कांदा बिजोत्पादन

कांदा बिजोत्पादन


(Download Agrojay Mobile Application :- http://bit.ly/Agrojay)

कांदा उत्पादन व क्षेत्राच्या बाबतीत भारत जगात अग्रेसर असला, तरी प्रति हेक्‍टर उत्पादकतेच्या बाबतीत भारताचा क्रमांक बराच खाली लागतो. कांदा पिकवणाऱ्या राज्यांत क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही दृष्टीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील हवामान हे वर्षभर म्हणजे खरीप, रांगडा, रबी व उन्हाळी हंगामात लागवडीस पोषक असते. देशाचे २५ टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, धुळे हे जिल्हे कांदा उत्पादनात आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील ३७ टक्के, तर देशातील १० टक्के कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. भारतात कांद्याच्या जवळजवळ ३३ जाती विकसित झाल्या आहेत. परंतु ३-५ जाती प्रामुख्याने लागवडीसाठी वापरल्या जातात. एकूण क्षेत्राचा विचार केला तर शिफारस केलेल्या सुधारित जातींखाली फक्त ३० टक्के क्षेत्र येते. बाकी क्षेत्रावर शेतक-यांनी स्वत: तयार केलेल्या बियाणांची लागवड केली जाते. स्वत:चे बी तयार करीत असताना बीजोत्पादनाचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे त्यांच्या स्वत:च्या वाणामध्ये नकळत निकृष्टपणा येत असतो. त्याचा परिणाम कमी उत्पादन, डेंगळे येणे, जोड कांदी अधिक होणे, साठवणक्षमता कमी होणे इत्यादी बाबींवर होत असतो. शिफारस केलेल्या सुधारित जातीचे बी वाजवी दरात आणि वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी स्वत:च बी तयार करण्याचा प्रयत्न करतो किंवा इतर शेतक-याकडे असणारे बी वापरतो.
निराशेच्या गर्तेतील शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीचे बेगड झुगारून कांदा बीजोत्पादनासाररख्या व्यावसायिक व फायदेशीर पीक पद्धतीची कास धरली तर आजच्या परिस्थितीत बदल होईल. शेतक-यांनी एकत्रित येऊन एका शिवारात किंवा गावात ठराव करून एकाच सुधारित जातीचा बीजोत्पादन कार्यक्रम राबवून लागणारे बी तयार केले तर बाजारपेठ शोधणे सोपे होईल.   

   कांदा पिकाचे बियाणे अल्पायुषी असते व त्याची उगवण क्षमता ही एक वर्षापुरतीच टिकून राहते त्यामुळे कांदा बियाणाचे उत्पादन दरवर्षी घ्यावे लागते. कांदा बियाणाच्या उत्पादनासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो. पहिल्या वर्षी मूलभूत किंवा पैदासकार बियाणापासून मातृकंद तयार करावीत. नंतर दुस-या वर्षी या मातृकंदापासून बियाणे उत्पादन कार्यक्रम घ्यावा.



कांद्याच्या बिजोत्पादानाची पद्धत :

कंदापासून बियाण्याची पद्धत :


या पद्धतीमध्ये कंद तयार झाल्यानंतर काढून घेतात व चांगल्या रीतीने निवडून पुन्हा शेतात लागवड करतात. यामुळे कंदाची योग्य निवड शक्य होते. शुद्ध बियाणे तयार होऊन उत्पन्नदेखील जास्त प्रमाणत येते. या पद्धतीत खर्च वाढतो व वेळ देखील जास्त लागतो. तथापि, बीजोत्पादनासाठी हीच पद्धत योग्य आहे.



एकवर्षीय पद्धत :


या पद्धतीमध्ये मे-जून महिन्यात पेरणी करून रोप लावणी जुलै-ऑगस्टमध्ये करतात. नोव्हेंबर महिन्यात कंद तयार होतात. कंद काढून निवडून घेतले जातात. चांगल्या कंदांची १०-१५ दिवसानंतर पुन्हा दुसऱ्या शेतात लागवड करतात. या पद्धतीमुळे मे महिन्यापर्यंत बियाणे तयार होते. एक वर्षात बियाणे तयार झाल्याने यास एकवर्षीय पद्धत म्हणतात. या पद्धतीने खरीप कांद्याच्या प्रजातींचे बिजोत्पादन घेतात.



द्वीवर्षीय पद्धत :


या पद्धतीमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बियाणे पेरावे व रोपे डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीस शेतात लावावे. मेपर्यंत कांदे तयार होतात. निवडलेले कांदे ऑक्टोबरपर्यंत व्यवस्थित साठवून ठेवावेत. नोव्हेंबरमध्ये पुन्हा निवडून चांगल्या कंदांची शेतात लागवड करतात. या पद्धतीमुळे बियाणे तयार होण्यासाठी जवळपास दीड वर्ष वेळ लागतो. म्हणून यास द्वीवर्षीय पद्धत म्हणतात. या पद्धतीत रब्बी कांद्याच्या वाणांचे बिजोत्पादन करतात.



हवामान :


कांदा हे मुख्यत: हिवाळी हंगामातील पीक आहे. त्यांच्या उत्तम वाढीसाठी रात्रीचे १४ ते २१ अंश सेल्सिअस तापमान, ११ ते १२ तास स्वच्छ सूर्यप्रकाश, ७० ते ७५ टक्के आर्द्रता आवश्यक असते.



जमीन :


या पिकासाठी सुपिक, मध्यम ते मध्यम भारी, वाळूमिश्रित, भुसभुशीत, पाण्याचा निचरा होणारी, ६.५ ते ७.५ सामू असणारी जमीन हवी. क्षारयुक्त जमिनीत याचं उत्पादन चांगलं येत नाही. तसेच हलक्या अथवा मुरमाड जमिनीत कांदा बीजोत्पादन घेऊ नये.



पूर्वमशागत :


कांदा जमिनीत वाढणारे पीक असल्यामुळे २-३ नांगरण्या, वखरण्या करून जमीन चांगली भुसभुशीत करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी एकरी १५-२० गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत पसरावे व वखराची पाळी देऊन मिसळावे.



जातींची निवड :


महाराष्ट्रात बिजोत्पादानासाठी नाशिक लाल, नाशिक-२४१ (गावरान), पूना फुरसुंगी, फुले समर्थ, प्रशांत, पंचगंगा, गाजनन, ईस्ट वेस्ट, इ. जातींची निवड करतात.



पुणे-फुरसुंगी जातीच्या बियाण्याची कमतरता लक्षात घेता बीजोत्पादनातून फायदा मिळतो. पुणे-फुरसुंगी जातीमध्ये कांदे काढणीनंतर अधिक काळ टिकण्याची क्षमता असल्याने त्या जातीची निवड करतात. या कांद्याला दर चांगला मिळत असल्यामुळे बियाण्याचीही किंमतही अधिक असते.
रब्बी हंगामात कांदा लागवडीसाठी नाशिक-२४१ ही जात निवडावी. ही जात रब्बी हंगामात उच्च उत्पादनक्षमतेसाठी तसेच उत्तम साठवणूक क्षमतेसाठी चांगली आहे. कांदा मध्यम चपटगोल आकाराचा असून, डेंगळे येणे, डबल कांदा इत्यादी विकृतीत प्रतिकारक आहे. शेतकरी या वाणांस गरवा, भगवा अथवा गावरान या नावानेही ओळखतात. कृषी विद्यापीठातून या जातीचे मूलभूत बियाणे (ब्रिडर सीड) घ्यावे किंवा माहिती असलेल्या शेतकऱ्यांकडून खात्रीचे गोट वापरून सुधारित बीजोत्पादन घ्यावे.


बीज प्रक्रिया :


पेरणीपूर्वी बियाणास नॅप्थॅलीन अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड किंवा इंडॉल ब्युटेरिक अ‍ॅसिडच्या १० पी.पी.एम.च्या द्रावणात ४ तास भिजवून ठेवावे. नंतर सावलीत वाळवावे. त्यानंतर त्यास २ ग्रॅम थायरम व १ ग्रॅम बाविस्टीन प्रतिकिलो बियाणास लावावे.

कांदे लागवडीपूर्वी बावीस्टीनच्या ०.१ टक्के द्रावणात बुडवून वरचा एक तृतीयांश भाग कापून लावावा. एकरी १० क्विंटल (एकसारखे, मध्यम आकाराचे, निरोगी कांदे) बियाणे पुरेसे होते.


कांदा लागवडीचे हंगाम :


हंगाम

पेरणी

पुनर्लागवड
काढणी
खरीप
जून-जुलै
जुलै-ऑगस्ट
नोव्हेंबर-डिसेंबर
रब्बी
ऑक्टोबर-नोव्हेंबर
डिसेंबर-जानेवारी
एप्रिल-मे


रोपे तयार करणे :


रोपे तयार करण्यासाठी वाफ्यांची जागा उंच व पाणी देण्यास सुलभ अशा ठिकाणी निवडावी. १ मीटर रुंद, १५-२० सें.मी. उंच व योग्य लांबीचे गादीवाफे तयार करावे. सर्वसाधारण २५० चौ. मीटर रोपवाटिका एक एकर क्षेत्रासाठी पुरेसे होते. बियांची उगवण क्षमता चांगली असेल तर एक एकर लागवडीसाठी ३-४ किलो बीयाणे पुरेसे होते.



लागवड :


कंद लागवडीसाठी सरासरी ७० ते ८० ग्रॅम वजनाचे साडेचार ते सहा सेंटिमीटर आकाराचे कांदे निवडावे. कापलेल्या कांद्यामधून केवळ एक डोळ्याचे कांदे लागवडीसाठी वापरावेत. सरी पद्धतीने लागवड करताना ९० बाय ३० सें.मी. अंतरावर कापलेल्या कांद्याची लागवड करावी.

रोपांची सपाट वाफ्यात कोरड्यात १५ बाय १० सें.मी. अंतरावर दाट लागवड करावी. त्यानंतर हळवेपणाने पाणी द्यावे. त्यानंतर आंबवणी करताना न चुकता नांगे भरावेत. महाराष्ट्राच्या काही भागात पट्टा पद्धतीनेही कांदा लागवड केली जाते.


अन्नद्रव्ये व्यवस्थापन :


वाफ्यावर २ चौरस मीटर जागेला २ किलो बारीक केलेले शेणखत, २५ ग्रॅम म्युरेब ऑफ पोटॅश बियाणे पेरणीपूर्वी द्यावे. यूरियाचा दुसरा हप्ता २५ ग्रॅम २५ दिवसांनी द्यावा. लागवडीनंतर ८ दिवसांनी एकरी ५ किलो १९:१९:१९ या विद्राव्य खतासोबत एक लिटर ह्यूमिक ऍसिड व ५०० ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड यांची आळवणी करावी. लागवडीनंतर एक महिन्याने एकरी २५ किलो मॅग्नेशिअम, १० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य, डीएपी २५ किलो व पोटॅश ५० किलो असा डोस द्यावा. नत्र खत दोन भागात विभागून ३० व ४५ दिवसांनी द्यावे. माती परीक्षण करून सूक्ष्म द्रव्यांचा वापर करावा.



पाणी व्यवस्थापन :


जमिनीचा मगदूर व पिकाची गरज लक्षात घेत पाणी व्यवस्थापन करावे लागते. पाणी नियोजन करताना जमिनीचा मगदूर व पिकाची वाढीची अवस्था यानुसार पाणी द्यावे.  कांदा बीजोत्पादन साधारणपणे मध्यम ते भारी जमिनीत घेतले जात असल्यामुळे दोन पाळ्यांत आठ ते दहा दिवसांचे अंतर ठेवावे. प्रत्येक पाळीत नेहमी हलके पाणी द्यावे. कांदा पिकाची मुळे १५ ते २० सें.मी. खोलीवर जातात. तेवढाच भाग ओला राहील इतकेच पाणी देणे गरजेचे असते. पाणी जास्त झाले, तर कंद सडतात व नांगे पडतात. म्हणून हलक्‍या जमिनीत पाणी सहा ते आठ दिवसांच्या अंतराने द्यावे. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात थंडी असल्यामुळे पाण्याची गरज कमी असते. या काळात १० ते १२ दिवसांनी पाणी द्यावे. फेब्रुवारी-मार्च या काळात फुलांचे दांडे निघून फलधारणा होते. या काळात पाण्याचा अजिबात ताण पडू देऊ नये, म्हणून पाणी सात ते आठ दिवसांनी द्यावे. लागवडीनंतर 90 दिवसांनी कांद्याचे पाणी तोडावे. एप्रिल महिन्यात फलधारणा होऊन बी पक्व होते. ठिबक सिंचन केल्यास बीजोत्पादन चांगल्या प्रकारे घेता येते. कांदा बीजोत्पादन पिकात वाळलेले गवत, गव्हाचा कोंडा किंवा भाताचे तूस याचे आच्छादन केले, तर पाण्याची बचत होते व तणांचा उपद्रव कमी होतो. याशिवाय पाण्यातून विद्राव्य खते देण्याची सोय असल्यामुळे खतांचीदेखील बचत होते.



तण नियंत्रण :


३-४ खुरपणी करून तण नियंत्रण करावे. लागवडीनंतर १५ दिवसानंतर विद्यापीठांच्या शिफारशीप्रमाणे तणनाशक फवारून गरजेनुसार एक महिन्यानंतर हात खुरपणी करून नत्रखताचा वर हप्ता द्यावा.



पीक संरक्षण :


कांदा पीकाप्रमाणेच किड व रोगांचे नियंत्रण करावे. लागवडीनंतर १०, २५, ४० व ५५ दिवसांनी नियमितपणे कीड, रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कीडनाशकाच्या चार फवारण्या द्याव्यात.  कांद्यामध्ये फुलकिडे व करपा या बुरशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असल्याने रासायनिक औषधांच्या फवारण्या निरीक्षणाअंती कराव्या.



परागीकरणासाठी मधमाश्‍यांच्या पेट्यांची व्यवस्था :


कांदा बीजोत्पादनात परागीकरणाला महत्त्वाचे स्थान असते. कांदा फुलोऱ्यात आला तेव्हा मोसंबीही फुलोऱ्यात आल्याने परागीकरण चांगले होण्यासाठी सुमारे तीन एकरांत मधमाश्‍यांच्या दोन पेट्या ठेवाव्या.



उत्पादन :


कांद्याचे बियाण्यासाठी एकरी ३-५ क्‍विंटल इतके उत्पादन निघते. साठवणगृहात मध्यम आकाराचे एकसारखे कांदे ठेवावेत. कांदा साठविण्यापूर्वी दोन दिवसआधी कांदा चाळ झाडून स्वच्छ करावी. मॅन्कोझेबची (३ ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी. साठवणुकीत दर महिन्याला एकदा अशी फवारणी केल्यास साठवणुकीत कांदा सडण्याचे प्रमाण खूपच कमी राहते. पावसाळी वातावरणात साठवणगृहाच्या तळाशी गंधकाची धुरी देण्याने कांदा सडत नाही. साठवणगृहामध्ये एकदा भरलेला कांदा बाहेर काढून हाताळू नये व त्यावरची पत्ती काढून टाकू नये. कांद्याची पत्ती संरक्षकाचे काम करत असल्यामुळे त्याचे जतन करणे अत्यावश्‍यक आहे. योग्य काळजी घेऊन कांदा साठविल्यास हा कांदा ६ ते ८ महिने उत्तम टिकतो.



जातींची शुद्धता राखण्यासाठी विलगीकरण :


कांदा पिकात परपरागीभवन होऊन फलधारणा होते. दोन जाती बीजोत्पादनासाठी दीड कि.मी.च्या आत लावल्या किंवा रब्बी कांदा पिकात डेंगळे आले, तर परपरागीभवन होऊन जातींची शुद्धता राहत नाही. तेव्हा, जातींची शुद्धता राखण्यासाठी दोन जातींमध्ये बीजोत्पादन करते वेळी कमीत कमी दीड कि.मी. विलगीकरण अंतर राखणे अत्यंत आवश्‍यक आहे. याशिवाय बीजोत्पादनाच्या शेजारी कांदा लागवड केली असेल आणि त्यात डेंगळे आले असतील, तर फुले उमलण्याअगोदर डेंगळे तोडणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, अन्यथा आपल्या चांगल्या जातीमध्ये डेंगळे येण्याची प्रवृत्ती वाढीस लागू शकते.



विलगीकरण अंतर :


· पायाभूत बियाणे- १००० मीटर
· प्रमाणित बियाणे- ५०० मीटर




See Below for More Information http://krushisamarpan.blogspot.com





(Download Agrojay Mobile Application :- http://bit.ly/Agrojay)



Comments

Popular posts from this blog

How to Prevent Soil Erosion on Farmlands

Agrojay Fruit and Vegetable Processing an Agricultural Industry

वांगी लागवड