पालक लागवड

पालक लागवड Spinach planting

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)

पालक ही अतिशय लोकप्रीय पालेभाजी असून या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर करता येते. पालकातील पोषणमुल्‍ये लक्षांत घेतांं पालकाला भरपूर व सतत मागणी असते.

जमिन व हवामान :

पालकाचे पीक विविध प्रकारच्‍या जमिनीत घेता येते. खारवट जमिनीतही पालकाचे पीक चांगले येऊ शकते. ज्‍या खारवट जमिनीत इतर पिके येऊ शकत नाहीत तेथे पालक घेता येते.

पालक हे कमी दिवसांत तयार होणारे हिवाळी पीक असल्‍यामुळे महाराष्‍ट्रात कडक उन्‍हाळयाचे एक दोन महिने वगळून वर्षभर पालकाची लागवड करता येते. थंड हवामानात पालकाचे उत्‍पादन जास्‍त येऊन दर्जा चांगला राहतो. तर तापमान वाढल्‍यास पीक लवकर फूलो-यावर येते आणि दर्जा खालावतो.


जाती :

पालक ऑल ग्रिन, पुसा ज्‍योती, पुसा हरित या पालकाच्‍या भारतीय कृषी संशोधन संस्‍था नवी दिल्‍ली येथे विकसि‍त करण्‍यात आलेल्‍या सुधारित जाती आहेत. तसेच अनेक स्थानिक जातींचीही लागवड केली जाते.


लागवड :

महाराष्‍ट्रातील हवामानात पालकाची लागवड जवळ जवळ वर्षभर करता येते. खरीप हंगामातील लागवड जून – जूलैमध्‍ये आणि रब्‍बी हंगामातील लागवड सप्‍टेबर आक्‍टोबरमध्‍ये केली जाते. भाजीचा सतत पुरवठा होण्‍यासाठी १० ते १५ दिवसांच्‍या अंतराने हप्‍त्‍या हप्‍त्‍याने बियांची पेरणी करावी.

पालक हे कमी दिवसात तयार होणारे पीक असल्‍यामुळे जमिनीच्‍या मगदुरानुसार योग्‍य आकाराचे सपाट वाफे तयार करून बी फेकून पेरावे आणि नंतर बी मातीत मिसळून हलके पाणी द्यावे. जमीन भारी असल्‍यास वापसा आल्‍यावर पेरणी करावी. बी ओळीत पेरतांना दोन ओळीत २५-३० सेंटीमीटर अंतर ठेवावे. फार दाट लागवड केल्‍यास पिकाची वाढ कमजोर होवून पानांचा आकार लहान राहतो आणि पिकांचा दर्जा खालावतो. लागवडीपूर्वी बियाण्‍याला थायरम या बुरशीनाशकाची २ ग्रॅम दर किलो बियाण्‍याला या प्रमाणात प्रक्रिया करावी. त्‍यामुळे मर रोगाला प्रतिबंध होतो. पालकाच्‍या एक ऐकरी लागवडीसाठी १०-१२ किलो बियाणे लागते.


खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन :

पालक हे कमी कालावधीचे पीक असले तरी हिरव्‍या टवटवीत पानांवर पिकाचे उत्‍पादन व प्रतीक्षा अवलंबून असल्‍यामुळे पालकाच्‍या पिकाला नत्राचा मोठया प्रमाणावर वापर करावा लागतो. तसेच पिकाला पाण्‍याचा नियमित पुरवठा करुन जमिनीत ओलावा राखणे आवश्‍यक आहे.

पालकाच्‍या पिकाला जमिनीच्‍या मगदुरानुसार ऐकरी ८ गाडया शेणखत ३० किलो नत्र, १५ किलो स्‍फूरद आणि १५ किलो पालाश द्यावे. शेणखत पूर्वमशागतीच्‍या वेळी जमिनीत मिसळून द्यावे. संपूर्ण स्‍फूरद आणि पालाश १/३ नत्र पेरणीच्‍या वेळी द्यावे. उरलेले नत्र २ समान भागांत विभागातून पहिल्‍या आणि दुसरया कापणीच्‍या वेळी द्यावे. ज्‍या जातीमध्‍ये दोन पेक्षा जास्‍त कापण्‍या करता येतात तेथे प्रत्‍येक कापणीनंतर ऐकरी ८ किलो नत्र द्यावे.

पानातील हिरवेपणा अधिक चांगला येऊन उत्‍पादन वाढविण्‍यासाठी बी उगवून आल्‍यानंतर १५ दिवसानी आणि प्रत्‍येक कापणी नंतर १.५ टक्‍के युरिया फवारावा. बियांच्‍या पेरणीनंतर लगेच पाणी दयावे किंवा वापसा आल्‍यानंतर पेरणी करावी. त्‍यामुळे बियांची उगवण चांगली होते. त्‍यानंतर पिकाला नियमित पाणी दयावे. हिवाळयात पालकाच्‍या पिकाला १० ते १२ दिवसांच्‍या अंतराने पाणी द्यावे. काढणीच्‍या २-३ दिवस आधी पिकाला पाणी द्यावे. त्‍यामुळे पाने टवटवीत राहून पिकाचा दर्जा सुधारतो.


पीक संरक्षण :

पालकावर मावा, पाने कुरतडणारी अळी आणि भुंगेरे यांचा उपद्रव आढळतो. शिफारशीनुसार फवारण्या घेवून त्यांचे नियंञण करावे. काढणीच्‍या ८-१० दिवस अगोदर फवारणी करू नये.

पालकावर मर रोग, पानांवरील ठिपके, तांबेरा आणि केवडा या रोगांचा प्रादुर्भाव होतो. मर रोगामुळे उगवण झाल्‍यावर रोपांची मर होण्‍यास सुरुवात होते. हया रोगाच्‍या नियंत्रणासाठी पाण्‍याचा योग्‍य निचरा करावा आणि पेरणीपूर्वी बियाण्‍यावर थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. हवेतील आर्दता वाढल्‍यास पानांवर गोल करडया रंगाचे बांगडीच्‍या आकाराचे डाग पडतात. हया बुरशीजन्‍य रोगामुळे पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान होते. या रोगाच्‍या नियंत्रणासाठी ताम्रयुक्‍त बुरशीनाशकाची उदाहरणार्थ, कॉपर ऑक्सिक्‍लोराईड १० लिटर पाण्‍यात २० ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
केवडा आणि तांबेरा रोगांचा फारसा उपद्रव होत नाही आणि शेतातील ओलावा नियंत्रित ठेवल्‍यास या रोगांना आळा बसतो.


काढणी व उत्‍पादन  :

पेरणी नंतर सुमारे १ महिन्‍याने पालक कापणीला तयार होते. पालकाची पूर्ण वाढलेली हिरवी कोवळी पाने १५ ते ३० सेंटीमीटर उंचीची झाल्‍यावर पानांच्‍या देठाचा जमिनीपासून ५ ते ७.५ सेमी भाग ठेवून वरील भाग खुडून अथवा कापून घ्‍यावा आणि पानांच्‍या जूडया बाधाव्‍यात. त्‍यानंतर १५ दिवसाच्‍या अंतराने जातीनुसार ३-४ किंवा त्‍यापेक्षा जास्‍त खुडे करावेत. कापणी करतानांच खराब रोपे वेगळी काढून जुडया बांधाव्‍यात काढणीनंतर पालक लगेच बाजारात पाठवावा. जुडया उघडया जागेत रचून वरून झाकून घेऊन किंवा बांबूच्‍या टोपल्‍यामध्‍ये अगर पोत्‍यामध्‍ये व्‍यवस्थित रचून भरून विक्रीसाठी पाठवाव्‍यात. टोपलीच्‍या खाली आणि वर कडुनिंबाचा पाला ठेवल्‍यास पालक लागवडीसाठीवकर खराब होत नाही. वाहतुकीस जुडयांवर अधून-मधून थंड पाणी शिंपडल्‍यामुळे पानांचा तजेलदारपणा टिकून राहतो. मात्र पाणी जास्‍त झाल्‍यास सडण्‍याची क्रिया सुरु होते. म्‍हणून जुडयांवर जास्‍त प्रमाणात पाणी मारु नये. पालकाचे उत्‍पादन पिकाच्‍या लागवडीची वेळ, जात, खुडे आणि पिकाची योग्‍य काळजी यांवर अवलंबून असते. सर्वसाधारण्‍पणे एकरी ४ ते ५ टन एवढे उत्‍पादन मिळते.

(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)




Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology