टोमॅटो पिकाची लागवड Planting of tomato crop

टोमॅटो पिकाची लागवड Planting of tomato crop

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)

प्रस्‍तावना :

महाराष्‍ट्रात टोमॅटो लागवडी अंदाजे 29190 हेक्‍टर क्षेत्र आहे. नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली हेक्‍टरी महाराष्‍ट्रातील टोमॅटो पिकवणारे महत्‍वाचे जिल्‍हे आहेत. तीनही म्‍हणजे खरीप, रब्‍बी उन्‍हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येत असल्‍यामुळे टोमॅटो हे महाराष्‍ट्रातील शेतक-यांचे प्रमुख फळपिक आहे. टोमॅटो मध्‍ये शीर संरक्षक अन्‍नघटक मोठया प्रमाणात उपलब्‍ध असल्‍यामुळे टोमॅटोचे आहारातील महत्‍व अनन्‍य साधारण आहे. टोमॅटो अ, ब आणि क जीवनसत्‍वे तसेच खनिजे, लोह इत्‍यादी पोषक अन्‍नद्रव्‍येही टोमॅटो मध्‍ये पुरेशा प्रमाणात असतात.

टोमॅटोची कच्‍ची अथवा लाल रसरशीत फळे भाजी किंवा कोशिंबीरीसाठी वापरली जातात. तसेच टोमॅटोच्‍या पिकलेल्‍या फळांपासून सुप, लोणचे, सॉस, केचप, जाम, ज्‍युस इत्‍यादी पदार्थ बनविता येतात. यामुळे टोमॅटोचे औद्योगिक महत्‍व वाढलेले आहे.

हवामान :

टोमॅटो हे उष्‍ण हवामानातील पिक असले तरीही महाराष्‍ट्रात टोमॅटोची लागवड वर्षभर केली जाते. अति थंडी पडल्‍यास टोमॅटोच्‍या झाडाची वाढ खुंटते. तापमानातील चढउताराचा फळधारणेवर अनिष्‍ट परिणाम होतो. 13 ते 38 सेल्सियस या तापमानास झाडाची वाढ चांगली होती. फूले आणि फळे चांगली लागतात. रात्रीचे तापमान 18 ते 20 सेल्सियस दरम्‍यान राहिल्‍यास टोमॅटो ची फळधारणा चांगली होते. फळांना आकर्षक रंग आणणारे लायकोपिन हेक्‍टरी रंगद्रव्‍य 26 ते 32 सेंटिग्रेडला तापमान असताना भरपूर प्रमाणात तयार होते. तापमान, सुर्यप्रकाश आणि आद्रता यांचा एकत्रित परिणाम पिकाच्‍या वाढीवर होतो. 20 ते 32 अंश सेल्सिअस तापमान, 11 ते 12 तास स्‍वच्‍छ सुर्यप्रकाश आणि 60 ते 75 टक्‍के आर्द्रता असेल त्‍यावेळी टोमॅटो पिकाचे चांगले उत्‍पादन मिळते.


जमीन :

टोमॅटो पिकासाठी मध्‍यम ते भारी जमिन लागवडी योग्‍य असते. हलक्‍या जमिनीत फळे लवकर तयार होतात, पाण्‍याचा निचरा चांगला होतो. आणि पिकांची वाढ चांगली होते. परंतु अशा जमिनीत सेंद्रीय खतांचा भरपूर पुरवठा करावा लागतो आणि वारंवार पाणी देण्‍याची सोय असावी लागते. जमिनीचा सामू मध्‍यम प्रतिचा म्‍हणजे 6 ते 8 असावा.


पूर्वमशागत :

शेतास उभी आडवी नांगरणी देऊन नंतर ढेकळे फोडून वखरणी द्यावी. जमिनीत हेक्‍टरी 30 ते 40 गाडया शेणखत मिसळावे लागवडीसाठी 2 ओळीतील अंतर 60 ते 90 सेमी व दोन रोपातील अंतर 45 ते 60 सेमी ठेवावे. खरीप व हिवाळी हंगामासाठी 90 बाय 60 सेमी अंतरावर व उन्‍हाळी हंगामासाठी 60 बाय 45 सेमी अंतरावर लागवड करावी.


हंगाम :

खरीप – जून, जूलै महिन्‍यात बी पेरावे.

रब्‍बी ( हिवाळी हंगाम) सप्‍टेबर, ऑक्‍टोबर मध्‍ये महिन्‍यात बी पेरावे.
उन्‍हाळी हंगाम – डिसेंबर, जानेवारी महिन्‍यात बी पेरावे
बियाण्‍याचे प्रमाण – हेक्‍टरी टोमॅटो पिकाचे 400 ते 500 ग्रॅम बी लागते.

सुधारीत वाण :

महाराष्‍ट्रात लागवडीच्‍या दृष्‍टीने उपयुक्‍त टोमॅटोचे वाण खालीलप्रमाणे आहे.
पुसा रूबी : तीनही हंगामात घेता येते. लागवडीनंतर 45 ते 90 दिवसांनी फळे काढणीस येतात. फळे मयम चपटया आकाराची गर्द लाल रंगाची असतात. 
पुसा गौरव : ही जात झुडूप वजा वाढणारी आहे. फळे लांबट गोल पिकल्‍यावर पिवळसर लाल रंगाची होतात. वाहतूकीस योग्‍य आहे. 
पुसा शितल : हिवाळी हंगामासाठी लागवडीस योग्‍य जात असून फळे चपटी गोल लाल रंगाची असतात.
अर्का गौरव : फळ गडद लाल मांसल व टिकावू असतात.
रोमा : झाडे लहान व झाुडपाळ असून फळे आकाराने लांबट व जाड साल असल्‍याने वाहतूकीस योग्‍य आहे. 
रूपाली, वैशाली, भाग्‍यश्री, अर्का विकास, पुसा अर्ली डवार्फ इ. जातीची लागवड केली जाते.

लागवड :

रोपे तयार करण्‍यासाठी बियांची पेरणी गादी वाफयावर करावी. गादी वाफा तयार करण्‍यापूर्वी जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्‍या 2, 3 पाळया देऊन जमिन भुसभूशीत करावी. गादी वाफा हा 1 मी. रूंद 3 मी लांब व 15 सेमी उंच असावा. गादी वाफयात 1 घमेले शेणखत 50 ग्रॅम सुफला मिसळावे व वाफा हाताने सपाट करावा. पेरणीपूर्वी बियाण्‍यास 3 ग्रॅम थायरम बुरशीनाशक औषध चोळावे. बियांची पेरणी ही वाफयाच्‍या रूंदीस समांतर बोटांनी रेघा ओढून त्‍यात पातळ पेरणी करून बी मातीने झाकून टाकावे. वाफयास झारीने पाणी द्यावे. बी उगवून आल्‍यानंतर 10 ते 12 दिवसांनी दोन ओळीत काकरी पाडून प्रति वाफयास 10 ग्रॅम फोरेट द्यावे. वाफे हे तणविरहीत ठेवावेत. फूलकिडे व करपा रोगाच्‍या नियंत्रणाकरिता 10 लिटर पाण्‍यात 12 ते 15 मिली मोनोक्रोटोकॉस व 25 ग्रॅम डायथेन एम 45 मिसळून बी उगवल्‍यानंतर 15 दिवसांनी फवारावे. नंतरच्‍या दोन फवारण्‍या 10 दिवसाच्‍या अंतराने कराव्‍यात. बी पेरणीं पासून 25 ते 30 दिवसांनी म्‍हणजे साधारणतः रोपे 12 ते 15 सेमी उंचीची झाल्‍यावर रोपांची सरी वरंब्‍यावर पुर्नलागवड करावी. रोपे उपटण्‍यापूर्वी एक दिवस आधी वाफयांना पाणी द्यावे. त्‍यामुळे रोपांची मुळे न तुटता रोपे सहज उपलब्‍ध होतात. रोपांची पुर्नलागवड नेहमी संध्‍याकाळी किंवा उन कमी झाल्‍यावर करावी.


रासायनिक खते :

सरळ वाणांसाठी 200-100-100 व संकरीत वाणांसाठी 300-150-150 किलो नत्र, स्‍फूरद पालाश या प्रमाणात खत द्यावे. अर्धा नत्र लागवडीच्‍या वेळी व उरलेला लागवडीनंतर 40 दिवसांनी द्यावे.


पाणी व्‍यवस्‍थापन :

रोपांच्‍या लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांनी हलके पाणी द्यावे. आणि त्‍यानंतर 8 ते 10 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पावसाळयात टोमॅटो पिकास 8 ते 10 दिवसांच्‍या अंतराने तर हिवाळी हंगामात 5 ते 7 दिवसांच्‍या अंतरानी व उन्‍हाळी हंगामात 3 ते 4 दिवसांच्‍या अंतरानी रोपांना पाणी द्यावे. भारी काळया जमिनीत नेहमी हलके पाणी द्यावे. पिक फूलावर असताना व फळांची वाढ होत असताना नियमित पाणीपुरवठा होणे महत्‍वाचे आहे. अन्‍यथा फूलगळ, फळे तडकणे, या सारख्‍या नुसकानी संभवतात. उन्‍हाळयात टोमॅटो पिकाला पारंपारिक पध्‍दतीने पाणी दिल्‍यास 77 हेक्‍टर सेमी पाणी लागते. तर ठिबक सिंचनाने पाणी दिल्‍यास 56 हेक्‍टर सेमी पाणी लागते. ठिबक सिंचनामुळे पाण्‍याची 50 ते 55 टक्‍के बचत होऊन उत्‍पन्‍नात 40 टक्‍के वाढ होते.


आंतरमशागत :

नियमित खुरपणी करून तण काढून टाकावेत. खुरपणी करताना मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्‍यावी. जेणेकरून त्‍याचा उत्‍पन्‍नावर विपरीत परिणाम होऊ शकतो.


बागेला वळण आणि आधार देणे :

टोमॅटो पिकाचे खोड व फांद्या कमकुवत असतात त्‍यामुळे त्‍यांना आधाराची आवश्‍यकता असते. आधार दिल्‍यामुळे झाडांची आणि फांद्यांची वाढ चांगली होते. फळे भरपूर लागतात. फळे, पाने आणि फांद्या यांचा जमिनीशी व पाण्‍याशी संपर्क येत नाही. त्‍यामुळे फळे सडण्‍याचे आणि रोगाचे प्रमाण कमी होते. खते देणे, फवारणी करणे, फळांची तोडणी करणे इ. कामे सुलभतेने करता येतात. टोमॅटोच्‍या झाडांना दोन प्रकारे आधार देता येतो. 1. प्रत्‍येक झाडाजवळ दिड ते दोन मीटर लांबीची व अडिच सेमी जाडीची काठी रोवून झाडाच्‍या वाढीप्रमाणे काठीला बांधत जावे. 2. या प्रकारात तारा आणि बांबू किंवा काठयांचा वापर करून ताटी केली जाते.आणि ताटयांच्‍या आधारे झाडे वाढविली जातात. सरीच्‍या बाजूने प्रत्‍येक 10 फूट अंतरावर पहारीने दर घेऊन त्‍यात दिड ते दोन मीटर उंचीच्‍या आणि अडिच सेमी जाडीच्‍या काठया घटट बसवाव्‍यात सरीच्‍या दोन्‍ही टोकांना जाड लाकडी दाम बांधाच्‍या दिशेने तिरपे रोवावेत. प्रत्येक डांबाच्‍या समोर जमिनित जाड खुंटी रोवून डाम खुंटीशी तारेच्‍या साहायाने ओढून बांधावेत. त्‍यानंतर 16 गेज ची तार जमिनीपासून 45 सेमी वर एका टोकाकडून बांधत जाऊन प्रत्‍येक काठीला वेढा आणि ताण देऊन दुस-या टोकापर्यंत ओढून घ्‍यावे अशा प्रकारे दुसरी 90 सेमी वर व तिसरी 120 सेमी अंतरावर बांधावी. या तारेंना रोपांच्‍या वाढणा-या फांद्या सुतळी किंवा नॉयलॉनच्‍या दोरीने बांधाव्‍यात. टोमॅटोचे खोंड मजबूत करण्‍यासाठी झाडाला वळण देणे आवश्यक असते.


रोग :

करपा : हा रोग झाडाच्‍या वाढीच्‍या कोणत्‍याही अवस्‍थेत येऊ शकतो. रोगामध्‍ये पाने देठ खोड यावर तपकिरी गुलाबी ठिपके पडतात.
उपाय : डायथेम एम 45, 10 लिटर पाण्‍यात 25 ते 30 ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारावे. फवारणी दर 10 ते 15 दिवसांच्‍या अंतराने करावी.



Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)



Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology