कलिंगड लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान
कलिंगड लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान
(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay )
Agrojay Towards Farmers Prosperity
कलिंगड हे सर्वसामान्य लोकांना परवडणारे, सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले वेलवर्गीय फळ, याला वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. शहरी व ग्रामीण भागांमध्ये कडक उन्हाळ्यात सतत लागणारी तहान शमविण्यासाठी कलिंगडाच्या फोडींचा हमखास उपयोग होताना दिसतो. अशा या वाढत्या मागणीचा विचार करता व कमी खर्चात, कमी पाण्यावर व अल्प कालावधीमध्ये येणारे पीक असल्यामुळे शेतकरी कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात करू लागला आहे.
कलिंगडाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागामध्ये अन्नघटकाचे प्रमाण:
पाणी- ९४ %, शर्करा पदार्थ- ३.३%, प्रथिने- ०.२%, तंतुमय पदार्थ- ०.२%, खनिजे- ०.३%, चुना- ०.०१%, स्फुरद- ०.०९%, लोह- ०.००८%, जीवनसत्त्व 'क'- ०.००१ मि. ग्रॅ., जीवनसत्त्व 'ब'-१२ मि. ग्रॅ., जीवनसत्त्व 'ई'- १ मि.ग्रॅ. असते.
जमीन
हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते. चुनखडीयुक्त खारवट, चोपण जमीन लागवडीस अयोग्य आहे. कारण अशा जमिनीत अतिप्रमाणात असणार्या सोडियम, कॅल्शियम, मॅग्रशियम सल्फेट, क्लोराईड, कार्बोनेट व बायकार्बोनेटसारख्या विद्राव्य क्षारांमुळे कलिंगडाच्या फळावर डाग पडण्याची शक्यता असते. बारामती, फलटण भागातून येणार्या कलिंगडावरती अशा प्रकारचे डाग नेहमी मोठ्या प्रमाणात दिसतात. तथापि सप्तामृत फवारल्याने हे फळावरील डाग आले नसल्याचा त्या भागातील शेतकर्यांचा अनुभव आहे. लागवडीसाठी हलकी, पोयट्याची, मध्यम-काळ्या ते करड्या 'रंगाची ('डी ' किंवा 'जी' साईल असलेली) पाण्याचा निचरा असणारी जमीन लागवडीस योग्य आहे.
हवामान
उष्ण, भरपूर सूर्यप्रकाश व कोरडे हवामान या पिकास चांगले मानवते. कलिंगडाच्या उत्तम वाढीसाठी २२ ते २५ सेल्सिअस तापमान उपयुक्त असते. तसेच फळ धारणेसाठी आणि चांगल्या प्रतीचा फलांसाठी ३५ ते ४० सेल्सिअस तापमान उपयुक्त ठरते. वाढीच्या कालावधीत हवेमध्ये दमटपणा व धुके असल्यास वेलींची वाढ निट होत नाही व पिक रोगास बळी पडण्याची शक्यता असते. अलीकडे कडक उन्हाळ्याचा आणि भर पावसाळ्याचा काळ सोडला तर वर्षभर कलिंगडाची लागवड केली जाते.
Agrojay Towards Farmers Prosperity
जाती
शुगर बेबी, असाहीयामाटो, मधू, अर्का माणिक, अर्का ज्योती, मिलन, तुप्ती, मोहिनी, अमृत इ.
·
शुगर बेबी: फळांची साल गर्द हिरव्या रंगाची, कमी जाडीची असून हिरवट काळे रेखावृत्तासारखे पट्टे असतात. गोडी जास्त असते. गर भडक लाल रंगाचा रवाळ व गोड असतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड करतात.
·
असाहीयामाटो: फिकट हिरव्या रंगाची साल असून फळे मोठी असली तरी गोडी कमी असते व चवीस थोडेसे पांचट असते. त्यामुळे मागील वीस वर्षापासून ही जात पडद्याआड गेली.
·
मधु: या संकरित जातीची फळे लंबगोल आकाराची असून फळांची साल गर्द हिरवी असते. फळांचे वजन ६ ते ७ किलो भरते. गर भरपूर व लाल असतो. या दशकात या जातीची मागणी बर्यापैकी होती.
·
अर्का माणिक: या जातीची फळे आकाराने मोठी, गोल असतात. फळाची साला गर्द हिरव्या रंगाची मध्यम जाड सालीची असते.
·
मिलन: लवकर तयार होणारी संकरित जात असून फळे लंबगोल आकाराची असतात. फळाचे वजन ६ ते ७ किलो भरते.
·
अमृत: महिको कंपनीची संकरित जात असून फळे मध्यम आकाराची किंचित लंबगोल असून ५ ते ७ किलो वजनाची असतात. फळांच्या सालीचा रंग गर्द हिरवा असतो. फळांमध्ये बी कमी असते.
संकरित कलिंगड
·
सुपर ड्रॅगन: ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळाचा आकार लांबट गोल असून फळाचे सरासरी वजन ८-१० किलो, सालीचा रंग फिकट हिरवा व त्यावर गर्द हिरवे पट्टे असून गर लाल किरमिजी व रवाळ आहे. दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण. ही जात मरफक्युजॅरियम रोगास सहनशील आहे.
·
ऑगस्टा: ही जात जोमदार व लवकर तयार होणारी आहे. फळाचा आकार उभट गोल असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचे सरासरी वजन ६-१० किलो आहे. फालचा गर आकर्षक लाल असून चवीला अतिशय गोड आहे. फळांमध्ये बियांचे प्रमाण कमी असून बियांचा आकार लहान आहे. दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण.
·
बादशाह: ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळ लांबट गोल आकाराचे, गर्द हिरवे पट्टे असलेले फिक्कट हिरव्या सालीचे असून त्याचे सरासरी वजन ८ ते १० किलो असते. फळातील गर अतिशय लाल, कुरकुरीत, रवाळ असून, चवीला गोड आहे. दूरच्या बाजारपेठत पाठविण्यास योग्य आहे.
·
शुगर किंग: अतिशय जोमाने वाढणारी मजबूत वेल. फळ गोलाकार असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचा गर आकर्षक लाल असून चवीला गोड आहे. ही जात मर रोगास (फ्युजॅरियम) प्रतिकारक आहे. फळाचे सरासरी वजन ८-१० किलो आहे.
·
शुगर क्वीन: या जातीचा फळांची साल गडद हिरव्या रंगाची, गर लाल आणि कुरकुरीत असतो. फळांमध्ये साखरेचे प्रमाण १२ ते १४ टक्के असते. तसेच या जातीमध्ये चांगली फळधारणा होते. ही जात लांब वाहतुकीसाठी उपयुक्त आहे आणि फळांची टिकवणक्षमता पण जास्त आहे.
लागवडीचा हंगाम
कलिंगडाची लागवड सर्वसाधारण पणे १५ डिसेंबर ते २५ फेब्रुवारी दरम्यान करावी. फळे ऐन उन्हाळ्यात एप्रिल-मे मध्ये बाजारात विक्रीसाठी तयार होतात. तसेच या फळांना चांगली मागणी असते. काही शेतकरी लागवड ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात करतात. हि फळे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तयार होतात. या फळांची गुणवत्ता जरी चांगली नसली तरी या फळांना चांगला भाव मिळतो.
Agrojay Towards Farmers Prosperity
पूर्वमशागत
जमिनीची खोल नांगरणी करून प्रति एकरी चांगले कुजलेले १५ ते २० टन शेणखत, कोंबडी खत किंवा लेंडी खत जमिनीत मिसळून द्यावे. त्यानंतर ट्रॅक्टर किंवा बैलांच्या साह्याने वखराच्या दोन पाळ्या घालाव्यात. रोटावेटरचा जर उपयोग केला तर खत जमिनीत चांगले मिसळते व जमीन सपाट होते. यानंतर गादीवाफे तयार करून घ्यावेत. गादीवाफ्याचा आकार दोन फूट रुंद व एक फूट ठेवावा. दोन गादीवाफे मध्ये सहा फूट अंतर ठेवावे. गादीवाफे तयार करत असताना शिफारशीनुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
लागवड आणि बियाण्यांचे प्रमाण
कलिंगड लागवडीसाठी एकरी १ ते १.५ किलो बियाणे पुरेसे असते. पण संकरित जातीचे हेक्टरी ३०० ते ४०० बी पुरेसे होते. कलिंगड पिकाची लागवडी ही बिया टोकून करतात. पेरणी पूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम या प्रमाणात थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. प्रत्येक खड्ड्यात ३ ते ४ बिया एकमेकापासून ४ ते ५ सेंटीमीटर अंतरावर व दोन ते दोन से.मी. खोलीवर टाकाव्यात. साधारणत: ५ ते ५ दिवसांनी बिया रुजतात. रुजवा झाल्यानंतर १५ दिवसांनी रोपांची विरळणी करून प्रत्येक ठिकाणी दोन चांगली जोमदार रोपे ठेवावीत. या पिकाची लागवड विविध पद्धतीने केली जाते.
·
आळे पद्धत: ठराविक अंतरावर आळे करून त्यात शेणखत मिसळून मध्यभागी चार ते पाच बिया टाकाव्यात.
·
सरी-वरंबा पद्धत: या पद्धतीत २ मीटर अंतरावर सऱ्या पाडून घेतात व ०.५ मी अंतरावर अंतर वाफ्यावर बिया लावतात.
·
रुंद गादी वाफ्यावर लागवड.
या पद्धतीत लागवड रुंद गादीवाफ्याचा दोन्ही बाजूंना करतात. त्यामुळे वेल गादीवाफ्यावर पसरतो व फळे पाण्याच्या संपर्कात येऊन खराब होत नाहीत. यासाठी ३ ते ४ मीटर अंतरावर सरी पाडून सरीच्या दोन्ही बाजूंना १ ते १.५ मीटर अंतरावर तीन ते चार बिया लावाव्यात.
मल्चिंग पेपरचा वापर
सध्या शेतकरी लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. गादीवाफ्यावर मल्चिंग पेपर टाकण्याअगोदर गादीवाफा एकसमान करून मधोमध ठिबकची लॅटरल टाकून ठिबक सिंचन सुरू करून लॅटरल तपासून घ्याव्यात. गादीवाफ्यावर चार फूट रुंदीचा ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या मल्चिंग पेपर अंथरावा पेपर लावताना तो गादीवाफ्यावर समांतर राहील, ढिला पडणार नाही याची काळजी घ्यावी. एक एकर मध्ये साधारण पाच ते सहा किलो पेपर लागू शकतो. लागवडीच्या आदल्यादिवशी लॅटरलच्या दोन्ही बाजूस 15 सेमी. अंतरावर रोपे लावता येतील अशा अंतरावर छिद्रे पाडून घ्यावी. दोन रोपांमधील अंतर हे दोन फूट ठेवावे. त्यानंतर गादीवाफा ठिबक सिंचनाच्या साहाय्याने ओला करून घ्यावा. यानंतर छिद्रे पाडलेल्या ठिकाणी साधारणत १२ दिवस वयाच्या रोपांची लागवड करून घ्यावी.
Agrojay Towards Farmers Prosperity
अन्नद्रव्य व्यवस्थापन
माती परीक्षण अहवालानुसार खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा द्यावी. या पिकास हेक्टरी १५० किलो नत्र ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश तसेच २५ ते ३० टन शेणखत लागते. स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा नत्राची १/३ मात्रा पेरणीच्या वेळेस द्यावी. उरलेली नत्राची मात्रा समप्रमाणात विभागून लागवडीनंतर एक महिन्याच्या अंतराने दोन वेळा द्यावी.
फवारणीद्वारे खतांचे नियोजन
पिकांच्या वाढीची अवस्था
|
फवारणीच्या खतांचा प्रकार
|
प्रमाण प्रती लिटर पाणी
|
लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी
|
१९:१९:१९
सूक्ष्म अन्नद्रव्य |
२.५-३ ग्रॅम
२.५-३ ग्रॅम |
वरील फवारणी नंतर ३० दिवसांनी
|
बोराॅन
सूक्ष्म अन्नद्रव्य |
१ ग्रॅम
२.५-३ ग्रॅम |
फुलोरा अवस्थेत
|
००:५२:३४
|
४-५ ग्रॅम
|
फळधारणा
|
००:५२:३४
बोराॅन |
४-५ ग्रॅम
१ ग्रॅम |
फळ पोसत असतांना
|
१३:००:४५
कॅल्शियम नायट्रेट |
४-५ ग्रॅम
२-२.५ ग्रॅम |
पाणी व्यवस्थापन
या पिकास नियमित व भरपूर पाण्याचा पुरवठा करणे अत्यंत आवश्यक असते. सुरवातीच्या काळात पाण्याची गरज कमी असते त्यामुळे पाच ते सहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पुढे पीक जसे वाढत जाते तसतशी पिकाची पाण्याची गरज ही वाढत जाते. म्हणून फळे लागण्याच्या कालावधीनंतर पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. जर या पिकाला अनियमित पाणी दिले तर फळे तडकन्याचा व त्याचा आकार बदलण्याचा संभव असतो.
विशेष काळजी
वेली वाफ्यावर वाढतील याची काळजी घ्यावी. फळे लागल्यानंतर फळांचा पाण्याशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. फळांचे सूर्यप्रकाशाच्या प्रखर किरणांपासून संरक्षण करण्यासाठी फळे गवताने किंवा भाताच्या पेंढयानी झाकून घ्यावीत.
Agrojay Towards Farmers Prosperity
फळांची काढणी आणि उत्पन्न
कलिंगडाच्या फळांची काढणी योग्य वेळी करणे आवश्यक असते. अपरिपक्व किंवा अतीपक्व फळे काढल्यास प्रतीवर व परिणामी बाजारभावावर परिणाम होतो. फळे सर्वसाधारणपणे जातीपरत्वे ९० ते ११० दिवसांनी काढण्यास तयार होतात. फळांची काढणी सकाळी करावी. त्यामुळे ताजेपणा व आकर्षकता टिकून राहतो. फळ काढणीला तयार झाले किंवा नाही हे ओळखण्यासाठी खालील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.
·
फळांवर टिचकी मारल्यास तयार झालेल्या फळांचा बदबद आवाज येतो तर अपरिपक्व फळांचा ठणठण आवाज येतो.
·
तयार फळांचा जमिनीलगतचा रंग किंचित पिवळसर होतो.
·
तयार फळांचे देठाजवळील लतातंतू सुकलेले असतात.
जातीपरत्वे कलिंगडाचे उत्पन्न २०० ते ४०० क्विंटल प्रति हेक्टर येते.
(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay )
Comments
Post a Comment