उन्हाळी बाजरी लागवड Summer millet cultivation
उन्हाळी बाजरी लागवड Summer millet cultivation
Agrojay Innovations Pvt. Ltd.
(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)
उन्हाळ्यात रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्याने संरक्षित पाण्याची सोय असल्यास बाजरीपासून चांगले उत्पादन मिळवणे शक्य आहे. त्यासाठी योग्य नियोजन करावे.
खरिपातील बाजरी पिकापासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने पीक पद्धतीत बदल करीत उन्हाळी बाजरी लागवड करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये खानदेश, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागात उन्हाळी बाजरी घेतली जाते. या काळात उन्हाळ्यात हवामान कोरडे असल्याने अरगट, गोसावी, तांबेरा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो. त्यामुळे धान्य व चाऱ्याची गुणवत्ता चांगली मिळते. संरक्षित पाण्याची सोय असल्यास शेतकऱ्यांच्या फायद्यात वाढ होते.
जमिनीची निवड :
- उन्हाळी बाजरीसाठी शक्यतो सपाट मध्यम ते भारी व 6.2 ते 8 सामू असणारी निवडावी.
- लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. दुसऱ्या कुळवाच्या पाळीच्या अगोदर चांगले कुजलेले हेक्टरी चार ते पाच टन शेणखत वापरावे. जमीन भारी असल्यास ओलावा जास्त काळ टिकून राहतो.
संकरित वाण :
उन्हाळी बाजरी फुलोऱ्यात येण्याच्या कालावधीमध्ये वाऱ्याचा वेग व तापमान जास्त असल्याने काही वाणांमध्ये परागीकरणाला अडचण येते. कणसात दाणे कमी भरतात. श्रद्धा, सबुरी असे अधिक उत्पादन देणारे तसेच केसाळ प्रकारातील अतिशय घट्ट कणीस असणारे वाण निवडल्यास पक्ष्यांचा त्रासही कमी होतो.
सुधारित वाण : आय.सी.टी.पी. 8203, डब्ल्यू.सी.सी. 75 इत्यादी.
लागवड :
- संकरित बाजरीचे प्रमाणित बियाणे हेक्टरी चार ते पाच किलो वापरावे. पेरणीपूर्वी प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोस्पिरोलिअम या जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी. शेत ओलावून वाफसा आल्यावर पेरणी करावी. पेरणी तीन ते चार सें.मी.पेक्षा जास्त खोल करू नये. बाजरीची पेरणी जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात ते फेब्रुवारी दुसऱ्या पंधरवड्यात केल्यास फायदेशीर ठरते.
- पेरणीस उशीर झाल्यास पीक जात किंवा वाणाप्रमाणे 50-55 दिवसांनी फुलोऱ्यात येते. अशावेळी तापमान 42 अंश से.पेक्षा अधिक असल्यास परागकण मरतात व उत्पादनात घट होण्याची शक्यता असते.
अंतर : उन्हाळी बाजरी पेरताना दोन ओळींतील अंतर 30 ते 40 सें.मी. व दोन रोपांतील अंतर 10 ते 15 सें.मी. ठेवावे. नंतर गरजेप्रमाणे विरळणी करून एका ठिकाणी एकच रोप ठेवावे.
खत व्यवस्थापन :
माती परीक्षणानुसार प्रति हेक्टरी 60 किलो नत्र व 30 किलो स्फुरद द्यावे. यातील निम्मे नत्र पेरणीच्या वेळी व संपूर्ण स्फुरद, तर उर्वरित नत्र पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे. तसेच पेरणी नंतर बाजरीचे शेत पहिले 30 ते 35 दिवस तणविरहित ठेवावे.
पाणी व्यवस्थापन :
जमिनीच्या मगदुराप्रमाणे 10 ते 15 दिवसांनी पाणी द्यावे. पिकास पुढील पीक वाढीच्या संवेदनाक्षम अवस्थेत पाणी दिल्यास चांगले उत्पादन मिळते.
1) पहिले पाणी 20 ते 25 दिवसानंतर : फुटवे येण्याचे वेळी.
2) दुसरे पाणी 35 ते 45 दिवसांनी : पीक पोटरीत असताना.
3) तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी : कणसात दाणे भरते वेळी.
पाण्याच्या दुसऱ्या पाळी अगोदर पिकास हलकीशी भर दिल्यास, जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते व पीक जास्त वाऱ्यावर लोळत नाही.
उत्पादन :
उन्हाळी बाजरीची हेक्टरी रोप संख्या योग्य प्रमाणात राखल्यास व योग्य वाणाची निवड केल्यास संकरित बाजरीचे उत्पादन चांगले मिळत. याचा हिरवा चारा जनावरांना चांगला मानवतो.
Agrojay Innovations Pvt. Ltd.
Comments
Post a Comment