठ्यातील शेण मोकळ्या जागेत साठवून त्यावर पाणी टाकून, कंपोस्ट कल्चरचा वापर करून चांगले कुजवून घ्यावे. नंतर असे चांगले कुजलेले खत शेतात टाकावे.
7) फळबागेत शेणखत मिसळताना खड्डा खणून नंतर मातीने बुजवून टाकावे. मातीच्या संपर्कात आल्यामुळे सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. शक्‍य झाल्यास अशा शेणापासून गांडूळ खत तयार करून मग बागेत टाकावे. त्यामुळे जास्त फायदा मिळेल.
8) शेळ्या-मेंढ्यांचे लेंडी खत टाकताना अशा खतातून शेतात बाभळीसारख्या वनस्पतींच्या बियांचा प्रसार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेळ्या-मेंढ्या चरताना बाभळीच्या शेंगा खातात. त्यामुळे बाभळीच्या बिया त्यांच्या विष्ठेद्वारे बाहेर टाकल्या जातात. अशा कळपातील लेंडीखत बागेत टाकल्यास शेतात बाभळीचे झाडे पुढील पाच ते सहा वर्षांपर्यंत उगवत राहतात. त्यामुळे त्याचा त्रास येणाऱ्या हंगामात वर्षानुवर्षे होतो.
9) काही शेतकरी म्हशींच्या तबेल्यातील पातळ शेणखत शेतात तसेच मिसळतात. परंतु अशा खतात ओलाव्याचे प्रमाण खूपच जास्त असते. त्यामुळे असे शेणखत मिसळल्यानंतर त्यापासून मिळणारे शुष्क सेंद्रिय पदार्थ अतिशय कमी असतात.
10) गावाच्या बाहेर प्रत्येक घरांचे शेण टाकण्याचे ठराविक उकिरडे असतात. यामध्ये प्लॅस्टिकच्या वस्तूंचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात अशा ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे असे शेणखत शेतात वापरताना योग्य ती काळजी घ्यावी.




(Download Agrojay Mobile Application: http://bit.ly/Agrojay)


Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology