Brinjal Cultivation Technology
वांगी लागवड तंत्रज्ञान Brinjal Cultivation Technology
हवामान:
या पिकाला कोरडे आणि थंड हवामान चांगले मानवते. ढगाळ हवा आणि एकसारखा पडणारा पाऊ स या पिकाला अनुकुल नाही. कारण अशा हवामानात कीड आणि रोगांचा फारच उपद्गव होतो. सरासरी 13 ते 21 सें.ग्रे. उष्ण तापमानात हे पीक चांगले येते. महाराष्ट्रातील हवामानात जवळजवळ वर्षभर वांग्याचे पीक घेता येवू शकते
जमीन:
चांगला निचरा असलेली मध्यम काळी कसदार जमीन या पिकासाठी उत्तम समजली जाते. नदीकाठच्या गाळवट जमिनीत वांग्याचे भरपूर उत्पादन येते असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
लागवडीचा हंगाम:
महाराष्ट्रातील हवामानात वांगी पिकाची लागवड तिन्ही हंगामात करता येवू शकते. खरीप हंगामासाठी बियांची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवडयात आणि रोपांची लागवड जुलै-ऑगस्ट मध्ये केली जाते. रब्बी किंवा हिवाळी हंगामासाठी बियांची पेरणी सप्टेंबर अखेर करतात आणि रोपे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये लावतात. उन्हाळी हंगामासाठी बी जोनवारीच्या दुसऱ्या आठवडयात पेरुन रोपांची लागवड फेब्रुवारीत केली जाते.
बियांचे प्रमाण:
कमी वाढणाऱ्या जातीसाठी हेक्टरी 400 ते 500 ग्रॅम बी पुरेसे होते. जास्त वाढणा-या किंवा संकरित जातीसाठी हेक्टरी 120 ते 150 ग्रॅम बी पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो 3 ग्रॅम थायरम चोळावे.
रोपवाटिका:
वांग्याची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे साधारणतः 3 बाय २ मीटर आकाराचे करुन गादी १ मीटर रुंद व १५ सेंमी उंच करावी. प्रती वाफ्यात चांगले कुजलेले शेणखत दोन पाटया टाकावे व 200 ग्रॅम संयुक्त रासायनिक खत द्यावे. खत व माती यांचे मिश्रण करु न गादी वाफयात समप्रमाणात पाणी मिळेल अशा पध्दतीने तयार करावेत. प्रती वाफ्यास मर रोगाचे नियंञणासाठी 30 ते 40 ग्रॅम ब्लायटॉक्स टाकावे. वाफयाच्या रुंदीस समांतर 10 सेंमी अंतरावर खुरप्याने 1 ते 2 सेंमी खोलीच्या ओळी करु न त्यात पातळ पेरावे. सुरवातीस वाफयांना झारीने पाणी द्यावे. नंतर पाटाने पाणी द्यावे. रोपाच्या जोमदार वाढीसाठी उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी प्रत्येक वाफ्यास 50 ग्रॅम युरिया खत आणि 15 ते 20 ग्रॅम बुरशीनाशक पावडर दोन ओळीमध्ये काकरी पडून द्यावे व हलके पाणी द्यावे. कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी 10 दिवसाच्या अंतराने औषधांची फवारणी करावी. लागवडीपूर्वी रोपांना थोडा पाण्याचा ताण द्यावा म्हणजे रोप कणखर होईल. लागवड करण्याअगोदर एक दिवस रोपांना पाणी द्यावे. रोप लावगडीसाठी 5 ते 6 आठवडयात तयार होते. रोपे 12 ते 15 सेंमी उंचीची झाल्यावर लागवड करावी.
रोपांची लागवड:
रोपलागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करुन चांगली मशागत करावी व शेणखत मिसळावे व जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य अंतरावर सऱ्या वरंबे पाडावेत, हलक्या जमिनीत 75 बाय 75 सेंमी, जास्त वाढणाऱ्या किंवा संकरित जातीसाठी 90 बाय 90 सेंमी अंतर ठेवावे. मध्यम किंवा काळया कसदार जमिनीत कमी वाढणाऱ्या जातींसाठी 90 बाय 75 सेमी व जास्त वाढणाऱ्या जातींसाठी 100 बाय 90 सेमी अंतर ठेवावे.
खत व्यवस्थापन:
जमिनीच्या मगदुराप्रमाणे खतांच्या मात्रांचे प्रमाण कमी जास्त होवू शकते. महाराष्ट्राच्या मध्यम काळया जमिनीसाठी हेक्टरी 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश द्यावे. संपूर्ण स्फूरद व पालाश व अर्धे नत्र लागवडीच्या वेळी आणि उरलेले अर्धे नत्र लागवडीनंतर तीन समान हप्त्यात विभागून दयावे. पहिला हप्ता लागवडीनंतर एक महिन्याने, दुसरा हप्ता त्यानंतर एक महिन्याने आणि तिसरा शेवटचा हप्ता लागवडीनंतर तीन ते साडेतीन महिन्यांनी द्यावा. खतांची मात्रा दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे.
आंतरमशागत:
खुरपणी करुन पिकातील तण काढून टाकावे. लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी रोपांना मातीची भर द्यावी. वेळोवेळी खुरपणी करुन पीक स्वच्छ ठेवावे. पाण्याची पाळी, जमीनीचा प्रकार व हवामान यावर अवलंबून असते. खरपी हंगामातील पिकास 10 ते 12 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळया द्याव्यात. रब्बी आणि उन्हाळी पिकांस रोप लावणीनंतर लगेच पाणी द्यावे. दुसरे पाणी 3 ते 4 दिवसांनी द्यावे. त्यानंतर हिवाळयात 8 दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळयात 5 ते 6 दिवसांनी पाणी द्यावे. फुले येण्याच्या काळ व फळे पोसण्याच्या काळात पाण्याचा ताण देवू नये. तसेच वेळच्यावेळी पिकास गरजेनुसार पाणी द्यावे म्हणजे चांगले उत्पादन मिळेल.
पीकसंरक्षण:
वांगी या पिकावर प्रामुख्याने तुडतुडे, मावा, पांढरीमाशी व कोळी या रस शोषणाऱ्या किडी आणि शेंडा व फळे पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव होतो. तसेच रोगांमध्ये प्रामुख्याने बोकडया किंवा पर्णगुच्छ व मर रोग हे रोग दिसून येतात. तुडतुडे पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने वाकडी होतात. तसेच हे कीटक पर्णगुच्छ या विषाणुजन्य रोगाचा प्रसार करतात. मावा या किडीमुळे पाने पिवळी पउतात व चिकट होवून काळी पडतात. लाल कोळी या किडीमुळे पाने पांढरट पडतात. तसेच पानावर जाळे तयार होते आणि झाडाची वाढ खुंटते. शेंडे आणि फळे पोखरणारी अळी प्रथमतः कोवळया शेंडयात शिरुन आतील भाग खाते त्यामुळे शेंडे वाळतात फळे आल्यावर फळे पोखरते व अशी फळे खाण्यासाठी निरुपयोगी ठरतात
वांगी पिकांमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
पीक लागवडीपूर्वी शेतांची खोल नांगरट करावी. ज्या शेतात अगोदर टोमॅटो, मिरची, भेंडी, वेलवर्गीय भाज्या या पिकांची लागवड केली असल्यास तेथे वांगी पिकाची लावगड करु नये. कारण या शेतात सुत्रकृमीची वाढ झालेली असेल.
रोपासाठी तयार केलेल्या वाफ्यात कार्बोफ्युरोन 30 ग्रॅम किंवा टाकावे. (1 बाय 1 मी वाफा) तसेच रोपांवार डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिली 10 लिटर पाण्यातून वापरावे.
रोपांची पुर्नलागवड करताना रोपे इमिडॅक्लोप्रीड 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून तीन तास बुडवून ठेवावीत. व नंतर लावावीत
लागवडीनंतर 45 दिवसांनी तुडतुडे, मावा, पांढरी माशी या किडी आढळल्यास डायमेथोएट 30 टक्के प्रवाही, 10 मिली किंवा मिथिल डिमेटॉन 25 टक्के प्रवाही 10 मिली किंवा स्पार्क 10 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे.
लागवडीनंतर दोन महिन्यांनी किडलेले शेंडे व फळे आढळल्यास ती गोळा करुन नष्ट करावीत तसेच 4 टक्के निंबोळी अर्क फवारावे.
वांगी पिकावर कोळी आढळल्यास पाण्यात मिसळणारे गंधक 30 ग्रॅम किंवा डायकोफॉल 20 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे.
काढणी व उत्पादन:
वांगी फळांना योग्य बाजारभाव मिळण्यासाठी फळाची तोडणी योग्य वेळी होणे आवश्यक आहे. फळे पूर्ण वाढून त्यांना आकर्षक रंग आल्यावर काढणी करावी. फार कोवळी फळे काढल्यास उत्पादनात घट येते आणि जून फळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाहीत. चार ते पाच दिवसांच्या अंतराने तोडणी करावी. किडलेली वांगी बाजूला काढावीत. वांग्याचा आकार आणि रंगानुसार त्यांची प्रतवारी करावी म्हणजे चांगला बाजारभाव मिळेल. तोडणीनंतर फळे बाजारात पोहचेपर्यंत त्याचा चमकदारपणा टिकून राहील अशा पध्दतीने पॅकिंग करावे.
Comments
Post a Comment