गिरिपुष्प : हिरवळीच्या खताचा मानबिंदू (ग्लिरिसिडीया)

गिरिपुष्प : हिरवळीच्या खताचा मानबिंदू (ग्लिरिसिडीया)

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download Agrojay Mobile Application: http://bit.ly/Agrojay)

महाराष्ट्रातील जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा अभाव असल्याने आपल्या पिकांची उत्पादकता कमी आहे. त्यासाठी जमिनीत दरवर्षी सेंद्रिय खते टाकली पाहिजेत. परंतु शेणखत, कंपोस्ट यांसारखी नेहमी उपयोग करण्यात येणारी सेंद्रिय खते दुर्मिळ होत चालली आहेत. ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर प्रमुख समस्या आहे. त्यावर पर्याय म्हणून हिरवळीची खते वापरणे हा एक उपाय आहे.

हिरवळीची खते दोन प्रकारची असतात, एक हंगामी व दुसरी बहुवर्षीय. हंगामी पिकांत सण (ताग) धैंचा, सस्बेनिया आणि बहुवर्षीय पिकांत सर्वांत महत्त्वाचे झाड गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) हे होय.

जंगलात आढळणारे छोटे, मध्यम उंचीचे व पानांचा हिरवा गडद रंग असलेले झाड. गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या झाडाला "गिरिपुष्प' असे सुंदर नाव दिले आहे. गिरिपुष्प हे द्विदल वर्गातील जलद वाढणारे झाड आहे. शिवाय ते अत्यंत काटक आहे. त्यामुळे ते केवळ पावसाच्या पाण्यावर होऊ शकते. या झाडाला १६ ते २० वर्षे आयुष्य आहे. या झाडाला जून ते ऑगस्ट या महिन्यांत भरपूर फुटवा येतो. झाड पानांनी भरून जाते. गिरिपुष्पाच्या झाडाला एप्रिल-मे महिन्यांत शेंगा येतात. त्या वाळल्या म्हणजे त्यात चपट्या आकाराचे तपकिरी रंगाचे बी येते. हे झाड तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, ओरिसा, आसाम आणि पश्‍चिम बंगाल या भागांत अधिक प्रमाणात आढळून येते. या झाडाच्या पानांचा उपयोग हिरवळीचे खत म्हणून केला जातो आणि फांद्यांचा वापर जळणासाठी होतो.


गिरीपुष्पाची लागवड :

गिरिपुष्पाची लागवड शेतजमिनीत करणे फायदेशीर ठरते, कारण त्यापासून मिळणारी हिरवी पाने व फांद्या कापून जमिनीत मिसळून दिल्यास जमिनीची सुपीकता वाढविता येते, तसेच खडकांची झीज होऊन जमीन चांगल्याप्रकारे तयार होण्यासही मदत होते. या झाडाची लागवड दोन पद्धतीने केली जाते. त्यात पहिली पद्धत छाट कलम तयार करणे व दुसरी पद्धत झाडांच्या बियांपासून रोप तयार करून करता येते. छाट कलम तयार करण्याच्या पद्धतीत झाडाचे छाट कलम साधारणपणे एक वर्ष वयाच्या झाडापासून किंवा त्याच्या फांदीपासून तयार करावे. फांदीची जाडी १.५ ते २ सें.मी. व लांबी ५० ते १०० सें.मी. असावी. 


लागवड करताना छाट कलमाची खालची बाजू जमिनीत साधारण २० ते ५० सें.मी. खोल रुजवावी. लागवड पावसाळ्यात जमिनीत ओलावा असताना करावी. दोन झाडांतील अंतर ५० सें.मी. ठेवावे. बियांपासून रोप तयार करण्यासाठी गिरिपुष्प झाडाच्या बिया उपलब्ध करून त्या ८ ते १० तास पाण्यात भिजत घालाव्या. त्यानंतर लाल माती, रेती आणि शेणखत यांचे १:१:१ या प्रमाणात मिश्रण तयार करून साधारण ५०० ग्रॅम मिश्रण प्लॅस्टिक पिशवीत भरावे व त्यामध्ये टोकन पद्धतीने लागवड करावी आणि नियमितपणे पाणी द्यावे. गिरिपुष्पाचे रोप तीन ते चार महिने वयाचे झाल्यानंतर पावसाळ्यात लागवड करावी. दोन झाडांतील अंतर साधारणपणे ५० सें.मी. ठेवावे. हे झाड वेगाने वाढत असल्यामुळे छाटणी करणे आवश्‍यक आहे. साधारणपणे एक वर्ष वयाचे झाल्याबरोबर छाटणी करावी. छाटणी करताना जमिनीपासून ६० ते ७५ सें.मी वरून करावी. या झाडाची छाटणी वर्षांतून तीन वेळा करावी. जून, नोव्हेंबर व मार्च या तीन महिन्यांत छाटणी केल्यानंतर हिरवी पाने व फांद्या बारीक कापून याचे मिश्रण तयार करावे व नंतर ते जमिनीत किंवा मातीत मिसळून द्यावे. यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते व त्या सोबत उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढून जमिनीचे जैविक, रासायनिक व भौतिक गुणधर्मांमध्ये अनुकूल बदल होतो. जमिनीची सुपीकता वाढते. तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. याचा फायदा रासायनिक खतांवर व ओलितावर होणारा खर्च कमी करता येतो.

ताग आणि धैंचा यांच्या तुलनेत या झाडांच्या पानामध्ये सर्वाधिक म्हणजे २.७३ टक्के नत्र असते.

गिरिपुष्पाची पाने (पाला) फळझाडांच्या आळ्यामध्ये, तसेच इतर पिकांत ओळीमध्ये आच्छादन म्हणून पसरून दिल्यास त्याचा फायदा होतो. आळ्यामध्ये तण वाढत नाही. पाण्याच्या पाळ्या कमी लागतात. कुजल्यानंतर अन्नद्रव्ये मिळतात; तसेच गिरिपुष्पाच्या पाल्यापासून उत्तमप्रकारे कंपोस्टखतसुद्धा बनविता येते.

गिरिपुष्पाची वैशिष्ट्ये:

गिरिपुष्पाची हिरवी पाने व कोवळ्या फांद्या उभ्या पिकासाठी वापरता येतात. भात पिकासाठी हेक्‍टरी दहा टन गिरिपुष्पाच्या फांद्यांचा वापर करून, नत्र खताच्या मात्रेत ५० टक्के बचत होते, असे संशोधनात्मक निष्कर्ष डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठात घेतलेल्या प्रयोगाने सिद्ध झाले आहे.

भात पिकासाठी शेणखत, कंपोस्टखत यांसारख्या सेंद्रिय खतांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात नसल्यास गिरिपुष्पाचा पाला हिरवळीचे खत म्हणून चांगल्याप्रकारे वापरता येऊ शकतो. गिरिपुष्पाच्या वापरामुळे जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारले जातात. 

भातशेतीत शेतकरी सेंद्रिय पदार्थांचा वापर फारच कमी प्रमाणात करतात. शेणखत, कंपोस्टखत यांसारख्या सेंद्रिय खतांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे गिरिपुष्पाचा हिरवळीचे खत म्हणून चांगल्याप्रकारे वापर करता येऊ शकतो

गिरीपुष्प वापराचे इतर फायदे:

१. गिरीपुष्प जमिनीत मुख्य अन्नद्रव्याबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्येही पुरविते.
२. जमिनीची धूप कमी होते.
३. निचरा वाढल्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी होते.
४. गिरीपुष्प जमिनीत कुजताना जी उष्णता निर्माण होते, त्या उष्णतेने जमिनीतील उपद्रवी किडींचा नायनाट होतो.
५. जमिनीत स्थिर झालेल्या स्फुरदाची उपलब्धता वाढते.


अशा पद्धतीने गिरीपुष्प ही एक अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे. ताग व धैंचा यापेक्षा त्यात अन्नद्रव्यांचे प्रमाण अधिक असते. सेंद्रिय खतांच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन या झाडांची डोंगर-उतारावर पडीक जमिनीत किंवा शेताच्या बांधावर प्रति १.८० मी. अंतरावर लागवड केल्यास हेक्‍टरी तीन टन हिरवळीचे पर्यायी खत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकते.



(Download Agrojay Mobile Application: http://bit.ly/Agrojay)


Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology