निशिगंध लागवड Nisigandha Cultivation

निशिगंध लागवड(Nisigandha Cultivation)

Agrojay Innovations Pvt. Ltd.
(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)
Agrojay Towards Farmers Prosperity

निशिगंधाच्या फुलांना वर्षभर चांगली मागणी असते. या फुलांचे चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर जमिनीची योग्य निवड, बाजारपेठेनुसार जातीची निवड, खत आणि पाणी व्यवस्थापन आणि कीड, रोगनियंत्रण करणे गरजेचे आहे.

निशिगंधाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. उथळ आणि हलक्‍या जमिनीत फुलदांडे आणि फुले लहान राहतात आणि हंगामही लवकर संपतो. भारी, काळ्या जमिनीत मर आणि कूज रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. चुनखडीयुक्त, हरळी आणि लव्हाळायुक्त जमिनीत निशिगंध लागवड करू नये.

लागवडीचे तंत्र :

लागवड शक्‍यतो एप्रिल - मे महिन्यांत करावी. लागवडीसाठी 20 ते 30 ग्रॅम वजनाचे कंद निवडावेत. कंद मागील वर्षीच्या पिकापासून निवडावेत. 15 ग्रॅम वजनापेक्षा कमी वजनाचे कंद लागवडीस वापरल्यास फुले येण्यास सहा ते सात महिने लागतात. निवडलेले कंद लागवडीपूर्वी 0.2 टक्का तीव्रतेच्या ताम्रयुक्त बुरशीनाशकात 15 मिनिटे बुडवून सावलीत वाळवावे. त्यानंतर लागवडीसाठी वापरावेत. लागवडीसाठी सरी-वरंबा अथवा सपाट वाफे पद्धतीने लागवड करावी, त्यापूर्वी निवडलेल्या जमिनीची उभी-आडवी खोल नांगरट करून कुळवाच्या पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करावी.

हेक्‍टरी 40 ते 50 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. सरी, वरंब्यावर 30 सें.मी. अंतरावर कंदाची लागवड करावी. वाफे शक्‍यतो तीन मीटर लांब आणि दोन मीटर रुंद आकाराचे करावेत.

सपाट वाफ्यात लागवड करताना दोन ओळींत 30 सें.मी. आणि दोन कंदांमध्ये 25 सें.मी. अंतर ठेवावे. कंद जमिनीत पाच ते सात सें.मी. खोल पुरावा. निमुळता भाग वरच्या बाजूस ठेवून मातीने झाकावेत आणि शेतात त्वरित पाणी द्यावे. हेक्‍टरी साधारणपणे 60 ते 70 हजार कंद पुरेसे होतात.

खते आणि पाणी व्यवस्थापन :

निशिगंध कंदवर्गीय पीक असल्यामुळे खतांना चांगला प्रतिसाद देते. जमिनीची पूर्वमशागत करताना हेक्‍टरी 40 ते 50 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. माती परीक्षणानुसार हेक्‍टरी 200 किलो नत्र, 150 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश द्यावे. संपूर्ण स्फुरद व पालाश आणि 50 किलो नत्राचा हप्ता लागवडीच्या वेळी द्यावे. राहिलेले नत्र तीन समान हप्त्यांत लागवडीनंतर 30, 60 आणि 90 दिवसांनी द्यावे. लागवडीनंतर दहा दिवसांनी दहा किलो ऍझोटोबॅक्‍टर 100 किलो ओलसर शेणखतात मिसळावे. या मिश्रणाचा ढीग करून आठवडाभर प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावा.

याच पद्धतीने दहा किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणूसंवर्धक आणि दहा किलो ट्रायकोडर्मा प्रत्येकी 100 किलो ओलसर शेणखतात मिसळून हे ढीग आठवडाभर प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावेत.

एका आठवड्यानंतर हे तिन्ही ढीग एकत्र करून हे खत एक हेक्‍टर पिकाला द्यावे. लागवडीनंतर लगेच पहिले पाणी व दुसरे पाच ते सात दिवसांनी द्यावे.

पावसाळ्यात पाऊस नसेल तर 10 ते 12 दिवसांनी, हिवाळ्यात आठ-दहा दिवसांनी, तर उन्हाळ्यात पाच ते सहा दिवसांनी, जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. फुलांचे दांडे सुरू झाल्यावर नियमित पाणी द्यावे. लागवड केल्यापासून पहिल्या तीन-चार महिन्यांत वेळोवेळी तण काढून जमीन स्वच्छ व भुसभुशीत ठेवली, तर पिकाची वाढ जोमाने होते.

जाती :


सिंगल या प्रकारातील फुले पांढरीशुभ्र असून, अत्यंत सुवासिक असतात. या प्रकारामध्ये सिंगल, शृंगार, प्रज्वल या जाती आहेत. ही फुले हार, वेणी, गजरा, माळा यांसाठी वापरतात. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले रजनी ही जात विकसित केली आहे. ही जात सुट्या फुलांच्या अधिक उत्पादनासाठी व कटफ्लॉवर म्हणून फुलदाणीत ठेवण्यासाठी चांगली आहे.

डबल प्रकारामध्ये स्थानिक डबल, सुवासिनी, वैभव या जाती आहेत. या जातीची फुले फुलदाणीत ठेवण्यास योग्य असतात. सेमी डबल या प्रकारच्या जातीची फुले फुलदाणीसाठी अथवा गुच्छ तयार करण्यासाठी वापरतात.

व्हेरिगेटेड प्रकारामध्ये सुवर्णरेखा व रजतरेखा या जाती आहेत. या जाती बागेत, कुंडीमध्ये शोभेसाठी लावण्यासाठी चांगल्या आहेत.




(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)
Agrojay Towards Farmers Prosperity



Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology