बरसीम चारा पिक लागवड

बरसीम चारा पिक लागवड

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)
Agrojay Towards Farmers Prosperity

बरसीम चारा पिकाची लागवड कधी करावी?

बरसीम हे द्विदलवर्गीय चारापीक आहे. या पिकापासून लुसलुशीत, रुचकर आणि पौष्टिक असा भरघोस चारा मिळतो. या पिकास थंड व कोरडे हवामान आवश्‍यक आहे. उष्ण व दमट हवामान या पिकास अनुकूल नाही. पाण्याचा चांगला निचरा असणारी, मध्यम ते भारी तसेच चुना व स्फुरद भरपूर प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या जमिनीत बरसीम चांगल्या प्रकारे वाढते. काहीशा प्रमाणात विम्लयुक्त जमिनीमध्येसुद्धा हे पीक वाढते; परंतु आम्लयुक्त आणि पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत बरसीम वाढत नाही. एक खोल नांगरट करून एकदा डिस्क हॅरोने ढेकळे फोडून घ्यावीत.


शेणखत पसरवून झाल्यानंतर काकरपाळी करून पिकासाठी योग्य अशी मऊ व भुसभुशीत जमीन तयार करता येते. ढेकळाचे प्रमाण जास्त असल्यास व गरजेप्रमाणे आणखी एक काकरणी करावी. जमीन तयार केल्यानंतर तिची बांधणी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी दोन मीटर रुंदीचे व जमिनीच्या उतारानुसार लांबी ठेवून वाफे बनवावेत. परंतु दोन मीटर रुंद व दहा मीटर लांब अशा आकाराचे वाफे तयार केल्यास पेरणीसाठी सुलभ व पाण्याच्या पाटामध्ये कमी क्षेत्र वाया जाते. पेरणीपूर्वी मशागत करताना उपलब्धतेनुसार हेक्‍टरी 20 ते 30 बैलगाड्या (10 ते 15 टन) कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. या पिकाला हेक्‍टरी 20 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश इतकी मात्रा द्यावी. ही सर्व खते पेरणीच्या वेळेसच द्यावयाची आहेत.

या पिकाची पेरणी नोव्हेंबर अखेर पर्यंत पूर्ण करावी म्हणजे पिकाच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारी थंडी तीन ते चार महिन्यांपर्यंत मिळेल. त्यापासून जास्तीत जास्त म्हणजेच चार कापण्या मिळतील. लागवडीसाठी वरदान, बुंदेल बरसीम 2 व मेस्काव्ही या जातींची निवड करावी. हेक्‍टरी 25 ते 30 किलो इतके बियाणे लागते. बियाण्याची पेरणी करण्याअगोदर बियाणे दहा टक्के मिठाच्या पाण्यामध्ये बुडवावे. असे केल्याने चिकोरी या गवताचे बी पाण्यात तरंगून येते. ते आपणाला सहजरीत्या वेगळे करता येते. बियाणे पाण्यातून बाजूला काढून पोत्यावर घ्यावे. बियाण्यास रायझोबियम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू याची प्रक्रिया करण्यासाठी दर दहा किलो बियाण्यासाठी 250 ग्रॅम जिवाणू संवर्धक पुरेसे आहे.

हलक्‍या हाताने बियाण्याला पावडर चोळल्यानंतर बियाणे पूर्णतः सावलीमध्ये सुकवून घ्यावे. बियाण्याच्या संवर्धकामुळे गोळ्या झाल्या असतील तर त्या सुकल्यानंतर फोडून घ्याव्यात. अशा रीतीने प्रक्रिया केलेले बियाणे वाफ्यामध्ये 25 सें.मी. अंतरावर ओळीमध्ये पेरावे. बियाणे साधारणतः दोन ते 2.5 सें.मी. खोलीवर पेरावे. त्यापेक्षा जास्त खोलवर पेरणी केल्यास बियाणे उगवणीवर परिणाम होतो. पेरणीनंतर बरसीमची पहिली कापणी 50 ते 55 दिवसांनी करावी. गवताची कापणी जमिनीच्या वर चार ते पाच सें.मी.वर करावी. पहिली कापणी करताना विळे धारदार असावेत जेणेकरून गवत कापताना ठोंब उपटून येऊ नयेत. पिकाच्या नंतरच्या कापण्या 22 ते 25 दिवसांनी कराव्यात.

आपल्याकडे नोव्हेंबरमध्ये पेरणी केलेले गवत मार्च अखेरपर्यंत टिकते. या काळामध्ये एकूण चार कापण्या मिळतात.बरसीमच्या तीन ते चार कापण्यांमध्ये एक हेक्‍टर क्षेत्रामधून सरासरी 60 ते 65 टन एवढा हिरवा चारा मिळतो. भारी जमिनीत चांगली मशागत केल्यानंतर हेच उत्पादन 70 ते 75 टनांपर्यंत पोचू शकते. 



(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)
Agrojay Towards Farmers Prosperity



Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology