उसावरील रोग व त्यावरील उपाय

उसावरील रोग व त्यावरील उपाय

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)


चाबूक काणी :

चाबूक काणी हा रोग युस्टिलॅगो सायटॅमिनी बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होते. हा रोग उसाचे को - ७४० या जातीवर जास्त प्रमाणत आढळतो. ऊस पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत हा रोग दिसून येतो. या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे रोगग्रस्त उसाचे शेंड्यातून चकचकीत चंदेरी रंगाचा चाबकाप्रमाणे निमुळता होत जाणारा पट्टा बाहेर पडतो. लवकरच पट्ट्यावरील चंदेरी आवरण फाटते व आतील काळा भाग उघडा होतो. हा काळा भाग म्हणजे बुरशीचे बीजाणू होत. हे बीजाणू हवेद्वारे विखुरतात व निरोगी उसाचे डोळ्यावर पडतात. त्यावर रोगाचा प्रादुर्भाव होतो. अशा तर्हेने रोग शेतात पसरतो. काणी रोगामुळे उसाची वाढ खुंटते, ऊस बारीक होतो, पाने अरुंद व लहान होतात, त्यामुळे उत्पादनात घट येते.लागवडीच्या उसापेक्षा खोडव्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. या रोगाचा प्रसार बेण्याद्वारे आणि हवेद्वारे होतो.

नियंत्रणाचे उपाय :

१) रोगग्रस्त उसाचा बेण्यासाठी वापर करू नये. निरोगी बेणे वापरावे.२) लागवडीच्या उसात काणी रोगाचा प्रादुर्भाव ५ टक्क्यापेक्षा जास्त असेल तर अशा उसाचा खोडवा घेऊ नये.३)रोग प्रतिकारक वाणांचा वापर करावा.४) ३ ते ४ वर्षानंतर बेणे बदलावे.५) शेतात कणीचा पट्टा दिसताच तो प्लॅस्टिकच्या पिशवीत अलग कापून घ्यावा, संपूर्ण बेट मुळासकट उपटून काढावे व जाळून नष्ट करावे.६) लागवडीपूर्वी उसाचे बेणे १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम व १०० लिटर पाणी या द्रावणात १० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.
७) लागवडीसाठी रोगप्रतिकारक जातीचा वापर करावा. उदा. कोव्हीएसआर-९८०५.

गवताळ वाढ :

हा रोग मायाकोप्लाझ्मा नावाच्या विषाणूपासून होतो. याचे प्रमुख लक्षण म्हणजे उसाचे बुंध्याकडील बाजूस असलेल्या डोळ्यातून असंख्य फुटवे येतात व त्याला गवताच्या थेंबाचे स्वरूप येते. फुटवे रंगाने पिवळसर पांढरट असून त्याची पाने अरुंद व लहान असतात. हा रोग बेण्याद्वारे, ऊस कापणीच्या कोयत्याद्वारे आणि मावा किडीद्वारे पसरतो.

नियंत्रणाचे उपाय :

१) लागवडीसाठी निरोगी बेण्याचा वापर करावा.२) उष्णजल किंवा बाष्पउष्ण हवा प्रक्रिया देऊन तयार केलेल्या बेणे मळ्यातील बेणे नवीन लागवडीसाठी वापरावे.३) रोगट उसाचा खोडवा ठेवू नये.४) मावा किडीद्वारे या रोगाचा प्रसार होत असल्यामुळे मावा किडीचे किटकनाशकाद्वारे नियंत्रण करावे.५) गवताळ वाढीचे बेणे मुळासकट काढून नष्ट करावे.६) बेणे लागवडीपूर्वी ५०० किंवा १००० पीपीएम लिंडरमायसीनमध्ये बुडवून लावावे.७) लागवडीकरिता रोगप्रतिकारक जातींची निवड करावी.उदा. कोव्हीएसआर-९८०५, कोव्हीएसआर-४९४.

गाभा रंगणे (लाल कांडी) :

गाभा रंगणे हा रोग कोलिटोट्रायकम फालकॅटम या बुरशीचे प्रादुर्भावामुळे होतो. सुरुवातीच्या अवस्थेत हा रोग ओळखता येत नाही, परंतु पावसाळयानंतर जेव्हा उसाची वाढ थांबून साखर तयार होण्याचे प्रक्रियेस सुरुवात होते तेव्हा या रोगाची लक्षणे दिसून येतात. रोगग्रस्त उसाचे शेंड्यापासून तिसरे अथवा चवथे पान निस्तेज पडून वाळते व नंतर पूर्ण शेंडा वाळतो. रोगग्रस्त ऊस लांबीतून उभा कापला असता आतील गाभा लाल झालेला आढळून येतो. त्यात अधून - मधून आडवे पांढरे पट्टे दिसतात. कालांतराने ऊस पोकळ होतो, आकसतो व सालीवर सुरकुत्या पडतात. अशा उसाला अल्कोहोलसारखा वास येतो. या रोगाचा प्रसार बेण्याद्वारे होतो.

नियंत्रणाचे उपाय :

१) लागवडीसाठी निरोगी बेण्याचा वापर करावा.२) उष्णजल किंवा बाष्पयुक्त हवा प्रक्रिया देऊन तयार केलेल्या बेणे मळ्यातील बेणे नवीन लागवडीसाठी वापरावे.३) लागवडीपूर्वी उसाचे बेणे कार्बेन्डिझम १०० ग्रॅम बुरशीनाशक १०० लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणात १० ते १५ मिनिटे बुडवून लागवड करावी.४) ऊस कापण्याचा कोयतासुद्धा निर्जंतूक करून घ्यावा.५) रोगग्रस्त शेतातील उसाचा कापणी शक्य तेवढ्या लवकर करवी. रोगग्रस्त उसाचा खोडवा घेऊ नये.६) ऊस कापणीनंतर त्या शेतात नवीन ऊस लागवड करू नये. पिकाची फेरपालट करवी.७) कापणीनंतर शेतातील पाचाट, वाळा, धसकटे इत्यादी जागेवरच जाळून नष्ट करवीत.८) उसाला पाणी कमी द्यावे.९) ज्या भागात रोगाचा प्रादूर्भाव झालेला असेल, तेथे ३ ते ४ वर्षे उसाचे पीक घेऊ नये.१०) पिकांची फेरपालट करावी.११) रोगप्रतिकारक जातीची लागवड करावी. उदा. को-७३१४, को-५७६७

उसावरील मर :

हा रोग फ्युजेरियम मोनिलीफॅरमी व सेफॅलोस्पोरीयम सॅफॅरी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव देठ कुजव्या किंवा मुळे पोखरणार्‍या अळीच्या संयोगाने मोठ्या प्रमाणात होतो. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या उसाची पाने पिवळसर व निस्तेज होतात आणि नंतर वळतात . शेवटी प्रादुर्भाव वाढल्यास ऊस पुर्णपणे वाळतो, पोकळ होतो व वजनाला हलका भरतो. मुळ्य कुजतात, ऊस अलगपणे उपटून येतो. ऊस कांड्याचे समान दोन भाग केलेल्या कांड्याचा आतील भाग करड्या रंगाचा व लालसर पडलेला दिसतो आणि बराचसा भाग तंतुमय झालेला दिसतो.

नियंत्रणाचे उपाय :

१) निरोगी बेणे वापरावे.२) रोगट उसाच खोडवा ठेवू नये.३) मुळे पोखरणार्‍या किडीचा बंदोबस्त करावा.४) फेरपालटीची पिके घ्यावीत.५) प्रादुर्भाव झालेल्या शेतातील बेणे वापरू नये.६) रोगट उसाचे अवशेष गोळा करून त्यांचा नायनाट करवा.

पोक्का बोईंग (पोंगा कुजणे) :

हा रोग फ्युजेरियम मोनिलीफॉरमी या बुरशीपासून होतो. पोक्का बोईंग याचा अर्थ शेंड्याजवळील पानाचा आकार बदलणे किंवा पोंगा कुजणे असा होतो. अलिकडे या रोगाची लागण महाराष्ट्रात दिसून आली आहे. पोक्का बोईंग रोगाची लक्षणे सर्वप्रथम पोंग्याजवळील पानावर दिसतात. सुरुवातीला देठाजवळ पाने पिवळी पडतात. रोगाची तीव्रता वाढल्यास पानावर सुरकुत्या पडतात. पाने अंकुचित होतात आणि शेंडा व पोंगा कुजतो. उसाची वाढ खुंटते, कांड्या आखूड होतात. काही वेळेस फांद्याही फुटातात. उसाची पाने एकमेकात गुंतलेली असतात. या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो.

नियंत्रणाचे ऊपाय :

१) २० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा २० ग्रॅम मॅन्कोझेब अथवा १० ग्रॅम कार्बेन्डिझम यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.२) उसाची लागवड लवकर करावी. उशीरा म्हणजे एप्रिल - मी मध्ये उसाची लागवड करू नये.

पायनापल (अननस रोग) :

हा बुरशीमुळे होणारा रोग आहे. सेरॅटोसिस्टिम पॅराडॉंक्सा या बुरशीमुले उसावर हा रोग होतो. हा रोग प्रामुख्याने जमिनीद्वारे पसरतो. म्हणून ऊस लागवड झाल्यानंतर याचा प्रादुर्भाव आढळून येतो. क्वचितच जर उंदीरामुळे, किडीमुळे अथवा अवजारामुळे असास इजा झाली असेल तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव उभ्या उसावर दिसून येतो. रोगजंतू इजा झालेल्या भागांवर शिरकाव करून उभ्या उसावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास रोगग्रस्त बेणे उगवत नाही. कारण रोगजंतू कांडीतील अन्नांश स्वत:साठी उपयोगात आणतात. त्यामुळे उगवणीवर विपरीत परिणाम होतो. प्रादुर्भाव झालेल्या ऊसाकांडीचे निरीक्षण केले असता कांडी वजनाला हलकी व करड्या रंगाची होऊन कुजलेल्या अवस्थेत दिसते. कांडीचे उभे दोन भाग केल्यास आतील भाग गडद लाल ते काळ्या रागाचा झालेला दिसतो. आतील तंतुमय भाग मोकळा होऊन कांडी पोकळ होते. कांडीवरील डोळे कुजतात. त्यामुळे उसाची उगवण होन नाही आणि उगवण झाली तर ते रोप जास्त काळ जगत नाही. उगवलेल्या उसात रोगाची तीव्रता वाढल्यास प्रथम पाने वाळतात व नंतर संपूर्ण रोप वळते. रोगट उसाचे कांड्याचा वास अननस फळाच्या वासासारखा येतो. म्हणून याला 'अननस रोग' म्हणतात. हा रोग मुख्यत्वेकरून खोलवर लागण केल्यास किंवा पाण्याचा निचरा होत नसलेल्या जमिनीत ऊस लागण केल्यास आढळतो.

नियंत्रणाचे उपाय :

१) निरोगी बेणे वापरावे.२) लागवडीपूर्वी बेणे १०० ग्रॅम कार्बेन्डिझम बुरशीनाशक अथवा १०० ग्रॅम बेलेटॉंन बुरशीनाशक १०० लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात १० मिनिटे बुडवून लागवड करावी.३) उसाची खोल लागवड करू नये.४) जमीन निचरायुक्त असावी.

केवडा (लोह कमतरता) :

उसावरील केवडा हा रोग लोह या अन्नद्रव्याचे कमततेमुळे दिसून येतो. गावठाण किंवा पांढरीच्या जमिनीत तसेच पोयट्याच्या जमिनीत याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो. कारण अशा जमिनीत कॅल्शियम व मॅग्नेशियमयुक्त क्षाराचे प्रमाण अधिक असल्यामुळे लोह या अन्नद्रव्याची उपलब्धता कमी असते. त्यामुळे उसावर केवडा रोग दिसून येतो. रोगाचे सुरुवातीला उसाच्या शेंड्याकडील पाने पिवळी पडू लागतात. प्रथम पानाच्या शिराकडील भाग पिवळा पडतो. नंतर शिरांचा हिरवेपणा नष्ट होऊन संपूर्ण पान पिवळे होते. पीक निस्तेज दिसू लागते. प्रादुर्भाव तीव्र स्वरूपाचा असल्याने पाने पूर्णपणे पांढरट होतात आणि केवड्याच्या पानाप्रमाणे दिसू लागतात. रोगग्रस्त उसाची उंची कमी असते. खोडव्यामध्ये सुरूवातीपासून याचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

नियंत्रणाचे उपाय :

१) हिरवळीची पिके घ्यावीत.२) गंधकयुक्त खताचा वापर करवा.३) चुनखडीयुक्त जमिनीत उसाची लागवड करू नये.४) हेक्टरी २.५ किलो हिराकस (फेरस सल्फेट) ५०० लिटर पाण्यात मिळसून १० ते १२ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या कराव्यात.५) हिरवळीची पिके घ्यावीत. गंधकयुक्त खताचा वापर करावा.६) उसाची लागवड चुनखडीच्या जमिनीत करू नये.७) हेक्टरी १० किलो हिराकस कम्पोस्ट किंवा शेणखतात मिसळून लागवडीपूर्वी जमिनीत टाकावे.

तांबेरा :

हा रोग ‘पकसीनिया’ नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाची प्रमुख लक्षणे हिवाळ्यात दिसतात. पानांवर तांबड्या रंगाचे पुरळ दिसतात व त्यातून लालसर धूरिकरण बाहेर पडतात.

नियंत्रणाचे ऊपाय :

१) ऊस पिकाला पाणी बेताने द्यावे व या रोगाचा प्रादूर्भाव झालेल्या पिकाचा खोडवा घेऊ नये.२) या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगप्रतिबंधक जातीची निवड करावी. उदा. को-६३१९८, को-७२१९.



(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)



Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology