गलांडा लागवड तंत्र
गलांडा लागवड तंत्र
गलांडा फुलास ‘गेलार्डिया’ या नावानेही ओळखतात. या फुलझाडाची तीन-चार टप्प्यांत लागवड केल्यास वर्षभर फुले मिळू शकतात. फुलातील भरपूर पाकळ्या, फुलांचा आकर्षक आकार, रचना व रंग आणि टिकाऊपणा या गुणांमुळे गलांडाच्या फुलांचा हार, गुच्छ तसेच लग्न समारंभात विविध कार्यक्रमांत सजावटीसाठी आणि सणासुदीला आरास करण्यासाठी उपयोग केला जातो. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सातारा, ठाणे, अकोला, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत गलांडाची लागवड आढळून येते.
हवामान :
गलांडाच्या पिकाला उष्ण व दमट हवामान चांगल्या प्रकारे मानवते. तसेच हे पीक काटक असल्यामुळे हवामानातील बदल सहन करते. फुलांच्या अधिक उत्पादनाकरिता मोकळी हवा, मध्यम तापमान आणि भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. या पिकाच्या वाढीसाठी २० ते ३५ अंश सेल्सिअस तापमान उत्तम असते. सावलीतील जागा, अतिपर्जन्यवृष्टी, कडक थंडी (१० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान) असलेल्या ठिकाणी फुलझाडाची वाढ चांगली होत नाही. मात्र अवर्षण व उष्ण हवामान यासारख्या परिस्थितीवर हे पीक मात करू शकते.
या पिकासाठी हलकी ते मध्यम तसेच उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. साधारणपणे जमिनीचा सामू ५ ते ८ च्या दरम्यान असावा. मध्यम पोयट्याची जमीन लागवडीसाठी योग्य असते. पाणी साचणारी, क्षारयुक्त जमीन या पिकास मानवत नाही.
पूर्वमशागत :
लागवडीपूर्वी जमीन उभी-आडवी नांगरून हेक्टरी २५ ते ३० गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकून वखराच्या २-३ पाळ्या द्याव्यात. जमीन भुसभुशीत करावी. जमीन तयार झाल्यावर सपाट वाफे किंवा सरी वाफे तयार करावेत.
जाती :
गलांडामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात - १) पिक्टा, २) लॉरेझियाना.
१) पिक्टा : या प्रकारातील फुले मोठ्या आकाराची, पण एकेरी पाकळ्यांची असतात. यामध्ये इंडियन चीफ रेड, डॅझलर, टेट्रा फियस्टा, पिक्टा मिक्स्ड इत्यादी जातींचा समावेश होतो.
२) लॉरेझियाना : या प्रकारातील फुले मोठी, दुहेरी पाकळ्यांची असतात. या प्रकारात रॅगालीस, सरमुनी, सनशाईन, गोरटी डबल मिक्स्ड, डबल टेट्राफियस्टा इत्यादी जातींचा समावेश होतो. याशिवाय गलांडा ग्रॅडिफ्लोरा या प्रकारातील जाती बहुवर्षायू असून, त्यामध्ये सन गॉड, वरगंडी, रूबी, वारिअर इत्यादी जाती आहेत.
खत व पाणी व्यवस्थापन :
लागवडीपूर्वी प्रतिहेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. गलांडाच्या पिकाला हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश ही खते द्यावीत. त्यापैकी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी, तर उरलेले अर्धे नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे. लागवडीनंतर पाण्याच्या दोन पाळ्या लवकर - लवकर द्याव्यात. पावसाळ्यात पाऊस नसताना ओलित करणे आवश्यक आहे. हिवाळी हंगामात १० ते १२ आणि उन्हाळी हंगामात ५ ते ६ दिवसांच्या अंतराने ओलित करावे. झाडांची वाढ एकसारखी होत राहील. मात्र आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी होऊ देऊ नये. सुरवातीला गलांडाची वाढ पसरट असते. मात्र पुढे-पुढे त्याची वाढ ही उभट होते.
कीड आणि रोग व्यवस्थापन :
गलांडाच्या पिकावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव फार कमी प्रमाणात आढळतो; परंतु काही वेळा मावा, फुलकिडे आणि पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. या किडींच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावसाळ्यात मूळकूज तसेच मर रोग आढळून आल्यास कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, तसेच रोगग्रस्त झाडाच्या बुडाशी हे द्रावण ओतावे.
काढणी आणि उत्पादन :
रोपांच्या लागवडीपासून साधारणतः ५० ते ६० दिवसांत गलांडाला फुले येण्यास सुरवात होते आणि त्यानंतर १८ ते २५ दिवसांत फुले तोडणीला येतात. पुढे जवळजवळ १० ते १२ आठवडे तोडणीचा हंगाम चालू राहतो. फुलांची तोडणी करताना १० ते १५ सें.मी. लांबीच्या दांड्यासह फुले झाडावरून छाटून घ्यावीत. अशा प्रकारे तोडणी केलेल्या फुलांची प्रतवारी करून चांगली सुटी फुले किंवा १० ते १२ फुलांची एक जुडी या प्रमाणात ३०० ते ४०० जुड्या एका करंडीत भरून नंतर विक्रीसाठी बाजारात पाठवाव्यात. साधारणपणे गलांडाच्या एका झाडापासून २५ ते ३० फुले मिळतात. एक हेक्टर क्षेत्रामधून ५ ते ७ टन फुलांचे उत्पादन मिळू शकते.
Comments
Post a Comment